
1) रायरेश्वरच्या कुशीत फुलला रंगांचा उत्सव!
रानफुलांच्या बहाराने पठाराचे रूप पालटले;

निसर्गप्रेमींसह शिवभक्तांचीही वाढली पावले
सातारा | वाई, दि. ३० : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायरेश्वर पठारावर सध्या निसर्गाने रंगांची उधळण केली असून, हिरव्यागार गवताच्या पार्श्वभूमीवर उमललेल्या असंख्य रानफुलांनी संपूर्ण पठार जणू रंगीबेरंगी गालिच्याने सजले आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धातील या फुलोत्सवाने रायरेश्वरच्या सौंदर्यात विलक्षण भर पडली असून, कास पठाराची आठवण करून देणारे हे दृश्य पर्यटक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे.
तेरडा, सोनकी, मिकी माऊस यांसह विविध जातींच्या रानफुलांनी पठारावर बहर घेतला आहे. पावसाळ्यानंतर सर्वत्र पसरलेली हिरवाई आणि त्यातून डोकावणारी रंगीबेरंगी फुले यामुळे रायरेश्वरचे रूप अधिकच खुलले आहे. या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी सातारा जिल्ह्यासह विविध भागांतून पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.
रायरेश्वरचे आकर्षण केवळ फुलांच्या बहरापुरते मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्याचे ऐतिहासिक महत्त्व लाभलेली ही भूमी इतिहास आणि श्रद्धेचेही केंद्र आहे. रायरेश्वर मंदिर, पांडवकालीन लेणी, जननी देवी मंदिर, सात रंगांची माती असलेली विहीर, गोमुखकुंड, शिवकालीन पाण्याची टाकी तसेच नाकिंदा (अस्वलखिंड) यांसारखी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.
पठारावरून सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य अनुभवता येते. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर परिसरातील गड-किल्ल्यांचे दर्शन येथून घडते. विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी रायरेश्वरचा परिसर निसर्गसौंदर्याने अधिकच खुलून दिसतो.
पर्यटन सर्किटला मिळू शकते नवी दिशा
वाईच्या पश्चिम भागातील रायरेश्वर, केंजळगड आणि कमळगड हे इतिहास आणि निसर्गाचा अनोखा वारसा जपणारे गड आहेत. या तिन्ही स्थळांचा एकत्रित पर्यटन सर्किट म्हणून नियोजनबद्ध विकास झाल्यास पश्चिम भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. वाईमार्गे रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. तेथून साधारण २० ते ३० मिनिटांच्या चढाईनंतर पठारावर पोहोचता येते.
पर्यटनातून स्थानिकांना रोजगाराची संधी
रायरेश्वर परिसराची लोकसंख्या सुमारे ५०० असून, सध्या सुमारे १५० नागरिक येथे वास्तव्यास आहेत. जंगम समाजाची सुमारे ४० कुटुंबे येथे आहेत. रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने अनेक कुटुंबांना बाहेरगावी स्थलांतर करावे लागले आहे. त्यामुळे पर्यटनविकासाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्याची मोठी संधी येथे उपलब्ध आहे.
स्थानिक मार्गदर्शक, होमस्टे, पारंपरिक खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने आणि हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास पर्यटनासोबतच स्थानिकांसाठी रोजगाराची नवी दारे खुली होऊ शकतात.
निसर्गसंपदा जपून विकासाची गरज
“रायरेश्वरवर सप्टेंबरमध्ये फुलणाऱ्या रानफुलांचा बहर पर्यटकांसाठी स्वतंत्र आकर्षण ठरू शकतो. रायरेश्वर मंदिर, लेणी, सात रंगांच्या मातीची विहीर यांसह येथील ऐतिहासिक व नैसर्गिक ठेवे जतन करणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध पद्धतीने पर्यटनाचा विकास करून आवश्यक सुविधा उपलब्ध केल्यास पर्यटकसंख्या वाढण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात,” असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी डॉ. अजय पाटील यांनी व्यक्त केले.
