शिक्रापूरच्या वडजाई नगरमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष!
पत्रकार योगिता पाटील शिरूर तालुका महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिक्रापूरच्या वडजाई नगरमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष!

भक्ती, एकता आणि उत्साहाचा जयघोष; दांडिया, भजन आणि महाप्रसादाने नऊ दिवस रंगले भक्तिमय वातावरण!
शिक्रापूर | प्रतिनिधी
शिक्रापूर येथील वडजाई नगरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यंदा नवरात्रोत्सवाचे पाचवे वर्ष असून, देवीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत संपूर्ण परिसरात उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात आली. महिला, बालगोपाल तसेच पुरुष मंडळींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. पारंपरिक दांडियाच्या तालावर परिसरातील नागरिक एकत्र येत असल्याने वडजाई नगरमध्ये आनंद, आपुलकी आणि सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडले.
यासोबतच भजनी मंडळींच्या भक्तिमय कार्यक्रमाने वातावरण अधिकच प्रसन्न झाले. भक्तिगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर देवीमय झाला होता. नवरात्रोत्सवादरम्यान दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत महाप्रसादाचा खर्च उचलला. तसेच उपवास करणाऱ्या भाविकांसाठी उपवासाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपण्याचा संदेश देण्यात आला.
या नवरात्रोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पत्रकार योगिता पाटील यांनी देवीची मूर्ती भेटस्वरूपात दिली. त्यांच्या या योगदानामुळे उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
पाचव्या वर्षातील हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता महिला, पुरुष, बालगोपाल आणि परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारा सामाजिक एकोप्याचा उत्सव ठरला. भक्ती, परंपरा, दातृत्व आणि आनंद यांचा सुंदर संगम साधत वडजाई नगरमधील नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला.




