वाई:-महावितरणचा निष्काळजीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर; कॅनॉलमध्ये झाडे टाकून पुन्हा जलप्रलयाचे संकट!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-महावितरणचा निष्काळजीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर; कॅनॉलमध्ये झाडे टाकून पुन्हा जलप्रलयाचे संकट!

सातारा | वाई दि. २९ :
उडतरे (ता. वाई) येथील ११ मायनर कॅनॉलची साफसफाई करूनही शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याऐवजी पुन्हा नव्याने संकट उभे राहिल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी कॅनॉलमध्ये साचलेल्या गाळ, बाभळी आणि झाडाझुडपांमुळे पाण्याचा प्रवाह अडून पाणी थेट शेतात घुसल्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्यानंतर प्रशासनाने कॅनॉलची साफसफाई केली; मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आजतागायत एक रुपयाचीही नुकसानभरपाई मिळालेली नाही.
आता पुन्हा महावितरणच्या बेफिकीर कारभारामुळे शेतकऱ्यांसमोर तेच संकट उभे ठाकले आहे. वीजवाहिन्यांना अडथळा ठरणारी वेड्या बाभळीची व इतर झाडांची तोड करून ती हटविण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्यांनी ती थेट कॅनॉलमध्ये आणि शेजारच्या शेतात फेकून दिल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी, पावसाळ्यात किंवा कॅनॉलला पाणी सोडल्यास ही झाडे पुन्हा प्रवाह अडवून पाणी शेतात घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसामुळे पुन्हा झाडाझुडपांनी कॅनॉल व्यापल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी महावितरण आणि पाठबंधारे विभागाकडे वारंवार दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या. मात्र दोन्ही विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
एकीकडे मागील नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही, तर दुसरीकडे पुन्हा त्याच निष्काळजीपणामुळे शेती जलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने कॅनॉलमध्ये टाकलेली झाडे तातडीने हटवावीत, पाठबंधारे विभागाने कॅनॉलचा प्रवाह कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा भविष्यात पुन्हा शेतीचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असा स्पष्ट इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
“पंचनामे झाले… आश्वासने मिळाली… पण मदत कधी?”
“शेतीचे मोठे नुकसान झाले, पंचनामे झाले, अधिकारी आले, आश्वासनेही दिली; मात्र आजपर्यंत एक रुपयाचीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. आता पुन्हा त्याच निष्काळजीपणामुळे संकट उभे ठाकले आहे. नुकसान झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नुकसानग्रस्त शेतकरी बाळासाहेब बाबर यांनी उपस्थित केला आहे.
2) वाई:-सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर तिघे अटकेत; चोरीची जनावरे विकणाऱ्या व्यापाऱ्यांचाही शोध सुरू

सातारा | वाई, दि. २९ :
वाई तालुक्यातील कवठे, ओझर्डे, खडकी आणि कुडाळ परिसरात शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर डल्ला मारत जनावरे चोरणाऱ्या ‘पिकअप गँग’चा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि अचूक माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जनावरे चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.
कवठे (ता. वाई) येथील किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यातून १९ ते २० जून २०२६ दरम्यान दोन मुर्हा जातीच्या म्हशी चोरीला गेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विशेष पथक स्थापन केले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपी पिकअप वाहनातून पाचवडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचवड चौकात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी चौकशीत आरोपींनी कवठे येथील दोन म्हशी, ओझर्डे येथील एक म्हैस, खडकी येथील एक जर्सी गाय आणि कुडाळ येथील दोन म्हशी अशा एकूण सहा जनावरांच्या चोरीची कबुली दिली. चोरीची जनावरे चाकण (जि. पुणे), काष्टी-श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील गुरांच्या बाजारात विकल्याचेही त्यांनी उघड केले.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त केले असून, चोरीची जनावरे ज्या व्यापाऱ्यांकडे विकण्यात आली आहेत त्यांचा शोध सुरू आहे. ती जनावरे मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेश ऊर्फ सूर्यकांत आनंदराव चव्हाण (वय ३५, रा. पाचवड), संदेश हणमंत पिसाळ (वय २७, रा. व्याजवाडी) आणि हर्षद हिंदुराव चव्हाण (वय १८, रा. कडेगाव, ता. वाई) यांचा समावेश आहे.
ही यशस्वी कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस हवालदार नितीन जाधव, धायगुडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि किरण निंबाळकर यांच्या पथकाने केली.
3) वाई:-बेंदूर मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा? डॉल्बीचा धडाका, मद्यधुंद धिंगाणा अन् वाई पोलिसांच्या नियोजनावर संतप्त सवाल.