सुविधा वाढविल्यास पर्यटनाला वेग
रायरेश्वरचा सध्याचा फुलांचा बहर हा केवळ काही आठवड्यांचा निसर्गोत्सव न राहता, या परिसराच्या पर्यटन विकासाची ओळख बनू शकतो. स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिशादर्शक फलक, सुरक्षित पायवाटा, पार्किंग, स्थानिक मार्गदर्शक तसेच पर्यावरणपूरक पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्यास रायरेश्वर-केंजळगड-कमळगड पर्यटन सर्किटला निश्चितच नवी दिशा मिळू शकते.
2) सातारा:-जिल्हा बँकेच्या मैदानात ‘बाबा-आबा’ची युती? राजकीय हालचालींना वेग!

शिवेंद्रसिंहराजे–मकरंद पाटील चर्चेने राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत; संयुक्त पॅनल की बिनविरोध, उत्सुकता शिगेला
सातारा | दि. ३० : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच रविवारी घडलेल्या एका महत्त्वपूर्ण भेटीने चर्चांना नवे वळण मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय अंतरावर असलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील पुन्हा एकाच टेबलावर आल्याने महायुतीच्या संभाव्य एकजुटीच्या चर्चेला वेग आला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याच्या शक्यतेवर दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच जिल्ह्यातील राजकीय गणिते झपाट्याने बदलू लागली आहेत. भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरणार की मित्रपक्षांसोबत समन्वय साधणार, महायुतीचे घटकपक्ष एकत्र राहणार की स्वतंत्र पॅनल उभे करणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्क-वितर्क सुरू होते. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे आणि मकरंद पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण बाजूला ठेवण्याची भूमिका मांडल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग आला. त्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही भाजपच्या संभाव्य भूमिकेबाबत संकेत दिल्याने महायुतीतील समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
शनिवारी भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्यानंतर मित्रपक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. त्यानंतर रविवारी शिवेंद्रसिंहराजे आणि मकरंद पाटील यांची भेट झाली. या भेटीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संभाव्य राजकीय समीकरणांवर बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेतील मागील राजकीय घडामोडींनंतर दोन्ही नेत्यांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र येतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. रविवारी झालेल्या भेटीमुळे या चर्चेला आता नवे परिमाण मिळाले आहे.
जागावाटपापासून उमेदवारीपर्यंत खलबते
महायुतीच्या माध्यमातून एकत्र पुढे जायचे झाल्यास जागावाटप कसे करायचे, मित्रपक्षांशी समन्वय कसा साधायचा, कोणत्या मतदारसंघात कोणाचा दावा राहणार आणि स्थानिक इच्छुकांची नाराजी कशी हाताळायची, यासह विविध मुद्द्यांवर प्राथमिक विचारविनिमय झाल्याचे समजते.
मात्र, दोन नेत्यांची भेट झाली म्हणजे अंतिम राजकीय समझोता झाला, असा निष्कर्ष काढणे सध्या घाईचे ठरणार आहे. कारण जिल्हा बँकेच्या २१ संचालक जागांसाठी इच्छुकांची संख्या आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे महायुतीसमोर मोठे आव्हान असणार आहेत.
२१ जागा अन् इच्छुकांची गर्दी!
वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय झाला तरी प्रत्यक्ष मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून स्थानिक पातळीवर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटप, उमेदवारी आणि मतदारसंघनिहाय समीकरणे निश्चित करताना नेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे.
दरम्यान, ‘बाबा-आबा’ पुन्हा एकाच टेबलावर आल्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा पर्यायही राजकीय चर्चेत आला आहे. महायुतीच्या माध्यमातून संयुक्त पॅनल उभे करण्याबरोबरच सर्व जागांवर सामंजस्याने उमेदवार निश्चित करून निवडणूक बिनविरोध करण्याचा काही फॉर्म्युला पुढे येतोय का, याबाबतही उत्सुकता आहे.
पॅनल नको, प्रचार नको, खर्च नको… थेट बिनविरोध?
या चर्चेला प्रत्यक्ष आकार येतो की संयुक्त पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीचा सामना केला जातो, हे पुढील बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
सध्या मात्र जिल्हा बँकेच्या निमित्ताने ‘बाबा-आबा’ पुन्हा एकत्र आल्याने साताऱ्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आता या भेटीनंतर पुढचा डाव कोणता, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
3) खंडाळ्यात दुष्काळाची चाहूल; प्रशासन शेतशिवारात!

