आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाईत शस्त्रांचा थरार; पिस्तुलांसह फिरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाईत शस्त्रांचा थरार; पिस्तुलांसह फिरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

शेंदुरजणे कॅनॉल परिसरात पोलिसांचा पाच तास सापळा; दोन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे जप्त.

सातारा | वाई, दि. १८ : गणेशोत्सवाच्या उत्साहात वाई शहर आणि तालुका भक्तिमय वातावरणात रंगला असताना शेंदुरजणे परिसरात गावठी पिस्तुले घेऊन फिरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात वाई पोलिसांना यश आले. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत दोन गावठी पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई अशी आहेत.

वाई-सुरूर मार्गावरील शेंदुरजणे गावच्या हद्दीत कॅनॉल परिसरात एक युवक हातात पिस्तुल घेऊन फिरत असल्याची तसेच त्याच्याकडून दहशत निर्माण केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून कॅनॉल परिसरात सापळा रचला. तब्बल पाच तास दबा धरून बसल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुदेश पाटणे संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने हे पिस्तुल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अक्षय देसाई यानेही त्याच व्यक्तीकडून पिस्तुल घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली.

यानंतर पोलिसांनी अक्षय देसाईचा शोध सुरू केला. रात्री उशिरा तो परखंदी रोड चौकात पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रमांमुळे शहर आणि तालुक्यात उत्साहाचे वातावरण असताना शस्त्रांसह दोघांना अटक झाल्याने या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि त्यांच्या पथकाने केली.

2) वाई:-एका ‘शेऱ्या’ने वाढवला पेच!

यशवंतनगरात उपोषणाची हाक; अधिकारी संघटना दबावाविरोधात मैदानात.

सातारा | वाई, दि. १७ : यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील काही बांधकामांच्या मालमत्ता नोंदीवर नोंदविण्यात आलेल्या ‘अनधिकृत बांधकाम’ या एका शेऱ्याने आता प्रशासनापुढे नवा पेच निर्माण केला आहे. हा शेरा हटवून संबंधित बांधकामांची ग्रामपंचायत दप्तरी कायदेशीर नोंद करावी, या मागणीसाठी संबंधितांनी पंचायत समिती प्रशासनासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, नियमांनुसार नोंद करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, अशी भूमिका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

मिळालेल्या कागदपत्रांनुसार, यशवंतनगर येथील लहू बळवंत सावंत, पंढरीनाथ सखाराम घाटे आणि गणेश दत्तात्रय सावंत यांनी १५ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. संबंधित इमारतींची ग्रामपंचायत दप्तरी कायदेशीर पद्धतीने नोंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संबंधित बांधकामांसाठी आवश्यक शासकीय परवानग्या आणि नियमांचे पालन झाल्याचे आढळून न आल्याने मालमत्तांच्या नमुना क्रमांक ८ मध्ये ‘अनधिकृत बांधकाम’ असा शेरा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी, शासन निर्णय आणि मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही झाल्याची भूमिका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने मांडली आहे.

दबावाविरोधात अधिकारी संघटना आक्रमक

‘अनधिकृत बांधकाम’चा शेरा काढण्यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. राजकीय दबाव, तक्रारी अथवा अन्य मार्गांचा वापर करून ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर दबाव आणणे योग्य नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. नियमांनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना शासन निर्णय, नियम तसेच बांधकामावर ‘अनधिकृत’ असा शेरा नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिल्याचे संघटनेने म्हटले आहे. आवश्यक असल्यास पुन्हा मार्गदर्शन करून नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत गटविकास अधिकारी, वाई यांना १६ सप्टेंबर रोजी कळविण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे.

“ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाबाबत नियमानुसार शेरा नोंदविला आहे. कायदा, शासन निर्णय आणि नियमांचे काटेकोर पालन करताना कोणताही दबाव आणू नये. नियमांनुसार काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी राहील,” असे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संदीप सावंत यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी, वाई यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रामदास निंबाळकर, दिलीप जुनघरे, प्रमोद पोळ, शहाजी बोभाटे, मोहन कोळी, किरण निकम, संतोष अनगळ, दीपक जाधव, प्रशांत धुमाळ, मल्हारी शेळके, किरण पिसाळ, अतुल डेरे, अनिता धायगुडे, सुचित्रा राऊत, सुनीता राठोड यांच्यासह वाई तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना व वाई तालुका कृषी तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, दबावाची कारवाई सुरू राहिल्यास तालुकास्तरावर कामबंद आंदोलन आणि तीव्र निदर्शने करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे यशवंतनगरमधील बांधकामांच्या नोंदीचा प्रश्न आता अधिकच संवेदनशील बनला असून, प्रशासन या प्रकरणी पुढील कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

चौकट : ‘शेरा’ कायम की हटणार? प्रशासनापुढे पेच

एका बाजूला ‘अनधिकृत बांधकाम’चा शेरा हटवून नोंद घेण्याची मागणी, तर दुसऱ्या बाजूला नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची भूमिका आहे. त्यामुळे यशवंतनगरमधील हा प्रश्न केवळ मालमत्ता नोंदीपुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

3) वाई:-भरदुपारी बिबट्याचा थरार! पांडेवाडीत घरासमोरच्या दोन मेंढ्यांचा फडशा.

