आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-वाई अर्बन बँकेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-वाई अर्बन बँकेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष.

सातारा | वाई, दि. १६ : स्वातंत्र्यदिनानिमित्त दि वाई अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. संचालक महेश राजेमहाडिक यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला.
यावेळी बँकेचे अध्यक्ष अनिल देव, संचालक माधव कान्हेरे, रमेश ओसवाल, काशिनाथ शेलार, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, प्रीतम भुतकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, संचालिका व नगरसेविका ज्योती गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे, सरव्यवस्थापक संतोष बागुल, सुहास पानसे, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. देशाच्या विकासासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. उत्साह, देशभक्ती आणि शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

2) वाई:-काळूबाई भक्तांना आता वाट शोधणे होणार सोपे; मांढरदेवात दिशादर्शक फलकांची सुविधा.

वाई, दि. १७ : मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वाई पोलिसांच्या पुढाकारातून परिसरात दिशादर्शक फलकांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्र सागर मांढरे आणि मंगेश मांढरे यांनी सामाजिक बांधिलकीतून हे फलक उपलब्ध करून दिले.


मांढरदेव हे महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असून, वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र परिसरातील विविध मार्ग व ठिकाणांची माहिती देणारे पुरेसे दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन वाई पोलिसांनी सागर मांढरे (मांढरे सरकार उद्योग समूह) व मंगेश मांढरे (गायत्री हॉटेल) यांच्याशी संपर्क साधला.
भाविकांच्या सुविधेसाठी दोघांनीही तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत दिशादर्शक फलक उपलब्ध करून दिले. दि. १४ ऑगस्ट रोजी हे सर्व फलक वाई पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे मांढरदेव परिसरात येणाऱ्या भाविकांना विविध मार्ग व ठिकाणे शोधणे सुलभ होणार असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासही मदत मिळणार आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, बीट अंमलदार उद्धव लेंभे, ट्रॅफिक पोलीस गोरख दाभाडे, रूपेश जाधव कोळेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच ऋषिकेश जाधव, काळुराम पार्टे, गणेश मांढरे, डॉ. जगताप आदी उपस्थित होते.
भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक होत असून, ‘सेवेतून श्रद्धेला दिशा’ देणारा हा उपक्रम ठरला आहे.

3) वाई:-स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिव्यांगांना मदतीचा हात; ‘संघर्ष’ संस्थेतर्फे साहित्याचे वाटप.

वाई, दि. १६ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ‘संघर्ष’ दिव्यांग सामाजिक संघटना, सातारा जिल्ह्याच्या वतीने वाई शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विविध आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. वाई तहसील कार्यालयात झालेल्या या उपक्रमातून गरजू दिव्यांगांना दैनंदिन जीवनात मोठा आधार मिळाला.
या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना व्हीलचेअर, चालण्याच्या कुबड्या, वॉकर तसेच श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास तहसीलदार सोनाली मिटकरी, पंचायत समिती सदस्य तथा संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक स्वप्निल गायकवाड, नगराध्यक्ष अनिल सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष बाजीगर इनामदार, संचालक डॉ. शेखर कांबळे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक गायकवाड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगाच्या पाठीशी ‘संघर्ष’ संस्था खंबीरपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बाजीगर इनामदार यांनी संस्थेच्या वर्षभरातील सामाजिक कार्याचा आढावा मांडला. तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून नगरपरिषदेकडून सहकार्य करण्याचे जाहीर केले.
विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हाध्यक्ष बाजीगर इनामदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

4) वाई:-काही महिन्यांतच रस्त्याची चाळण; गंगापुरीत ‘खड्ड्यांचा विकास’!