शेतकऱ्यांना मदत-सवलती मिळवून देण्यासाठी संयुक्त पंचनाम्यांना वेग; गावोगावी प्रत्यक्ष पीक पाहणी सुरू
सातारा | खंडाळा, दि. ३० :
खंडाळा तालुक्यात पावसातील अनियमितता आणि पिकांच्या स्थितीत झालेली घसरण यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती आणि संभाव्य मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी तालुका प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली असून, दि. २८ सप्टेंबरपासून गावोगावी संयुक्त पीक पाहणी आणि पंचनाम्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, खंडाळा येथे उपविभागीय अधिकारी, वाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच कृषी सेवक या बैठकीस उपस्थित होते.
शासनाच्या निर्देशानुसार पीक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी आणि कृषी सेवक यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे करणार आहेत. मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि विस्तार अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत.
पंचनाम्यादरम्यान केवळ कागदोपत्री नोंदी न करता पिकांची प्रत्यक्ष स्थिती, छायाचित्रे, GPS Coordinates आणि पीकविषयक आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे बँक खाते, IFSC कोड, सर्वे क्रमांक, आधार क्रमांक आदी माहिती अचूकपणे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक गावातील संबंधित नोंदी डाउनलोड करून शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश ग्राम महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये त्रुटी, अपूर्ण माहिती अथवा चुकीची नोंद राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाच्या लहरीपणाचा पिकांना फटका
तालुक्यातील सध्याची पीक परिस्थिती चिंताजनक असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले. पावसाला झालेला विलंब, पावसातील खंड, पिकांची खुंटलेली वाढ, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि उत्पादनात होणारी संभाव्य घट यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे पंचनाम्यांमध्ये प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र उमटणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महसूल सवलतीपासून वीजबिलापर्यंत उपाययोजना
दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सवलत, पीक कर्ज पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलाबाबत सवलती, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यक शिथिलता तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यासारख्या उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पंचनाम्यात चूक झाल्यास जबाबदारी निश्चित
संभाव्य केंद्रीय समितीच्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पीक पाहणी आणि पंचनामे अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून संभाव्य मदतीसाठी शासनाच्या निकषांनुसार तयार होणारे पंचनामे महत्त्वाचे ठरणार आहेत. पंचनाम्यात चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पीक पाहणी आणि पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी, वाई यांनी दिल्या. बैठकीच्या शेवटी तहसीलदार, खंडाळा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
4) कराडवर दुष्काळाचे संकट; सरकारच्या मदतीची शेतकऱ्यांची आर्त हाक!

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने सवलती लागू करण्याची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
कराड | दि. ३० : पावसाने दीड महिन्यापासून ओढ दिल्याने कराड तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून, ऊस पिकालाही पाण्याच्या ताणाचा फटका बसू लागला आहे. पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने कराड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करून तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन दिले.
राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध सवलती जाहीर केल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा त्यामध्ये समावेश झाला असला, तरी कराड, पाटणसह काही तालुके या यादीतून वगळण्यात आले आहेत. मात्र कराड तालुक्यातही पावसाअभावी परिस्थिती गंभीर होत असून, शासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. कराड दक्षिणेतील डोंगरी भागासह कराड उत्तर भागातील अनेक गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांमध्ये पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. कृष्णा-कोयना नदीकाठच्या शेतीला काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता असली, तरी कमी पावसाचा परिणाम या भागातील पिकांवरही जाणवत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले.
पावसाअभावी खरीप पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. ऊस पिकाला पाण्याचा ताण बसल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
‘कागदावरील आकडे नव्हे, बांधावरची वस्तुस्थिती पाहा’, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाने प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पाहणी करण्याची मागणी केली. अधिकारी बांधावर पोहोचल्यास कराड तालुक्यातील अवर्षणाची खरी तीव्रता स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पावसाअभावी दुहेरी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे दुष्काळी निकष, पंचनामे आणि प्रशासकीय प्रक्रियेत विलंब न करता तातडीने वस्तुनिष्ठ पाहणी करावी. कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भागाची दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सर्व दुष्काळी सवलती व शासकीय मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी कराड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5) ज्ञानदीपच्या शुभांगी पवार, दिशा पब्लिकचे ताज्युद्दिन सय्यद ‘बेस्ट प्रिन्सिपल’
EMSAच्या राज्यस्तरीय सोहळ्यात १५ मुख्याध्यापक व ३८ शिक्षकांचा गौरव; सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचाही सन्मान.

