वाईच्या बेशिस्त वाहतुकीवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाईच्या बेशिस्त वाहतुकीवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

१४ सप्टेंबरपासून शहरात नवी वाहतूक शिस्त; अतिक्रमण, टपऱ्या, बेकायदा पार्किंग अन् फ्लेक्सवर थेट कारवाई.
सातारा | वाई, दि. ०२ : वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या वाई शहराला आता मोकळा श्वास देण्याच्या दिशेने प्रशासनाने निर्णायक पाऊल टाकले आहे. १४ सप्टेंबरपासून शहराचा वाहतूक आराखडा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरविला जाणार असून बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे, अनधिकृत टपऱ्या, रस्त्यावर माल मांडणारे व्यापारी आणि विनापरवाना फ्लेक्स यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे ‘नियम पाळा, नाहीतर कारवाईला सामोरे जा’ असा थेट संदेश प्रशासनाने दिला आहे.
सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा येथे झालेल्या बैठकीत प्रशासन, पोलीस, नगरपरिषद, व्यापारी आणि नागरिकांनी शहराच्या वाहतूक प्रश्नावर जोरदार चर्चा केली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कठोर कारवाई करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी १४ सप्टेंबरपासून वाहतूक आराखडा लागू करण्याची घोषणा करत शहरातील प्रमुख रस्त्यांवर पांढरे पट्टे, दिशादर्शक फलक आणि आवश्यक वाहतूक व्यवस्था केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र बँकेमागे पार्किंगची सुविधा निर्माण करण्याचे नियोजन असून अस्ताव्यस्त पार्किंगवर कारवाई केली जाणार आहे.
४००-५०० टपऱ्यांवर प्रशासनाची नजर!
वाई शहरात सुमारे ४०० ते ५०० टपऱ्या असल्याचे सांगत त्यातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. अतिक्रमण विभागासाठी पाच वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर झाला असून आता अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला गती मिळणार आहे.
भाजी मंडई परिसरात बूम बॅरियर उभारण्याचे नियोजन असून रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे.
“५० हजार नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काही जणांवर कठोर कारवाई करावी लागली तरी ती केली जाईल,” असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष सावंत यांनी दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेची तीव्रता स्पष्ट झाली आहे.
रस्त्यावर दुकान थाटाल तर कारवाई अटळ!
मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत स्वयंशिस्तीचा इशारा दिला. दुकानाच्या हद्दीबाहेर माल, जाहिरातीचे फलक, लोखंडी जाळ्या अथवा अन्य साहित्य ठेवून रस्ता अडविणे आता खपवून घेतले जाणार नाही.
अतिक्रमणाबाबतची ही तिसरी बैठक असून यापुढे केवळ बैठका घेण्याऐवजी प्रत्यक्ष कारवाईवर भर दिला जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले. शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमणे हटविणे अपरिहार्य असून त्यासाठी पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे दळवी यांनी सांगितले.
‘दिवसा माल उतरवला तर रस्ता अडवणाऱ्यांवर कारवाई’
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनीही वाहतूक कोंडीवर कठोर भूमिका घेतली. मालवाहू वाहनांनी दिवसा रस्त्यावर उभे राहून माल उतरवू नये. रात्री १० नंतर किंवा सकाळी लवकर माल उतरवावा, अशा स्पष्ट सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या.
विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुकानाबाहेर रस्त्यावर साहित्य ठेवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिकेने १० वॉर्डन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करत पोलीस, होमगार्ड आणि वॉर्डन यांच्या मदतीने वाहतूक नियंत्रण करण्याचे नियोजन असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.
बंद वाहनेही आता रस्त्यावर दिसणार नाहीत!
वाईच्या रस्त्यांवर दिवसेंदिवस जागा गिळंकृत करणाऱ्या बंद आणि दीर्घकाळ न हलविलेल्या वाहनांवरही प्रशासनाची नजर राहणार आहे. रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेली बंद वाहने हटवून निश्चित डेपोमध्येजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि अकॅडमी यांनीही रस्त्यावर वाहने उभी न करता स्वतःच्या जागेत पार्किंगची व्यवस्था करावी, असे स्पष्ट करण्यात आले.
पार्किंगला पर्याय; ‘पे अँड पार्क’ची मागणी
बैठकीत नागरिकांनी पार्किंगच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरत पालिकेच्या जागेत ‘पे अँड पार्क’ योजना सुरू करण्याची मागणी केली. किसनवीर चौक ते सरकारी दवाखाना मार्गावरील दुचाकी पार्किंग, गणपती मंदिराजवळ पुलावर बसणारे विक्रेते आणि पर्यटकांच्या वाहनांमुळे होणारी कोंडी यावरही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
नगरसेवक भारत खामकर यांनी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याबरोबरच बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करून नवीन कॅमेरे बसविण्याची मागणी केली. किसनवीर चौकातील दुकानदार व कर्मचाऱ्यांसाठी चक्रेश्वर संस्थानची जागा भाडेतत्त्वावर घेऊन दुचाकी पार्किंग उपलब्ध करावी, तसेच दत्त मंदिराजवळील नवीन पुलाखाली चारचाकी पार्किंगची सुविधा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
वाईकरांनो, आता नियम पाळा!