सातारा | वाई, दि. २९ : बेंदूर सणानिमित्त सोमवारी वाई शहरात निघालेल्या मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची अक्षरशः ऐशी-तैशी झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बींचा कर्णकर्कश आवाज, मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा, चौकाचौकांत वाहतूक कोंडी, प्रचंड गर्दी आणि किरकोळ वाद-विवाद यांच्या पार्श्वभूमीवर वाई पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरभर धडाडणाऱ्या डॉल्बींमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, त्यासाठी अधिकृत परवानगी होती का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. परवानगी नसेल तर तत्काळ कारवाई का झाली नाही? आणि परवानगी दिली असेल, तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन कोणी करायचे? असे संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी डॉल्बी मालक, चालक, आयोजक किंवा संबंधित मंडळांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संबंधित प्रस्ताव न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे डॉल्बीविरोधातील कारवाई पुढे ढकलण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, काही मिरवणुकांमध्ये मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची, बाचाबाची व किरकोळ भांडणांचे प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र अशा घटनांप्रकरणी किती जणांवर कारवाई झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
मिरवणुकांसाठी निश्चित मार्ग, वेळापत्रक आणि वाहतूक व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यात आले होते का, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक ठिकाणी मिरवणुका मनमानी पद्धतीने पुढे सरकत असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडाला आणि सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त अनेक ठिकाणी अपुरा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात अशाच प्रकारे मोठ्या सणांमध्ये एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
काही स्थानिक लोकप्रतिनिधी मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्याची चर्चा असून, नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सर्व संबंधितांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
बेंदूरसारख्या तुलनेने लहान सणातच नियोजनावर प्रश्न उपस्थित होत असताना, आता दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवांसाठी वाई पोलीस प्रशासन काय ठोस तयारी करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. डॉल्बीवर कठोर नियंत्रण, शिस्तबद्ध मिरवणूक, प्रभावी वाहतूक नियोजन आणि कायदा मोडणाऱ्यांवर तातडीची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
4) कराड:-कराडला दिव्यांग कल्याण विभागाचे प्रादेशिक कार्यालय; निर्णय प्रक्रियेला वेग.

सातारा | कराड दि. २९ : पश्चिम महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. कराड येथे दिव्यांग कल्याण विभागाचे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याच्या मागणीला राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंत्रालय, मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग विकास आघाडी (भाजप)च्या शिष्टमंडळाने मंत्री सावे यांची भेट घेऊन कराड येथे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याबाबत निवेदन सादर केले. या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री सावे यांनी प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला पुढील प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिले.
कराड येथे प्रादेशिक कार्यालय सुरू झाल्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मुंबईपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. विभागाच्या विविध योजना, अर्ज, मंजुरी आणि प्रशासकीय प्रक्रिया स्थानिक पातळीवरच पूर्ण होणार असल्याने वेळ, खर्च आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
या निर्णयामुळे दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक जलद, सुलभ आणि प्रभावीपणे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच, या सकारात्मक निर्णयाबद्दल पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग विकास आघाडी (भाजप)च्या वतीने मंत्री ना. अतुल सावे यांचे आभार मानण्यात आले.
5) कराड:-रोटरी क्लब ऑफ मलकापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात; समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात.