सातारा | वाई, दि. ३० : शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन, कोल्हापूर (EMSA) यांच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीमध्ये झालेल्या या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
या पुरस्कारासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने प्रस्ताव दाखल झाले होते. निर्धारित निकषांनुसार प्रस्तावांची छाननी व मूल्यांकन केल्यानंतर १५ मुख्याध्यापक आणि ३८ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
EMSA कोल्हापूर असोसिएशनचे अध्यक्ष के. डी. पाटील यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश पोळ, राज्याध्यक्ष गणेश नायकुडे, उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, कोल्हापूर शहर अध्यक्ष अमर सरनाईक, क्रीडा प्रमुख सचिन नाईक, राधानगरी तालुका प्रमुख दत्तात्रय रणदिवे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या कार्याची समाजाने दखल घेणे आणि गुणवत्तापूर्ण व प्रयोगशील अध्यापनाला प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे संस्थापक अध्यक्ष महेश पोळ यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
साताऱ्यातील मान्यवरांचा गौरव
वाई येथील ज्ञानदीप स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शुभांगी पवार यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच श्रेणीत दिशा पब्लिक स्कूलचे प्राचार्य ताज्युद्दिन सय्यद, ग्लोरी ॲकडमीच्या प्राचार्या मीना चौधरी, गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या अनुराधा कदम आणि आदित्य ॲकडमीचे प्राचार्य इरफान पठाण यांचाही गौरव करण्यात आला.
शिक्षक पुरस्कारामध्ये ब्लॉसमच्या शिक्षिका पौर्णिमा शिर्के, जॉय ॲकडमीच्या राजश्री तरडे, ग्लोरी शिरवळच्या वैशाली भणगे आणि बालविश्व वाठारचे शिक्षक सागर कुंभार यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोहळ्यास विद्यावर्धिनी संस्थेचे विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, दुष्यंत जगदाळे, दिलीप चव्हाण, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, ज्ञानज्योत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमोल बोडके यांच्यासह शिक्षण व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या सातारा जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
6) सातारा:-डीसीसीच्या रणांगणात उमेदवारीचा धडाका; ४०० अर्जांची विक्री!

शेवटचे दोन दिवस शिल्लक; आज २१ उमेदवारांचे २७ अर्ज दाखल, अंतिम टप्प्यात गर्दी वाढण्याची शक्यता
सातारा | दि. ३० : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) सन २०२६-२०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीने आता चांगलाच वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली असून, मंगळवारी आणखी ४३ अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत विक्री झालेल्या उमेदवारी अर्जांचा आकडा तब्बल ४०० वर पोहोचला आहे.
दरम्यान, बुधवारी २१ उमेदवारांनी तब्बल २७ नामनिर्देशन अर्ज दाखल केले. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दोन दिवसांत २२ उमेदवारांचे २५ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरल्याने शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची आणि समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष सातारा तालुका मतदारसंघातून बाबासाहेब शिवाजी कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाबळेश्वर तालुक्यातून रूपाली राजेंद्र राजपुरे यांनी दोन अर्ज, तसेच राजेंद्र निवृत्ती राजपुरे यांनी अर्ज दाखल केला. खटाव तालुक्यातून इंदिरा प्रभाकर घार्गे यांनी दोन, प्रभाकर देवबा घार्गे यांनी दोन, तर धनंजय गोरखनाथ चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला.
