वाई:-वाईच्या घाटांवर ‘नशेचा बाजार’; पोलिसांनी रातोरात आवळला मद्यपींचा पाश!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वाईच्या घाटांवर ‘नशेचा बाजार’; पोलिसांनी रातोरात आवळला मद्यपींचा पाश!

सार्वजनिक ठिकाणी दारूचा अड्डा मांडणाऱ्यांवर पोलिसांचा छापा; १२ जण ताब्यात, सहा गुन्हे दाखल.
वाई, दि.०२:देवस्थानांच्या परिसरात मद्यपान, घाटांवर दारूच्या बाटल्यांचा खच, सार्वजनिक ठिकाणी नशेत शिवीगाळ आणि स्मशानभूमीजवळ मद्यपींचा धुडगूस… वाई शहरातील या उच्छादाला अखेर पोलिसांनी चाप लावला आहे. सार्वजनिक शांतता भंग करून नागरिक आणि भाविकांना त्रास देणाऱ्यांविरोधात वाई पोलिसांनी १ सप्टेंबरच्या रात्री धडक मोहीम राबवत १२ मद्यपींना ताब्यात घेतले.
शहरातील संवेदनशील ठिकाणांवर मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांविरोधात एकाच वेळी कारवाई करण्यासाठी पोलिसांची चार विशेष पथके मैदानात उतरली. गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड तसेच विविध स्मशानभूमी परिसरात पोलिसांनी अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन बसणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
काही ठिकाणी मद्यपान करून दारूच्या बाटल्या फोडणे, परिसर अस्वच्छ करणे, तर काही ठिकाणी नशेत शिवीगाळ करून नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू होते. अशा प्रकारांवर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला.
पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी विविध ठिकाणी कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले. सर्वांना वाई पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर संबंधितांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कारवाई करण्यात आली.
नशेत धिंगाणा; कायद्याचा थेट दणका!
या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पवित्र स्थळांवर नशेबाजीला ‘नो एन्ट्री’!
मंदिर परिसर, नदीघाट, स्मशानभूमी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणे, बाटल्या फोडणे किंवा नागरिकांना त्रास देणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश वाई पोलिसांच्या या कारवाईतून देण्यात आला आहे.
नागरिकांची शांतता आणि भाविकांच्या श्रद्धेचा अवमान करणाऱ्या प्रकारांवर यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाणार, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज भोसले, उमेश लोखंडे, प्रसाद दुदूस्कर, राम कोळी, गोरख दाभाडे, विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे तसेच होमगार्ड अभिजीत येवले सहभागी झाले होते.
वाई शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांनी सावध व्हावे; पोलिसांची करडी नजर आता अशा ‘नशेच्या अड्ड्यां’वर कायम राहणार आहे.