वनविभागाकडून पंचनामा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याची मागणी.

सातारा | वाई, दि. १९ : पांडेवाडी (ता. वाई) परिसरात बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांची चिंता वाढली असून, शुक्रवारी भरदुपारी बिबट्याने घरासमोर बांधलेल्या दोन पाळीव मेंढ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी सुमारे तीन वाजता घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी, पशुपालक आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांडेवाडी येथील शेतकरी शिवाजी लक्ष्मण भोसले यांच्या शेतातील राहत्या घरासमोर दोन मेंढ्या बांधण्यात आल्या होत्या. परिसरातील दाट उसाच्या पिकाचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मेंढ्यांवर झडप घातली. या हल्ल्यात दोन्ही मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, भोसले यांच्या घराभोवती मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने बिबट्याला लपण्यासाठी पोषक अधिवास मिळत आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त होत असून, दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पोलीस पाटलांनी गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर बिबट्या दिसल्याची माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेचच बिबट्याने मानवी वस्तीजवळ येऊन पाळीव जनावरांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणे, शेतकाम करणे तसेच घराबाहेर पडणे याबाबत शेतकरी आणि मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी मृत मेंढ्यांचा पंचनामा करून घटनेची नोंद केली.
पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने परिसरात तातडीने गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“दिवसा घराजवळच बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याने परिस्थिती गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.

4) वाई:-ढोल-ताशांचा गजर, अश्व-उंटांची मिरवणूक अन् सुवर्णरथाचा थाट; पसरणीत एकविरा गणेशोत्सव मंडळाचा दिमाखदार आगमन सोहळा.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाईंच्या ऐतिहासिक देखाव्याने वेधले ग्रामस्थांचे लक्ष.

सातारा | वाई, दि. १९ :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पसरणी (ता. वाई) गावात गणेशोत्सवाचा उत्साह यंदा आगळ्यावेगळ्या थाटात अनुभवायला मिळाला. एकविरा गणेशोत्सव मंडळ, कोलन यांच्या वतीने श्री गणरायाचा शाही आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ऐतिहासिक वारशाची जपणूक आणि भक्तीभावाचा सुंदर संगम घडवत मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा साकारलेला देखावा उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरला.
पारंपरिक वाद्यांचा निनाद, अश्व व उंटांची दिमाखदार मिरवणूक, आकर्षक सुवर्णरथ आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण पसरणी परिसर उत्साहाने भारून गेला होता. जयघोष आणि भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
या शाही सोहळ्यास पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाईंच्या ऐतिहासिक देखाव्याने उपस्थितांची मने जिंकली. इतिहासाची आठवण करून देणाऱ्या या देखाव्याला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विक्रांत महांगडे पाटील यांनी मंडळाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “पसरणीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला व्हावी, हा मंडळाचा प्रयत्न आहे. यापुढेही ऐतिहासिक देखावे, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कृती व इतिहासाची नाळ अधिक घट्ट करण्याचे काम केले जाईल.”
गणेशभक्तीला इतिहासाची जोड, पारंपरिक संस्कृतीला आधुनिक सादरीकरणाची किनार आणि सामाजिक संदेशाची प्रभावी सांगड घालत एकविरा गणेशोत्सव मंडळाने साकारलेला हा शाही आगमन सोहळा पसरणीकरांच्या स्मरणात राहणारा ठरला.

5) उंब्रज पुलावर टेंपोने घेतला पेट; महामार्गावर माजली धावपळ.

पोलिसांची झटपट धाव, नागरिकांची मदत; मोठा अनर्थ टळला, वाहतूक काही काळ विस्कळीत.

सातारा | उंब्रज, दि. १९ :
उंब्रज येथील महामार्गावरील पुलावर शुक्रवारी धावत्या टेंपोला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच टेंपोमधून धुराचे लोट आणि आगीच्या भडकलेल्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पुलाच्या मध्यभागीच ही घटना घडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली.
टेंपोला आग लागल्याची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा ताबा घेतला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. जवळील बँक तसेच पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेली अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असताना टेंपोने अचानक पेट घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य धोका टळला. वाहतूक सुरक्षितपणे वळविण्यात आल्याने काही काळानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. टेंपोला आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, आगीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा तपशीलही उपलब्ध होणे बाकी आहे.
संकटाच्या क्षणी पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने उंब्रज परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button