शहरातील वाहतूक व्यवस्था केवळ पोलिसांच्या बळावर सुधारू शकत नाही. पालिका, पोलीस, व्यापारी आणि नागरिकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, असा सूर बैठकीत उमटला.
वाहतूक आराखड्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रिक्षाद्वारे जनजागृती करण्याची सूचना करण्यात आली. शहर विद्रूप होऊ नये, रस्ते मोकळे राहावेत आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाईकरांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, शहरातील कमी उंचीच्या विद्युत तारांचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणला पत्र देण्यात आले आहे. तसेच नवीन बांधकामे मंजूर आराखड्यानुसारच झाली आहेत का, विनापरवाना फ्लेक्स कोणी लावले आहेत का, याची तपासणी करण्याची मागणीही बैठकीत झाली.
आता १४ सप्टेंबरची तारीख जवळ आली आहे. त्यानंतर बैठका नव्हे, तर रस्त्यावर कारवाई दिसणार का, याकडे वाईकरांचे लक्ष लागले आहे.
2) वाई पालिकेची सभा ‘हायव्होल्टेज’! प्रभाग ७-८ वरून नगरसेवक आमनेसामने; ९२ कोटींच्या योजनांना निधीची आस – गाळ्यांचे लिलाव रखडले, शौचालयांची दुरवस्था; अधिकाऱ्यांच्या कारभारावरही नगराध्यक्षांचा संताप.

वाई, दि. ०२ : वाई नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी अक्षरशः वादळी ठरली. विकासकामांचे श्रेय, प्रभागनिहाय हस्तक्षेप, निधीची चणचण, रखडलेले लिलाव, निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. तब्बल ६१ विषयांच्या चर्चेत प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मधील विकासकामांनी सभागृहातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले.
प्रभाग क्रमांक ८ मधील मंजूर विकासकामांचा विषय पुन्हा सभागृहात मांडल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित कामांना यापूर्वीच मंजुरी मिळालेली असताना पुन्हा तोच विषय सभेपुढे आणण्याची गरज काय, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला. आपल्या प्रभागातील विकासकामांमध्ये इतर नगरसेवकांचा हस्तक्षेप नको, अशी भूमिका घेत त्यांनी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यावर काही नगरसेवकांना झुकते माप दिल्याचा आरोप केला.
या आरोपानंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. समर्थक-प्रतिसादकांच्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती सभात्यागाच्या चर्चेपर्यंत पोहोचली. भाजपाच्या नगरसेविका केतकी पाटणे मोरे यांनी यापूर्वी ठराव मंजूर झाले असल्यास ते सभागृहाच्या निदर्शनास आणावेत, अशी मागणी केली. नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक प्रसाद बनकर आणि विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ८ मध्ये सुमारे ३५ लाख रुपयांची विकासकामे मंजूर असल्याचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्पष्ट केले. कामांना मंजुरी असतानाही सभात्यागाची वेळ का आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, याचवेळी पालिका प्रशासनाच्या कामकाजात नियोजनाचा अभाव आणि शिस्तीची कमतरता असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली.
९२ कोटींच्या योजनांना निधीची प्रतीक्षा!
वाई शहराच्या भविष्यातील पाणी आणि सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्नही सभेत ऐरणीवर आला. शहरासाठी सुमारे २२ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प, तर जवळपास ७० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी आवश्यक मोठा निधी पालिकेच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शासनाकडून निधी मिळविण्यासाठी राजकीय पातळीवर एकजुटीने पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांनी सर्व नगरसेवकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शासनदरबारी एकत्रित पाठपुरावा करण्याची भूमिका मांडली. तर नगरसेवक प्रसाद बनकर यांनी ना. मकरंद पाटील यांच्यासह ना. जयकुमार गोरे यांच्याकडेही निधीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.
पालिकेचे गाळे धूळ खात; उत्पन्नाचा मोठा स्रोत ठप्प
नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांचे गेल्या काही वर्षांपासून लिलावच रखडल्याचा मुद्दा नगराध्यक्षांनी उपस्थित केला. पालिकेच्या मालमत्तेतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित राहणे गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. सर्व गाळ्यांचे सर्वेक्षण करून क्षेत्रफळानुसार भाडे आणि अनामत रक्कम निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
सार्वजनिक शौचालये नावापुरतीच?
वाई शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेवरही नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली. नगरसेविका ज्योती गांधी यांनी अनेक शौचालयांमध्ये वीज आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. परिणामी शहरातील सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.
