वाई:-किसन वीरांचे स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचे योगदान होते – मा.श्री.माधवराव गुरव.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-किसन वीरांचे स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचे योगदान होते – मा.श्री.माधवराव गुरव.

वाई, दि.०४ सप्टेंबर २०२६
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ज्या विभूतींनी महत्त्वाचे योगदान दिले त्यापैकी थोर देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी किसन वीर हे एक होते. त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मोलाचे आहे. असे प्रतिपादन मा. श्री. माधवराव गुरव यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने थोर देशभक्त व स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या नियोजनानुसार संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर होते. याप्रसंगी ॲड्. प्रतापसिंह देशमुख, श्री. बाळासाहेब कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. गुरव म्हणाले, किसन वीर आबांकडे राष्ट्रभक्ती व नेतृत्वगुण त्यांच्या वडिलांकडून आले होते. कवठ्यात बालपण गेल्यानंतर, त्यांनी बालपणापासूनच इंग्रज धार्जिण्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली. नियमित व्यायाम करणे आणि क्रांतिकारकांच्या जीवन कार्यावरील पुस्तके बालपणापासून वाचायला सुरुवात केल्यामुळे, त्यांच्या मनात देशप्रेम निर्माण झाले. किसन वीर आबांकडे युवकांचे संघटन करण्याचे कौशल्य होते. वैयक्तिक कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाला प्राधान्य दिले. भूमिगत राहून देशसेवेचे कार्य केले. तुफान सेना व प्रतिसरकार मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर त्यांनी ब्रिटीश सरकारला सळो की पळो केले. किसन वीरांचे जीवन हे संघर्षमय होते. नि:स्वार्थ समाजसेवा, चारित्र्यसंपन्नता, उदारता, परखडपणा, कर्तव्यदक्षता, कनवाळूपणा व धाडसीपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात केले. धोम धरण, राजेंद्र विद्यालयाची स्थापना, अनेक कारखान्यांची उभारणी करून त्यांनी शेतकऱ्यांचे हित पाहिले. किसन वीरांनी जनता शिक्षण संस्थेची घालून दिलेली घडी कै. प्रतापराव भोसले यांनी जीवापाड जोपासली. विद्यमान अध्यक्ष मदनदादा भोसले यांनीही ती परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर म्हणाले, महापुरुषांचे विचार हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. किसन वीरांनी ज्या ध्येयाने अनेक संस्था निर्माण केल्या त्यात आपण आपल्या कार्यकर्तृत्वाने भर टाकायला पाहिजे. त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणाला, सहकार व शिक्षण क्षेत्राला जास्त प्राधान्य दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी ताटे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय श्री. हरेश कारंडे यांनी करून दिला. आभार उपप्राचार्य श्री. श्रावण पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री. राहुल तायडे व श्रीमती रेश्माबानो मुलानी यांनी केले.
कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे आजी माजी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