गृह निर्माण व दूध संस्था मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज यांनी अर्ज दाखल केला. विजाभज राखीव प्रवर्गातून सुनील सुरेश वाघ आणि रणजित सुरेश जाधव यांनी, तर इतर मागास वर्ग राखीव प्रवर्गातून प्रदीप बापूसो विधाते, प्रतीक प्रदीप विधाते, योगेश संभाजीराव फडतरे आणि सुरेंद्र मोहनराव गुदगे यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून रामराव आनंदराव लेंभे यांनी दोन अर्ज, तर मनोहर वसंतराव बर्गे यांनी एक अर्ज दाखल केला.
महिला राखीव प्रवर्गातून मोनल संजय साळुंखे यांनी दोन अर्ज, तर राजेश्वरी रणजितसिंह देशमुख यांनी अर्ज दाखल केला. औद्योगिक व मजूर मतदारसंघातून सुनील सुरेश वाघ, अनिल शिवाजीराव देसाई यांनी दोन अर्ज, तर महेंद्र अरुण देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून राजेंद्र मुगुटराव भोईटे यांनी अर्ज भरला.
अंतिम दोन दिवसांकडे लक्ष
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर हे दोन दिवस शिल्लक आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
निवडणूक कार्यालयातील गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे. समर्थक व इतर सोबत्यांनी कार्यालयात प्रवेश करू नये, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, प्रमुख राजकीय पक्ष, सहकार क्षेत्रातील नेते आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करू लागल्याने डीसीसी निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. आता शेवटच्या दोन दिवसांत कोणते नवे चेहरे मैदानात उतरतात, कोणत्या मतदारसंघात उमेदवारीची संख्या वाढते आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे नेमके चित्र कसे स्पष्ट होते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
7)
परदेशी क्रुझवरील नोकरीचे आमिष; साताऱ्यात तरुणांना ९.५२ लाखांचा गंडा
सातारा | दि. ३० : नामांकित रॉयल कॅरिबियन क्रुझवर आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून तब्बल ९ लाख ५२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार सातारा शहरात उघडकीस आला आहे. किचन तसेच ‘फूड अँड बेव्हरेज’ विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन देत ही रक्कम घेतल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोवई नाका परिसरातील एका शिपिंग अँड कन्सल्टन्सीच्या कार्यालयातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित एजन्सीकडून रॉयल कॅरिबियन क्रुझवर चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परदेशी क्रुझवर नोकरीची संधी मिळणार असल्याने तरुणांनी एजन्सीवर विश्वास ठेवत मोठ्या रकमा दिल्या.
यातील दोन तरुणांकडून प्रत्येकी ३ लाख १५ हजार रुपये, तर तक्रारदाराकडूनही मोठी रक्कम घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ९ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम संबंधितांकडून घेण्यात आली.
मात्र, पैसे भरल्यानंतर अनेक दिवस उलटूनही नोकरीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. क्रुझवरील नोकरीचे आश्वासनही पूर्ण झाले नाही आणि दिलेली रक्कम परत मागितल्यानंतरही टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून सातारा शहर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पैशांचा व्यवहार, नोकरीचे आश्वासन आणि संबंधित कन्सल्टन्सीची भूमिका याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
8) सभासदांचा विश्वास, शेतकऱ्यांची साथ; खंडाळा साखर कारखान्याच्या प्रगतीचा निर्धार!
सातारा | खंडाळा, दि. ३० : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., खंडाळा-म्हावशीच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. कारखान्याच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेतानाच आगामी गाळप हंगामाचे नियोजन आणि ऊस उत्पादक सभासदांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना खा. नितीन पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या वाटचालीत सभासदांचा सहभाग आणि शेतकऱ्यांचा विश्वास यांना महत्त्व असल्याचे नमूद केले. “सभासदांचा सक्रिय सहभाग आणि शेतकऱ्यांचा दृढ विश्वास हीच सहकारी संस्थेची खरी ताकद आहे. खंडाळा कारखान्याने सातत्याने सभासद व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, यापुढील काळातही त्याच विश्वासाच्या बळावर कारखान्याला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वार्षिक सभेत कारखान्याच्या आर्थिक कामकाजाचा ताळेबंद, मागील हंगामातील कामगिरी, आगामी गाळप हंगामाची तयारी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. सभासदांनीही आपल्या सूचना व अपेक्षा मांडत कारखान्याच्या आगामी वाटचालीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
कारखान्याला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ, सभासद आणि शेतकऱ्यांनी परस्पर समन्वय व एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून कारखान्याची प्रगती साधतानाच शेतकरी सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवण्यावर भर देण्यात आला.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला कारखान्याचे पदाधिकारी व संचालक, शेतकरी सभासद, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
9)
जनता अर्बन बँकेच्या नेतृत्वाची धुरा राहुल डेरे यांच्या हाती!