फेरनिविदेवर प्रश्नचिन्ह; पारदर्शकतेची मागणी
निविदा प्रक्रियेवरूनही सभेत प्रशासनाची कोंडी झाली. नगरसेविका नीलिमा खरात यांनी स्थायी समितीत निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित विषय पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर का आणण्यात आला नाही, असा सवाल केला. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सभेत अधिकारी गायब; नगराध्यक्षांचा पारा चढला
सभा सुरू असतानाच शाखा अभियंता कोणालाही कल्पना न देता निघून गेल्याच्या प्रकारामुळे नगराध्यक्षांचा संताप अनावर झाला. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकाऱ्यांचा पुरेसा अंकुश नसल्याची थेट टीका त्यांनी केली. काही कर्मचारी महिला नगरसेवकांचे फोनही घेत नसल्याच्या तक्रारी सभागृहात करण्यात आल्या.
एकूणच, ६१ विषयांच्या या सभेत बहुतांश प्रस्तावांना मंजुरी मिळाली असली तरी प्रभाग ७-८ मधील राजकीय संघर्ष, ९२ कोटींच्या पाणी-सांडपाणी योजनांचा निधी, रखडलेले गाळे, थकीत वसुली, शौचालयांची दुरवस्था आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार या मुद्द्यांनी पालिकेच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत.
आता सभागृहात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचे रूपांतर प्रत्यक्ष विकासकामांत कधी होते आणि ९२ कोटींच्या योजनांसाठी निधी कधी मिळतो, याकडे वाईकरांचे लक्ष लागले आहे.
3) कराडात क्रीडा क्षेत्राचा दिमाखदार गौरव; ५० मान्यवरांना ‘महाराष्ट्र क्रीडा रत्न’चा सन्मान!

कराड, दि. ०२ :
मैदान गाजविणाऱ्या खेळाडूंपासून क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपर्यंत तब्बल ५० मान्यवरांच्या कर्तृत्वाला कराडच्या भूमीत मानाचा मुजरा करण्यात आला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हॉकी लीजंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला महाराष्ट्रासह विविध राज्यांतील खेळाडू, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची उपस्थिती होती.
कराडचे सुपुत्र संजय शेटे यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या महासचिवपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच हिंदकेसरी संतोष वेताळ यांची आइस हॉकी राष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
कुस्तीतील योगदानाला जीवनगौरवाची सलामी
महाराष्ट्राच्या कुस्तीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक, एमआयटीच्या क्रीडा विभागाचे प्रमुख आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी प्रा. विलास कथुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंदुस्तानचे पाचवे हिंदकेसरी आणि महाराष्ट्राचे पाचवे महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह यांना सहकारमहर्षी लोकनेते बाबुरावजी शेटे स्मृती क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राच्या कुस्तीतील आघाडीचे नाव, दुहेरी महाराष्ट्र केसरी आणि पुणे महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी शिवराज राक्षे यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय धावपटू सुदेशना शिवणकर हिच्या क्रीडा प्रवासामागे भक्कम आधार देणारे तिचे आई-वडील हणमंत शिवणकर व सौ. प्रतिभा शिवणकर यांना कै. विश्वंभर कदम स्मृती आदर्श माता-पिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचाही गौरव
या सोहळ्यात प्रा. संजय दुधाने यांना साहित्यरत्न, ज्येष्ठ कुस्ती निवेदक बाबाजी लीमन यांना मल्लयुद्ध कुस्ती स्वररत्न, बाळासाहेब तरस यांना समाजरत्न, विकास पाटील काले यांना शिक्षणरत्न, वस्ताद ताराचंद कलापुरे यांना कुस्तीभूषण, तर ग्रामविकास अधिकारी संतोष साठे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला भारतीय कुस्ती महासंघाचे माजी उपाध्यक्ष हरीश बापू कदम, कराड समिती सदस्य तथा जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. धनंजय पाटील काका आटकेकर, पंचायत समिती उपसभापती अनिताताई सतीश वेताळ, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त वस्ताद नजरुद्दीन नायकवडी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार नियोजन समितीचे सदस्य प्रा. नितीन शिंदे तसेच पुरस्कार समितीचे स्वागताध्यक्ष वस्ताद प्रल्हाद जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
दहाव्या वर्षातही क्रीडाप्रेमाची परंपरा कायम
या पुरस्कार सोहळ्याचे यंदा दहावे वर्ष आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देणे, नवोदितांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला व्यापक व्यासपीठ मिळवून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
क्रीडा क्षेत्रातील ही गौरवपरंपरा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सोहळ्याचे प्रमुख तथा आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा. पै. अमोल साठे यांनी यावेळी सांगितले.
खेळाडूंच्या कर्तृत्वाला दाद, ज्येष्ठांच्या योगदानाला सलाम आणि नव्या पिढीला प्रेरणेची दिशा देणारा हा सोहळा कराडच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय पर्व ठरला.




