महाबळेश्वर:-भूस्खलनाचा धोका वाढला! नाव्हली–विवरमध्ये मंत्री मकरंद पाटीलांची तातडीची पाहणी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) महाबळेश्वर:-भूस्खलनाचा धोका वाढला! नाव्हली–विवरमध्ये मंत्री मकरंद पाटीलांची तातडीची पाहणी.

सातारा | महाबळेश्वर, दि. १९ : महाबळेश्वर तालुक्यातील नाव्हली आणि विवर गावांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाची राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी रविवारी तातडीने पाहणी केली. भूस्खलनामुळे मंदिर परिसरातील जमीन खचली असून गावाच्या पाणीपुरवठा टाकीचा मोठा भाग धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला हायअलर्ट राहण्याचे आदेश देत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मंत्री पाटील यांनी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. गावाचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री मकरंद पाटील म्हणाले, “अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटावर तातडीने तोडगा काढून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहून काम करावे.”
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, सभापती शकुंतला चोरमले, माजी सभापती संजय गायकवाड, जि.स. सदस्य संजय केळघणे, प्रवीण भिलारे, रमेश चोरमले, गणेश जाधव, बाबुराव सकपाळ, धोंडीराम जंगम, घनश्याम सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान मंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी भूस्खलनग्रस्त भागाची सखोल पाहणी करून आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली असून, परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
2) वाई:-शिरगावात ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण; पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग.

सातारा | वाई, दि. १९ : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दैवी संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘वृक्षारोपण महाअभियान २०२६’ अंतर्गत शिरगाव (ता. वाई) येथील सामाजिक वनीकरण क्षेत्रात तब्बल ५ हजार वृक्षांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.

संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संदेशाला कृतीत उतरवत स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात भक्तगण, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वृक्षारोपणामुळे परिसर अधिक हिरवागार होण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोलाची मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत, “झाडे लावण्याइतकेच त्यांचे संगोपनही महत्त्वाचे आहे,” असे सांगत प्रत्येकाने लावलेले झाड जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
यावेळी आरएफओ सविता रेडी पाटील, वनपाल राजलक्ष्मी वीर, वनरक्षक साक्षी शिंदे, वनसेवक विजय घाडगे, अमोल इथापे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, माजी सरपंच धर्मराज भोसले, संदीप पिसाळ, नितीन भोसले, मानसिंग भोसले, रामचंद्र भोसले, आनंदकुमार भोसले, विनायक भोसले, स्वप्निल भोसले, दादा घाडगे, जनार्दन भोसले, स्वामी तसेच शिरगाव व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान व समस्त ग्रामस्थ, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेत पर्यावरण संरक्षणाचा दृढ संकल्प व्यक्त केला.
3) फलटण:-‘सेवा हीच ईश्वरभक्ती!’ पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना वरद श्रीशा सोशल फाउंडेशनचा वैद्यकीय आधार.

सातारा | फलटण, दि. १९ : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात पंढरपूरकडे विठ्ठलनामाचा गजर करत निघालेल्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी वरद श्रीशा सोशल फाउंडेशन (ता. वाई) यांनी पुढाकार घेत १७ जुलै रोजी फलटण येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन केले.
लांबचा पायी प्रवास, ऊन-पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे वारकऱ्यांना होणारा पायांची सूज, अंगदुखी, ताप, खोकला तसेच इतर किरकोळ आजारांचा त्रास लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो वारकरी भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेत मोफत तपासणी व औषधोपचार करून घेतले.
या सेवाकार्यात वरद हॉस्पिटल अँड आयसीयू सेंटरच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे योगदान दिले. डॉ. शैलेंद्र धेडे, डॉ. विशाल मांढरे, डॉ. कृपाली धेडे, स्टाफ नर्स सुनीता कुंभार, ब्रदर विशाल पोळ आणि ॲम्ब्युलन्स चालक श्रीधर यादव यांनी वारकऱ्यांची आपुलकीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आशीर्वाद दिले.
यावेळी फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “आषाढी वारी ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. विठ्ठल भक्तांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा सेवाभावी उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, दिंडी प्रमुख, स्थानिक नागरिक आणि भाविकांनी वरद श्रीशा सोशल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांना सातत्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
4) साताऱ्यात एआयची ऊस शेती!; एकरी १०० टन उत्पादनाचे लक्ष्य, खर्चात ४०% बचत.