कराड | दि. २९ : रोटरी क्लब ऑफ मलकापूर (कराड) आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे जपत सेवाभावी उपक्रमांना नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करत नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.
समारंभास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर क्षितिज झावरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर असिस्टंट गव्हर्नर युवराज नागे यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या अध्यक्षपदी राजन वेळापूरे आणि सचिवपदी संजय बडदरे यांनी पदभार स्वीकारला. तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ मलकापूरच्या अध्यक्षपदी बेंझीर शिकलगार व सचिवपदी रोहित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. याचवेळी नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.
समारंभात मुनीर गुलाब बागवान (कालिका कुटुंब प्रमुख), मेजर पतंगराव बानुगडे, सुरेश देसाई, प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे, दिलीप चव्हाण, रमेश पाटील, जगन्नाथ पाटील, अभिजीत शिंदे पाटील, शंकर पिसाळ, उत्तम बर्गे, रामचंद्र जाधव, विवेक वेळापूरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री कालिकादेवी पतसंस्था, कराड) आणि सुभाष कदम यांचा रोटरी परिवारात प्रवेश करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
माजी सचिव विजय दुर्गावळे यांनी मागील वर्षातील विविध सेवाभावी उपक्रमांचा आढावा सादर केला. त्यानंतर नव्या संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमास मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तेजस सोनवले, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, विविध क्षेत्रांतील मान्यवर, रोटरी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत समाजहितासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी सेवाभावी उपक्रम राबविण्याच्या शुभेच्छा दिल्या.
6) कराड:-“स्मार्ट मीटरविरोधात कराडमध्ये जनआंदोलनाची रणशिंगे; वाढीव वीजबिलाविरोधात कायदेशीर लढ्याची घोषणा.!

सातारा | कराड, दि. २९ :
राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात कराडमध्येही नागरिकांचा आवाज बुलंद झाला असून, ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या माजी प्रदेश कार्यकारिणी महिला मोर्चाच्या सदस्या स्वाती पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲड. पद्मजा लाड यांच्या सहभागातून आयोजित पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.
पत्रकार परिषदेला ॲड. मिलिंद लाड, रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी, विविध ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, अभियंते, तंत्रज्ञ आणि कायदेतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वाती पिसाळ यांनी आरोप केला की, अनेक ठिकाणी ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. तसेच स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अनियमित वाढ होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. स्वतःलाही चारपट अधिक युनिट दाखवून जादा वीजबिल आल्याचा अनुभव आला असून, वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
“हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, अधिकारी किंवा संस्थेविरोधात नसून ग्राहकांना पारदर्शक, उत्तरदायी आणि न्याय्य वीज वितरण व्यवस्था मिळावी, हा आमचा उद्देश आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलाचा संशय असलेल्या नागरिकांना मोफत मार्गदर्शन व कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली.
ॲड. पद्मजा लाड यांनी सांगितले की, योग्य आणि पारदर्शक वीजबिल मिळणे हा प्रत्येक ग्राहकाचा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र पडताळणी करून आवश्यक पुरावे संकलित केले जातील. त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण मंच, वीज लोकपाल, महाराष्ट्र वीज नियामक आयोग तसेच आवश्यकतेनुसार न्यायालयीन स्तरावरही लढा दिला जाईल.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात असामान्य वाढ झाल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची सखोल छाननी करून संबंधित ग्राहकांना कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम, सोशल मीडियाद्वारे माहितीचा प्रसार आणि प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
7) शिरवळ:-तरुणीच्या घरी गेलेल्या युवकावर पिस्तुलातून गोळीबार; लोखंडी पट्टी, दगडाने जीवघेणा हल्ला.

सातारा | शिरवळ दि. २९ : खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे एका तरुणीच्या घरी गेलेल्या युवकावर पूर्ववैमनस्यातून पिस्तुलातून गोळीबार करून तसेच लोखंडी पट्टी, विटा व दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, शिरवळ पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार ओकार दत्तात्रय क्षीरसागर (वय २६, रा. शिरवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ जुलै रोजी रात्री ते आपल्या मैत्रिणीच्या घरी गेले असता, तेथे आलेल्या जंकार माने, साहिल उर्फ सिद्धांशू गोलांडे, राकेश चव्हाण आणि बाबुशेट्टी यांनी संगनमताने त्यांना घराबाहेर बोलावले.
“तू माझ्या घरी का आला होतास?” अशी विचारणा करत आरोपींनी वाद घालत विटा, दगड व लोखंडी पट्टीने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी राकेश चव्हाण याने त्याच्याकडील पिस्तुलातून ओकार क्षीरसागर यांच्या छातीच्या दिशेने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून येऊ लागल्याने आरोपी तेथून पसार झाले. जखमी युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, घटनेमुळे शिंदेवाडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव शीड करीत आहेत.