शेखर फरांदे व्हाईस चेअरमनपदी; अडीच वर्षांसाठी दोन्ही निवडी बिनविरोध
सातारा | वाई, दि. ३० : वाई येथील जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी राहुल डेरे, तर व्हाईस चेअरमनपदी शेखर फरांदे यांची अडीच वर्षांच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळातील सलोखा आणि एकमताची प्रचिती देणाऱ्या या निवडीमुळे बँकेच्या नेतृत्वाची धुरा आता नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. निवडीची अधिकृत घोषणा होताच उपस्थित संचालक, सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर राहुल डेरे, शेखर फरांदे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित चेअरमन राहुल डेरे यांनी बँकेच्या पुढील वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करताना, बँकेची प्रगती अधिक गतिमान करण्यासोबतच ग्राहकांना आधुनिक आणि दर्जेदार सेवा देण्यावर भर राहील. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने कामकाज केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, जनता अर्बन बँकेच्या नव्या नेतृत्वाचे सभासद, ग्राहक, नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
10) ग्रामपंचायत वारंजीच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह; चौकशीच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या
कराड | दि. ३० : ग्रामपंचायत वारंजीच्या माध्यमातून २०२२ ते २०२५ या कालावधीत झालेल्या विविध विकासकामांची सखोल चौकशी करून प्रत्यक्ष कामे, त्यांची गुणवत्ता आणि झालेला खर्च यांची पडताळणी करावी, या मागणीसाठी जनहिताय फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च आणि कामाची सद्यस्थिती यामध्ये ताळमेळ आहे का, याची तपासणी करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे.
आर.सी.सी. बांधिस्त गटार, जिल्हा परिषद शाळेतील कामे, शौचालय बांधकाम, गावांतर्गत नळजोडणी, घनकचरा डेपो, रस्ता काँक्रीटीकरण, स्ट्रीटलाईट यांसह विविध कामांचा चौकशीच्या मागणीत समावेश आहे. संबंधित कामे कागदोपत्री किती दाखविण्यात आली आणि प्रत्यक्षात किती पूर्ण झाली, तसेच कामांचा दर्जा व त्यावर झालेला खर्च यांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
याशिवाय ग्रामपंचायत निधीतून कर्मचारी वेतन, कार्यालयीन खर्च, अतिथी भत्ता, औषध खरेदी, दुरुस्ती यांसह इतर बाबींवर झालेल्या खर्चाचीही तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका जनहिताय फाउंडेशनने घेतली आहे. मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीसमोर सुरू असलेल्या या बेमुदत ठिय्या आंदोलनामुळे वारंजी ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
11)
जिल्हा बँकेच्या जागावाटपावर मुंबईत खलबते; ‘११’च्या भाजपच्या मागणीने महायुतीत पेच
सातारा |
सातारा, दि. ३० : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे लढण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच जागावाटपाचा मुद्दा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज मुंबईत असल्याने त्यांच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील २१ जागांचा संभाव्य फॉर्म्युला या चर्चेतून पुढे येण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी भाजपकडून तब्बल ११ जागांचा आग्रह धरला जाण्याची शक्यता असल्याने उर्वरित दहा जागांचे वाटप महायुतीसमोर मोठे आव्हान ठरले आहे. या दहा जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचे, यासोबतच विविध नेत्यांच्या प्रभावक्षेत्राचा समतोल कसा साधायचा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
भाजपमध्येच इच्छुकांची गर्दी
भाजपच्या संभाव्य ११ जागांसाठीच अनेक इच्छुक पुढे आल्याने पक्षांतर्गत समीकरणे जुळविताना नेतृत्वाची चांगलीच कसोटी लागणार आहे. खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे आणि डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांकडून विविध मतदारसंघांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे.
