वाईत खाकीचा धडाका! दहीहंडी-गणेशोत्सवापूर्वी दंगा काबूची रंगीत तालीम; शहरभर पोलिसांचा दमदार रूट मार्च.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाईत खाकीचा धडाका! दहीहंडी-गणेशोत्सवापूर्वी दंगा काबूची रंगीत तालीम; शहरभर पोलिसांचा दमदार रूट मार्च.

वाई | दि. ४ : दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वाई पोलिसांनी ‘ॲक्शन मोड’ स्वीकारला आहे. संभाव्य तणाव, जमाव अथवा अनुचित परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्याची क्षमता तपासण्यासाठी महागणपती मंदिर परिसरात जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी दमदार रूट मार्च काढत उत्सवकाळातील सुरक्षा व्यवस्थेची सज्जता दाखवून दिली.
गुरुवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.५० या कालावधीत झालेल्या या रंगीत तालीममध्ये दंगा नियंत्रणाची प्रत्यक्ष कार्यपद्धती तपासण्यात आली. अचानक जमाव वाढणे, परिस्थिती चिघळणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होणे अशा प्रसंगी पोलिस दलाने समन्वयाने आणि तत्परतेने परिस्थिती कशी हाताळावी, याचा सराव करण्यात आला. यावेळी अधिकारी व अंमलदारांना दंगा काबू कारवाईबाबत आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
रंगीत तालीम संपल्यानंतर पोलिस दलाने शहरातून दमदार रूट मार्च काढला. किसनवीर चौक, पी.आर. चौक, जामा मशीद, चावडी चौक, दातार हॉस्पिटल, ब्राह्मणशाही चौक, पुन्हा किसनवीर चौक, मोठा पूल मार्गे हा मार्च वाई पोलीस ठाण्यात पोहोचला.
शहरातील प्रमुख चौक तसेच संवेदनशील भागांतून झालेल्या या संचलनामुळे पोलिसांची सज्जता नागरिकांच्या निदर्शनास आली. आगामी उत्सव काळात अफवा, वाद, जमावबंदीचा भंग किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देत उत्सव काळात विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले. दहीहंडी आणि गणेशोत्सव शांततेत पार पडावा, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य बजावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या रूट मार्चमध्ये वाई पोलीस ठाण्याचे २ अधिकारी, २५ पोलीस अंमलदार आणि १५ होमगार्ड सहभागी झाले होते. याशिवाय पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज आणि मेढा पोलीस ठाण्यांकडून प्रत्येकी ५ पोलीस अंमलदार, सातारा मुख्यालयातील १ आरसीपी पथक तसेच ३ शासकीय वाहने आवश्यक साहित्यासह सहभागी झाली होती.
उत्सव जल्लोषात करा; कायदा हातात घेतलात तर कारवाईला सामोरे जा!
दहीहंडी आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या, वातावरण बिघडविणाऱ्या किंवा शांततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक संदेश पोलिसांच्या या तयारीतून देण्यात आला आहे.
2) वाईत पोलिसांचा ‘नारीशक्ती’ ॲक्शन प्लॅन! १,००० मुलींना स्वसंरक्षणाचे धडे; संकटात घाबरायचं नाही, भिडायचं!

वाई | दि. ४ : ‘महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ या संकल्पनेला कृतीची जोड देत वाई पोलिसांनी ‘नारीशक्ती’ उपक्रमांतर्गत कन्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून देण्यावर या उपक्रमाचा भर होता.
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्या शाळा, वाई येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात शैला टिके-कुलकर्णी व त्यांच्या टीमने विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. विविध प्रसंगांमध्ये हल्ला किंवा धोका उद्भवल्यास घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, स्वतःचा बचाव करणे आणि योग्य पद्धतीने प्रतिकार करणे, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

स्वसंरक्षण ही केवळ शारीरिक ताकदीची बाब नसून आत्मविश्वास, धैर्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची असल्याचा संदेश या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना देण्यात आला. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध स्वसंरक्षण तंत्रे समजून घेतली.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे, सपोनि पवार (पाचगणी पोलीस ठाणे), मपोउपनि काळे तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते दहावीतील तब्बल ९०० ते १,००० विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची क्षमता वाढविणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी निश्चितच उपयुक्त ठरला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
3) वाईत गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!
मंडळांना नियमांचा ‘अल्टिमेटम’; CCTV,