सातारा | दि. २१ : सातारा जिल्ह्यातील ऊस शेती आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक आधुनिक होणार आहे. जिल्हा वार्षिक योजना आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ’ हा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून, हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे तसेच कृषी विज्ञान व ऊस संशोधन केंद्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना वाऱ्याचा वेग, दिशा, तापमान, आर्द्रता आणि पुढील १४ दिवसांचा हवामान अंदाज मिळणार आहे. त्यामुळे अंदाजाऐवजी अचूक माहितीच्या आधारे शेतीचे नियोजन करता येईल. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांची वाढ होऊन एकरी १०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी काळोली (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय संकुलात विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले की, एआय प्रणाली मातीच्या गरजेनुसार खतांचे अचूक नियोजन, सिंचनाचे वेळापत्रक, रोगग्रस्त भागावरच फवारणी आणि हवामानावर आधारित सूचना देणार आहे. त्यामुळे खत, पाणी, फवारणी आणि मजुरीचा खर्च मिळून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होणार असून शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढण्यास मोठी मदत होईल.
कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देणारा हा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
5) वडूथ–आरळे पुलावर थरार! पेट्रोल टँकरला भीषण आग.

सातारा | वडूथ–आरळे पुलावर पेट्रोलने भरलेल्या टँकरच्या लाइनरला अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल असल्याने संभाव्य स्फोटाचा धोका निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली. सुरुवातीला पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पेट्रोलच्या आगीवर पाणी वापरणे धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आगीवर यशस्वी नियंत्रण मिळवण्यात आले.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
स्थानिक ग्रामस्थांच्या धाडस, प्रसंगावधान आणि योग्य समन्वयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
6) सातारा:-लग्नाच्या गडबडीत ४.५० लाखांची चोरी; ४८ तासांत सातारा पोलिसांचा मास्टरस्ट्रोक, सराईत चोर जेरबंद!

सातारा दि.२१:सातारा शहरातील एका विवाहसोहळ्यात झालेल्या साडेचार लाखांच्या चोरीचा सातारा शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत कोल्हापूरच्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमालही जप्त करून मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सातारा शहरातील कोरेगाव रोडवरील एका मंगल कार्यालयात ९ जुलै रोजी विवाहसोहळ्यादरम्यान हळदीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असताना अज्ञात चोरट्याने उघड्या खोलीत प्रवेश करून पर्समधील तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ३६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू करत सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेले सर्व दागिने आणि रोकड जप्त केली.
जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथक आणि सायबर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
चोरीचा संपूर्ण मुद्देमाल अवघ्या दोन दिवसांत परत मिळाल्याने तक्रारदार आणि नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले असून सातारा पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
7) सातारा:-नारीशक्ती फाऊंडेशनच्या सतर्कतेने सातार्यात बालविवाह रोखला; पोलिसांची तातडीची कारवाई, अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित.

संगम माहुलीतील नियोजित बालविवाह उधळला; नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन.
सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथे होणारा एक नियोजित बालविवाह नारीशक्ती फाऊंडेशनच्या सतर्कतेमुळे आणि सातारा पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे रोखण्यात आला. या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचल्याने सामाजिक स्तरावर समाधान व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता हा विवाह होणार होता. मात्र, विवाहाच्या आदल्या दिवशी नारीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, सातारा शहर पोलीस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तातडीने विवाहस्थळी धाव घेतली. वेळेत हस्तक्षेप करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि बालविवाह रोखण्यात यश आले.
या घटनेनंतर नारीशक्ती फाऊंडेशनने नागरिकांना बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात सजग राहण्याचे आवाहन केले आहे. १८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलगा यांचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास ती लपवून न ठेवता तात्काळ पोलीस, प्रशासन किंवा सामाजिक संस्थांना कळवावी, असे संस्थेने म्हटले आहे.
“योग्य वेळी माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवल्यास अनेक अल्पवयीन मुला-मुलींचे आयुष्य सुरक्षित होऊ शकते. एका मुलीवर होणारा अन्याय रोखता आल्याचे समाधान आहे,” अशी प्रतिक्रिया नारीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ नारीशक्ती फाऊंडेशन किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
8) कराड:-तासवडे टोलनाक्यावर तळबीड पोलिसांची धडक कारवाई; अवैध पार्किंगला चाप!

सातारा | कराड दि. २१ : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाका परिसरात वाढलेल्या अवैध पार्किंग आणि बेशिस्त वाहतुकीवर तळबीड पोलिसांनी धडक विशेष मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने हटविण्यासह मोटार वाहन अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तासवडे टोलनाका हा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा भाग असून येथे दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. मात्र, रस्त्याच्या कडेला होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय वाढत होती. ही बाब लक्षात घेऊन तळबीड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कठोर पावले उचलली.
मोहीमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अडथळा ठरणारी वाहने हटवून संबंधित चालकांना कडक समज देण्यात आली.
“वाहने केवळ अधिकृत पार्किंगमध्येच उभी करा. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील,” असा इशारा तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला.
दरम्यान, यंदा जानेवारीपासून तळबीड पोलिसांनी वाहतूक शिस्तीसाठी १,४४८ कारवाया करून ₹१२,४७,९०० इतका दंड वसूल केला आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून भारतीय न्याय संहिता कलम २८५ अंतर्गत २७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (कराड) राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबवली. महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.




