पाटण:-निसरे–मारूल हवेली रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

निसरे–मारूल हवेली रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; रस्त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी.
पाटण : -पाटण तालुक्यातील निसरे ते मारूल हवेली या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, असा प्रश्न उपस्थित होईल, इतकी या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे.
या रस्त्यावर नावडी, सोन्याची वाडी, मारूल हवेली, कोरिवळे आणि पापडे यांसारखी महत्त्वाची गावे आहेत. या गावांतील नागरिकांसह विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि अन्य प्रवाशांची या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर अपघात होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी टिकाऊ आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संबंधित अधिकारी लक्ष देणार का?
निसरे ते मारूल हवेली हा मार्ग परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा असल्याने त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्याची गुणवत्ता राखून दर्जेदार काम करावे आणि भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
संबंधित लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.