सातारा | वाई, दि. ०४ : आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वाई पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, गणेश मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. पंचायत समितीच्या देशभक्त किसन वीर सभागृहात पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत मंडप उभारणीपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आवश्यक परवानग्या घेणे, मंडपांमध्ये CCTV बसविणे, ध्वनीमर्यादा व वेळेच्या नियमांचे पालन करणे आणि कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे देखावे टाळणे, अशा स्पष्ट सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या.
पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गणेशोत्सव काळात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. अफवा, चुकीचे संदेश अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित करणाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंडळांनी मनोरंजनापुरता उत्सव मर्यादित न ठेवता रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी आणि अन्य सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधित कर्मचारी दररोज मंडळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. मंडळांनी कमिटीची अधिकृत नोंदणी करावी, महावितरणकडून अधिकृत तात्पुरता वीजमीटर घ्यावा आणि मंडप व स्टेजची मजबुती व सुरक्षितता तपासावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
विसर्जन मिरवणुकीतील वाहनांची RTO तपासणी करून घेणे, वाहनांमध्ये कोणतेही स्फोटक अथवा धोकादायक साहित्य नसणे आणि चालक निर्व्यसनी असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी मंडळांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. पदाधिकाऱ्यांनी स्वतः मद्यपान टाळावे आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन करण्यात आले.
डॉल्बीच्या मुद्द्यावर बैठक तापली!
दरम्यान, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देखाव्यांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, महावितरणच्या धोकादायक तारांचा बंदोबस्त तसेच नियमानुसार डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, डॉल्बीच्या मुद्द्यावर उपस्थित नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली.
“हॉस्पिटल परिसरातही मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवली जाते. अश्लील नृत्याचे प्रकार घडतात. गणेशोत्सवाच्या नावाखाली धूप-अगरबत्तीऐवजी गुटखा आणि दारूचा वास येतो. हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा असावा,” असा संतप्त सूर नागरिकांनी बैठकीत व्यक्त केला.
गणेशोत्सव म्हणजे दणदणाट नव्हे, तर भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. त्यामुळे वाईचा गणेशोत्सव पारंपरिक, सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि शांततेतच साजरा झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे, महिला दक्षता समितीच्या सदस्या जागृती पोरे, ज्योती गांधी, सुधा साबळे, मंजिरी पानसे, तनुजा इनामदार, सारिका गवते यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4) वाई:-बावधनमध्ये ‘खाण-क्रशर’विरोधात ग्रामस्थांचा रणसंग्राम!

तहसील कार्यालयाच्या दारात आमरण उपोषण; ‘लेखी निर्णयाशिवाय हटणार नाही’ — पंचक्रोशीचा प्रशासनाला इशारा.
सातारा | वाई, दि. ०३ :
खाणपट्टा आणि स्टोन क्रशरच्या प्रस्तावावरून बावधन पंचक्रोशीतील वातावरण चांगलेच तापले आहे. बावधन येथील गट नं. ३९६६/३ मध्ये गौण खनिज उत्खनन व स्टोन क्रशरला देण्यात आलेल्या कथित मंजुरीविरोधात बावधनसह म्हातेकरवाडी, अजनपटवाडी, वाघजाईवाडी, कणूर आणि देरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य करण्यासाठी बुधवारपासून वाई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पाला विरोध सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभांमध्ये ठराव करून तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण यंत्रणांकडे वेळोवेळी हरकती आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र, एवढा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘क्रशर आला तर पाणी कुठे जाईल?’
प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसरात पाझर तलाव, शेतकऱ्यांच्या विहिरी, नागेवाडी कॅनॉल, म्हातेकरवाडीची पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच गावठाण आणि लोकवस्ती असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे.
खाणकामातून निर्माण होणारी धूळ, क्रशरचा आवाज, अवजड वाहनांची वाढणारी वर्दळ आणि स्फोटकांचा संभाव्य वापर यामुळे शेती, जलस्रोत, भूजल आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
“आमच्या शेतीवर आणि पाण्यावर परिणाम झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल करत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
पंचनाम्याच्या सत्यतेवरच संशय
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कथित पंचनाम्यावरही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. पंचनामा वास्तविक परिस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप करत त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भूमिअभिलेख विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पर्यावरणाशी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
परवानगी रद्द करण्याची ठाम मागणी
गट नं. ३९६६/३ मधील खाणपट्टा व स्टोन क्रशरसाठी देण्यात आलेली कथित परवानगी रद्द करावी, तसेच बावधन पंचक्रोशीच्या पर्यावरणीय आणि जलसुरक्षेला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही खाण-क्रशर प्रकल्पाला भविष्यात परवानगी देऊ नये, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कथित चुकीच्या पंचनाम्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
‘आश्वासन नको, निर्णय हवा!’
प्रशासनाकडून केवळ आश्वासने देऊन आंदोलन थांबवले जाणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. मागण्यांवर लेखी आणि समाधानकारक निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
या उपोषणात गणेश रामचंद्र भोसले, निलेश यशवंत भोसले आणि चंद्रकांत आत्माराम सुतार सहभागी झाले आहेत.
“पाणी, शेती आणि पर्यावरणाशी तडजोड करून उद्योग उभा करण्यास आमचा ठाम विरोध आहे. प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा बावधन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.
खाण-क्रशरचा मुद्दा आता एका गट क्रमांकापुरता न राहता पंचक्रोशीच्या पाणी, शेती आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनावर काय निर्णय घेते, याकडे पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.
5) वाईत ‘डॉल्बी दणदणाट’ला लगाम घाला! ध्वनीमर्यादा झुगारणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईची मागणी; ग्राहक पंचायतचे पोलीस-प्रशासनाला निवेदन.