उपलब्ध जागांच्या तुलनेत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व देताना पक्षाला अंतर्गत नाराजी टाळण्याचे आव्हान असेल. स्थानिक पातळीवरील चर्चा निष्फळ ठरल्यास अंतिम तोडग्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाकडे धाव घ्यावी लागू शकते.
‘दोन-तीन’ जागांवरून रस्सीखेच?
उदयनराजे भोसले यांच्या गटाकडून दोन जागांची मागणी होण्याची शक्यता चर्चेत आहे. जयकुमार गोरे यांच्या गटाकडूनही दोन ते तीन जागांसाठी आग्रह धरला जाऊ शकतो. त्याचवेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रभावक्षेत्राला किती जागा मिळणार, हा भाजपमधील वाटपातील कळीचा मुद्दा ठरणार आहे.
यापूर्वी जिल्हा बँकेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांचे सर्वाधिक संचालक होते. त्यामुळे नव्या महायुतीच्या समीकरणात त्यांच्या गटाचे राजकीय वजन किती कायम राहते, याकडे विशेष लक्ष आहे. दहा जागांच्या अंतर्गत वाटपात त्यांच्या गटाचा प्रभाव पूर्वीप्रमाणे राहणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
उर्वरित दहा जागांमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेची कसरत
भाजपला ११ जागा मिळाल्यास उर्वरित दहा जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील, शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांना प्रतिनिधित्व देण्याचे आव्हान असेल. त्यात राखीव पाच जागांचे वाटप हा महायुतीच्या चर्चेतील संवेदनशील मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
सातारा, कराड, फलटण आणि खटाव या तालुक्यांतील संस्थात्मक मतदारसंख्या आणि प्रतिनिधित्वही जागावाटपाच्या समीकरणात महत्त्वाचे ठरणार आहे. अधिक मतदारसंख्या असलेल्या भागांना अधिक जागांचे प्रतिनिधित्व देण्याचे सूत्र स्वीकारले गेले, तर संबंधित तालुक्यांतील नेत्यांचे राजकीय महत्त्व वाढू शकते.
मुंबईतील बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष
जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीचा अंतिम २१ जागांचा फॉर्म्युला ठरविण्यापूर्वी भाजपमधील अंतर्गत वाटपाचा तिढा सोडविणे आवश्यक ठरणार आहे.
मुंबईतील चर्चेत प्राथमिक सहमती झाली तरी अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ नेतृत्वाची मंजुरी घ्यावी लागू शकते. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणता फॉर्म्युला पुढे येतो, कोणत्या गटाला किती जागा मिळतात आणि महायुतीतील अंतर्गत समतोल कसा साधला जातो, याकडे सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेचे मतदार
९६३ — सोसायटी प्रतिनिधी
३७९ — नागरी बँका व पतसंस्था
३४३ — औद्योगिक, विणकर-मजूर संस्था
२९५ — गृहनिर्माण व दूध संस्था
२९ — कृषी प्रक्रिया संस्था
१० — खरेदी-विक्री संस्था
12) सातारा:-दुष्काळसदृश परिस्थितीवर प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’

पाणी, चारा आणि अन्नटंचाई टाळण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याचे पालक सचिव डॉ. संजीव कुमार यांचे निर्देश.
सातारा | दि. ३० : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे. नागरिकांना अन्न, पाणी आणि चाऱ्यासाठी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व विभागांनी संवेदनशीलता, समन्वय आणि तत्परतेने काम करावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजीव कुमार यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. दुष्काळी परिस्थिती हाताळण्याचा प्रशासनाला अनुभव असून, त्यासाठीची कार्यपद्धतीही संबंधित यंत्रणांना परिचित आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता आवश्यक त्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात. तसेच मंत्रालय स्तरावर आवश्यक असलेले प्रस्ताव विलंब न करता सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
ग्रामीण भागात पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या भागात गरज भासेल, तेथे चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. टंचाई निवारणासाठी आवश्यक मंजुरी आणि निधी मिळविण्यासाठीचे प्रस्तावही वरिष्ठ स्तरावर वेळेत पाठवावेत, असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना दिलासा देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असावे, असे नमूद करत त्यांनी अन्न, पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेचे सातत्याने नियोजन व निरीक्षण करण्यावर भर दिला.
