पुसेसावळी:-कळंबी शाळेत कन्यापूजनातून नारीशक्तीचा सन्मान.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुसेसावळी:-कळंबी शाळेत कन्यापूजनातून नारीशक्तीचा सन्मान.

शैक्षणिक साहित्याचे वाटप; दोन विद्यार्थिनींचा वाढदिवस साजरा.
कळंबी :- जिल्हा परिषद केंद्र शाळा कळंबी येथे नवरात्रोत्सवातील अष्टमीचे औचित्य साधून कन्यापूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासून संस्कार रुजविणे आणि स्त्रीशक्तीप्रती आदराची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय सणांचे धार्मिक, पौराणिक व वैज्ञानिक महत्त्व सांगण्यात आले. घटस्थापनेच्या निमित्ताने पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या धान्याची उगवणक्षमता तपासण्याच्या परंपरेची माहिती देण्यात आली. तसेच नवरात्रोत्सवातील देवीच्या विविध रूपांचे महत्त्व विशद करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व मुलींचे कन्यापूजन करून औक्षण करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविका सौ. सगरे यांनी स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचे आवाहन केले. स्त्रीचा आदर केवळ नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांपुरता मर्यादित न ठेवता तो कायम जपला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शैला घाडगे यांनी कन्यापूजनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना वह्या व पेन या स्वरूपातील लेखन साहित्य भेट दिले.
दोन विद्यार्थिनींचा वाढदिवस साजरा
कन्यापूजनाच्या दिवशी शाळेतील धनश्री ढोले आणि सोनिया अंबावडे या विद्यार्थिनींचा वाढदिवस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी ढोले यांनी स्वखर्चाने केक आणून साजरा केला. या वेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंदाने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास अंगणवाडी सेविका खरात मॅडम, ढोले मॅडम, राजश्री ढोले मॅडम, गौरी गुरव, सौ. शिंदे यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक धनाजी थोरवे, राजेंद्र खोपडे आणि संजय कोळी यांनी केले.
जिल्हा परिषद केंद्र शाळा कळंबी ही केंद्रसमूहातील उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा असून, येथे शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यावर भर दिला जातो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख धनाजी पवार यांनी केले.