सातारा | वाई, दि. ०४ :
धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आणि मिरवणुकांच्या नावाखाली वाई शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या कर्णकर्कश डॉल्बीच्या दणदणाटाला तातडीने लगाम घालावा, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत वाई पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयाकडे स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली.
३ सप्टेंबर रोजी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, कार्यक्रमांच्या वेळी ध्वनिक्षेपकांचा निर्धारित आवाज आणि वापराच्या वेळेची मर्यादा पाळली जात नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या शांततेचा भंग होत असून, त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत असल्याचे ग्राहक पंचायतने स्पष्ट केले.
डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, आजारी व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम साजरे करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून नागरिकांची शांतता भंग करण्याचा प्रकार खपवून घेता कामा नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक वापरताना शासनाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादा आणि वेळेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे, आयोजक अथवा संबंधितांवर प्रतिबंधात्मक तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उत्सवाचा आनंद नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरू नये, यासाठी प्रशासनाने डॉल्बी व कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे आणि नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा अखिल भारतीय ग्राहक पंचायतने व्यक्त केली आहे.
6) वाई:-२४ वर्षांची ज्ञानसेवा अन् समाजभानाची वाटचाल; शिक्षक कृष्णा कांबळे यांच्या बहुआयामी कार्याची प्रेरणादायी कहाणी.

वाई, दि. ४ : अध्यापन म्हणजे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे कार्य असते. या विचाराला कृतीची जोड देत श्री नरसिंह हायस्कूल, धोम (ता. वाई) येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. कृष्णा बंडू कांबळे (एम.ए., एम.एड. इंग्रजी) यांनी आपल्या २४ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासात शिक्षण, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि साहित्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कांबळे यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात बालगंगा विद्या मंदिर, चुनाभट्टी-जिते (ता. पेण, जि. रायगड) येथून झाली. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर, विद्यालय प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच डोंगर परिसरात बीजारोपण अशा उपक्रमांत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेतले.
विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या विविध वृक्षांच्या बियांचा उपयोग करून ओसाड डोंगरभागात हरित पट्टा निर्माण करण्याचा अभिनव प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांच्या सहभागातून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पनाही प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यांच्या या पर्यावरणपूरक कार्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचा उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला.
सध्या धोम येथील श्री नरसिंह हायस्कूलमध्ये कार्यरत असताना कांबळे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सामाजिक आणि कलागुणांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत, ग्रामीण-शहरी संस्कृतीची देवाणघेवाण घडविणाऱ्या कार्यशाळा, विविध स्पर्धांचे आयोजन, आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न अशा उपक्रमांतून त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावरही त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील कार्यासोबतच साहित्याचीही त्यांना विशेष आवड असून, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ज्ञानदीप’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. तसेच महापुरुषांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे ‘आपले महापुरुष’ हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. विविध वर्तमानपत्रे आणि दिवाळी अंकांमधून त्यांचे लेख तसेच कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम आणि दिल्ली येथील विविध संस्थांनी घेतली असून, अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
आपल्या या प्रवासामागे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची प्रेरणा, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची मशाल देतानाच पर्यावरण, समाज आणि साहित्याशी नाते जोडणाऱ्या कृष्णा कांबळे यांची वाटचाल आजच्या शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
7) वाई:-बावधनमध्ये सोयाबीन उत्पादकांना आधुनिक शेतीचे धडे; कृषी विभागाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन.

सातारा | बावधन, दि. ४ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन पीक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम बावधन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कीड-रोग व्यवस्थापन आणि कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याबाबत यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. बदलत्या हवामानामुळे पिकांवर होणारे कीड व रोगांचे संभाव्य परिणाम लक्षात घेता, योग्य वेळी कृषी विभागाचा सल्ला घेऊन प्रभावी व्यवस्थापन करावे, असे त्यांनी सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र, बोरगावचे संग्राम पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले. सुधारित लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाला बावधन गणाचे पंचायत समिती सदस्य सचिन भोसले उपस्थित होते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व त्यांचा शेतकऱ्यांना होणारा लाभ याबाबत माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी तानाजी यमगर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकृषी अधिकारी निखिल मोरे यांनी केले, तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी भाग्यश्री कदम यांनी मानले. मंडळ कृषी अधिकारी वाई यांच्या अधिनस्त कर्मचारी तसेच ज्योतिर्लिंग किसान गट, बावधन यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणास बावधन परिसरातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