गरोदर मातांच्या आरोग्यसेवेला प्राधान्य
आरोग्य विभागाच्या आढाव्यात सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेचे डॉ. कुमार यांनी कौतुक केले. शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम कराव्यात. त्यांच्या नियमित तपासण्या करून शासकीय रुग्णालयांमधील प्रसूतींचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
गरोदर मातांना वेळेत रुग्णालयात पोहोचता यावे, यासाठी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेने त्यांच्या नियमित संपर्कात राहून आवश्यक ती माहिती घेत राहावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर
शिक्षण विभागाच्या आढाव्यात केवळ शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, त्या सुविधांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी किती प्रभावी वापर होतो, याचे मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि शिकण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ही विविधता लक्षात घेऊन अध्यापनाच्या पद्धतीत आवश्यक बदल करावेत. विद्यार्थ्यांना विषय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
13) वाई:-आश्वासित प्रगती योजनेसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांचे वाई नगरपरिषदेसमोर उपोषण…

२०१६ ते २०२५ दरम्यान निवृत्त झालेल्यांना लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांकडेही धाव.
सातारा | वाई दि. ३० : महाराष्ट्र शासनाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी वाई नगरपरिषदेतील निवृत्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी नगरपरिषद कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही मागणीची पूर्तता होत नसल्याचा आरोप करत निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
नगरविकास विभागाच्या ११ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन आदेशानुसार नगरपरिषद संवर्गातील कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वाई नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच आस्थापना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटी, निवेदने आणि सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही प्रश्न मार्गी लागला नसल्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. लाभ रखडल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, या मागणीसंदर्भात सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ तातडीने देऊन प्रलंबित आर्थिक लाभाची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.
लाभ न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी नगरपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात वाई नगरपरिषदेतील अनेक निवृत्त कर्मचारी सहभागी झाले. आता प्रशासन या मागणीवर कोणती कार्यवाही करते, याकडे निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
१ जानेवारी २०१६ पासून लागू असलेल्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावा.
योजनेनुसार देय आर्थिक लाभाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
प्रलंबित लाभामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
शासन आदेशाची नगरपरिषद स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी.
14) हस्तकलेतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा; शिरगाव शाळेतील कार्यशाळेचा उत्साहात समारोप.

वाई | प्रतिनिधी
शिरगाव, ता. वाई येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हस्तकला प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रमाचा प्रेरणादायी वातावरणात समारोप झाला. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध हस्तकलांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देतानाच हस्तकलेमागील कौशल्य, परंपरा आणि भविष्यातील व्यवसाय व रोजगाराच्या संधींची माहिती देण्यात आली.
समारोपप्रसंगी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तूंची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. हस्तकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कौशल्याला योग्य दिशा मिळू शकते. याच कौशल्याचे भविष्यात व्यवसाय व रोजगाराच्या संधींमध्ये रूपांतर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
शाळेत केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांच्या कलात्मक, भावनिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुकही कदम यांनी केले.
“ज्याप्रमाणे मूर्तिकार मूर्तीला आकार देतो, त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आणि भविष्याला आकार देत असतो,” या शब्दांत त्यांनी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंत पवार, शिरगाव हायस्कूल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन भोसले, उपाध्यक्षा प्रियाताई भोसले, तज्ज्ञ सदस्य दिलीप भोसले, माजी उपसरपंच रघुनाथ भोसले, यशश्री अकॅडमीचे संस्थापक किरण भोसले, अमर गायकवाड, केंद्रप्रमुख क्रांती तापकीर आदी उपस्थित होते.
कार्यशाळेस वाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता ढाणे, शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक डफळे सर तसेच दोन्ही शाळांतील शिक्षकवृंद यांचीही उपस्थिती होती.
कदम यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून, त्यांच्या कलाकृतींचे झालेले कौतुक विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरले. “कौशल्याला संधी मिळाली की सर्जनशीलतेतून भविष्य घडते,” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.




