वाई:-१८७ किमी सायकलवारीतून विठ्ठलभक्तीचा संदेश! डॉक्टरांसह दोन चिमुकल्यांची जिद्द ठरली प्रेरणादायी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-१८७ किमी सायकलवारीतून विठ्ठलभक्तीचा संदेश! डॉक्टरांसह दोन चिमुकल्यांची जिद्द ठरली प्रेरणादायी.

सातारा | वाई : श्रद्धा, जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रेरणादायी संगम घडवत वाई येथील वरद हॉस्पिटलचे संचालक, नामांकित वैद्यकीय तज्ज्ञ आणि समाजसेवक डॉ. शैलेंद्र धेडे यांनी सलग दुसऱ्या वर्षी सायकलवरून पंढरपूरची १८७ किलोमीटरची वारी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे वाई तालुक्यासह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी सदैव तत्पर असलेले डॉ.धेडे यांनी वैद्यकीय व्यवसायासोबत समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. रुग्णसेवा, सामाजिक कार्य आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या कार्यातून दिसून येतो. यंदाच्या आषाढी वारीत त्यांनी सायकलवारीद्वारे “निरोगी शरीर, निरोगी मन आणि विठ्ठलभक्ती” हा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चि. वरद धेडे आणि चि. दिव्यांश धुमाळ या दोन लहानग्यांनीही संपूर्ण अंतर सायकलवरून पार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एवढ्या लहान वयात त्यांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि विठ्ठलभक्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.
इतिहास आणि परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या बावधन गावाचे सुपुत्र असलेल्या डॉ. शैलेंद्र धेडे यांनी आपल्या कृतीतून गावासह वाई तालुक्याचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये सायकलिंग, फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि अध्यात्माविषयी नवचैतन्य निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रेरणादायी सायकलवारीत डॉ. शैलेंद्र धेडे, डॉ. योगेश धुमाळ, दिलीप पाटील, श्रीधर यादव, चि. वरद धेडे आणि चि. दिव्यांश धुमाळ यांनी सहभाग घेतला.
श्रद्धा, सेवा, जिद्द आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा आदर्श घालून देणाऱ्या डॉ. शैलेंद्र धेडे यांच्या या सायकलवारीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवून शेकडो सायकलस्वारांना सहभागी करून घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




