आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

वाई:-ज्ञानवर्धन विश्वकोश स्पर्धेत दिशा पब्लिक स्कूलची दिमाखदार कामगिरी!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-ज्ञानवर्धन विश्वकोश स्पर्धेत दिशा पब्लिक स्कूलची दिमाखदार कामगिरी!

सुहाना मोल्ला जिल्ह्यात प्रथम, गार्गी डेरे तृतीय; विद्यार्थिनींच्या यशाने शाळेचा गौरव.

वाई, दि. 23 : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने आयोजित विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाई येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत कु. सुहाना शहानुर शहालम मोल्ला हिने प्रथम क्रमांक, तर कु. गार्गी मेघा कमलाकर डेरे हिने तृतीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर आपला ठसा उमटविला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक प्रदान करण्यात आले.

समारंभाला जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, तहसीलदार (सर्वसाधारण) चंद्रकांत शितोळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मनोहर गव्हाड यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या ज्ञानआकलन व आत्मविश्वास वृद्धीसाठी मराठी माध्यमातील शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली. तर धनंजय चोपडे यांनी मराठी भाषा, साहित्य आणि ग्रंथांचे अवांतर वाचन करून भाषेचे जतन-संवर्धन करण्याचे आवाहन केले.

या यशासाठी विद्यार्थिनींना विषय शिक्षिका सौ. रुपाली सचिन चौधरी आणि सौ. वंदना विवेक शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम, सचिव प्रा. सौ. रूपाली कदम, मुख्याध्यापक श्री. ताजुद्दीन सय्यद, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशामुळे दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, शाळेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

2) वाई:-अजितदादांच्या जयंतीनिमित्त वाईत महाआरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद; ३२५ नागरिकांची तपासणी, ७० जणांचे रक्तदान.

प्रतिनिधी
वाई, दि. २५ : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वाई येथील बाजार समितीच्या शेतकरी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३२५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ७० नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करताना, “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने जनतेचा हक्काचा आणि कामाचा नेता गमावला आहे. त्यांचा शिस्तबद्ध कारभार, सर्वसामान्यांप्रती असलेला जिव्हाळा आणि झटपट निर्णयक्षमता यामुळे ते सर्वांच्या मनात कायम राहतील,” असे सांगितले.
ना. मकरंद पाटील व खा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, प्रतापराव पवार, पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, मार्केट कमिटीचे सभापती मोहन जाधव, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मदन भोसले, तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मार्केट कमिटी, पंचायत समिती येथे अभिवादन करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेंद्रे (सातारा) येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि वाई ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाई ग्रामीण रुग्णालय, ऑन्को लाईफ, सेवासदन लाईफ लाईन आणि अक्षय ब्लड बँकेच्या डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वाई तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

3) कराड:-उंब्रजमध्ये कडकडीत बंद; व्यापारी-व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू; दुपारनंतर बाजारपेठेत पुन्हा वर्दळ.

सातारा | कराड, दि. २५ :
कराड तालुक्यातील उंब्रज येथे विविध संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी (दि. २३) कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने दिवसभर बंद राहिली. त्यामुळे शहरात शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दुपारनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केल्याने रात्रीपर्यंत बाजारपेठेत पुन्हा काही प्रमाणात वर्दळ दिसून आली.
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने उंब्रज बंदची हाक देण्यात आली होती. याबाबत एक दिवस आधी उंब्रज पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते.
बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांना करण्यात आले होते. सकाळपासूनच या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद राहिल्याने नेहमीची गजबज पूर्णपणे ओसरली होती.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी औषधांची दुकाने, दवाखाने, वैद्यकीय प्रयोगशाळा तसेच अन्य अत्यावश्यक सेवा नियमित सुरू ठेवण्यात आल्या होत्या. बंद शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. दिवसभर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मिळाली.

4) सातारा:-सैनिक सहकारी बँकेविरोधात माजी सैनिकांचा एल्गार; चेअरमन व संचालक मंडळ बरखास्तीची मागणी.

सातारा | प्रतिनिधी
सातारा, दि. २५ : कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि., सातारा येथील कथित मनमानी कारभाराविरोधात सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांच्याकडे निवेदन सादर केले. बँकेच्या कारभाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करून चेअरमन व संपूर्ण संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करावे, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.
गुरुवार (दि. २३ जुलै) रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सहकार मंत्री, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तालुका उपनिबंधक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, स्वर्गीय कर्नल आर. डी. निकम यांनी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी स्थापन केलेल्या या सहकारी बँकेत पूर्वी सभासदांना सन्मानाची वागणूक मिळत होती. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवाल वेळेवर उपलब्ध होत असल्याने सभासदांना सभेत सहभागी होऊन प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळत होती.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून बँकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप सैनिक फेडरेशनने केला आहे. विशेषतः दि. १२ जुलै २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवाल अनेक सैनिक व कुटुंबीय सभासदांना देण्यात आला नसल्याने त्यांना सभेत उपस्थित राहून प्रश्न मांडण्याच्या व हरकती नोंदविण्याच्या वैधानिक अधिकारापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बँकेचे चेअरमन स्वतः सेवानिवृत्त सैन्य अधिकारी असूनही सैनिक व त्यांच्या कुटुंबीय सभासदांच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बँकेच्या कारभाराची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम, सातारा तालुका अध्यक्ष प्रवीण शिंदे, जिल्हा सचिव डॉ. ॲड. संजय लावंड, कॅप्टन संतोष धुमाळ, रामचंद्र इंगळे, आमिर शिंदे, आनंदराव शिंगाडे, अनिल शिंदे, संदीप पाटील, हणमंत बिचकर, उमाजी सूर्यवंशी, मारुती हूलवान, विजय माने यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक व कुटुंबीय सभासद उपस्थित होते.

5) कराड:-‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ कराडात वंचितचा एल्गार; लाठीमाराच्या निषेधार्थ तहसीलवर मोर्चा.

कराड | दि. २५ : ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी कराडमध्ये जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत हा मोर्चा बुधवारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झाला. कॉटेज हॉस्पिटल, कृष्णा नाका, कन्याशाळा, चावडी चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे दत्त चौकात पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना मदत द्यावी, विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधावा तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
मोर्चामध्ये समता सामाजिक विकास संस्थेचे आनंदराव लादे, फाउंडेशनचे जावेद नायकवडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली.

6) सातारा:-NEET पेपरफुटी प्रकरण तापले! NTA अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.


सातारा | दि. २५ : नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत सदोष मनुष्यवधासह विविध कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच विद्यार्थी व पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री, सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेनंतरही पेपरफुटी झाल्याने परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
परीक्षा आयोजन, सुरक्षा व्यवस्था, चौकशी, पुनर्परीक्षा आणि प्रशासकीय प्रक्रियांवर सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने संबंधित अधिकारी व यंत्रणांची फौजदारी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पेपरफुटी, निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, संगनमत, पदाचा गैरवापर आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹१ कोटी, तर परीक्षा प्रक्रियेमुळे मानसिक व आर्थिक फटका बसलेल्या प्रत्येक विद्यार्थी-पालकाला ₹१ लाख नुकसानभरपाई राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून देण्यात यावी. ही रक्कम दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करून त्यांची चल-अचल मालमत्ता जप्त करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षण, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा सुरक्षा व्यवस्था आणि जबाबदारी निश्चित करणारी पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे महारुद्र तिकुंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button