वाई, दि. १६ : काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण झालेल्या वाई–धोम मार्गाची गंगापुरी परिसरात अक्षरशः चाळण झाली आहे. शाळा क्रमांक ५ समोरील रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, “रस्ता केला की खड्डे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
शाळा क्रमांक ५ समोर दररोज स्कूल बससह मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हजारो विद्यार्थी, पालक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची या मार्गावरून ये-जा सुरू असते. त्यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी रस्त्यावर आडवा चर खोदण्यात आला होता. मात्र तो योग्य पद्धतीने बुजविण्यात न आल्याने त्याचे आता मोठ्या खड्ड्यात रूपांतर झाले आहे. अवघ्या काही महिन्यांत डांबरीकरणाची झालेली दुरवस्था पाहता रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि त्यावर झालेला खर्च याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
“एखादा निष्पाप बळी गेल्यानंतरच पालिका प्रशासन जागे होणार का?” असा सवाल करत नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. “अरे अजून किती खाणार? तुम्हाला भस्म्या झाला आहे का? मढ्याच्या टाळूवरचे लोणी अजून किती खाणार?” अशा संतप्त शब्दांत नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, शाळा क्रमांक ५ प्रभाग क्रमांक ७ मध्ये की ८ मध्ये, यावर चर्चा करण्यात धन्यता मानणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष रस्त्याच्या प्रश्नावर लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. “आमच्या प्रभागात आम्ही विकासकामे करू, तुम्ही तुमच्या प्रभागात करा,” अशा राजकीय वादांनी सभागृह दणाणून सोडणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या जीवाशी निगडित प्रश्नावर मात्र गप्प का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी संतप्त नागरिकांची अपेक्षा आहे.

5) कराड:-मलकापूरच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष
ध्वजारोहणासह देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला सोहळा.

मलकापूर, दि. १६ : श्री. मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. कृषी व फलोत्पादन विभाग, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब बाळकृष्ण पाटील (कासेगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल अर्जुन शिनगारे (मलकापूर) होते.
यावेळी जिव्हाळा उद्योग समूहाचे रमेश बाबुराव जगताप, माजी सैनिक अण्णासो आनंदराव कदम, ज्ञान प्रबोधिनी उंब्रजचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र मुकुटराव देशमुख आणि उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्याचे प्रसन्न अरुण भिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास श्री. मळाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. बी. पाटील, सचिव अशोकराव थोरात, संचालिका तथा नगरसेविका डॉ. स्वाती रणजीत थोरात, श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडीचे चेअरमन अजित ज्योतीराम थोरात, उद्योजक इरफान निजाम मोमीन, विकास रघुनाथ पाटील, रिअल इस्टेट उद्योजक विकास लालासो शेवाळे, भारतीय सैन्य जवान दशरथ हजारे तसेच माजी नेव्ही अधिकारी शिवाजीराव धुमाळ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी देशप्रेमाची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यालयाचा परिसर राष्ट्रभक्तीच्या जयघोषाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य एम. पी. फराळे, उपमुख्याध्यापक जे. बी. पाटील, पर्यवेक्षिका एस. आर. भोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. के. तांबवेकर, क्रीडा विभाग प्रमुख जे. एन. कराळे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख एस. डी. पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी परिश्रम घेतले.

6) कराड:-मानवाधिकारांच्या लढ्याला नवे बळ; अनिल कचरे यांची राज्य महासचिवपदी निवड.

कराड दि. १७ : मानवाधिकार कमिटी, महाराष्ट्र राज्यच्या महासचिवपदाची जबाबदारी अनिल कचरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली.
मानवाधिकारांचे रक्षण, सामाजिक न्यायासाठी पाठपुरावा तसेच वंचित आणि गरजू घटकांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कमिटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी कचरे यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मानवाधिकार कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यानंतर रामकुमार पाल, स्नेहल शहा, भगवान बागुल, शिवाजीराव देवकर यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कचरे यांचे अभिनंदन केले.
मुंबईतील दादर येथे भारतीय जनता पक्ष माथाडी कामगार युनियन, मुंबई शहरचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण वाळवे यांच्या हस्ते अनिल कचरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाळवे यांनी त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतानाच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना अनिल कचरे म्हणाले, “माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे.”
कचरे यांच्या नियुक्तीचे विविध क्षेत्रांतून स्वागत होत असून, त्यांच्या माध्यमातून मानवाधिकारांच्या प्रश्नांना राज्यस्तरावर अधिक प्रभावीपणे वाचा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button