पुणे:-(वारजे)-वारजेकरांच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा!
पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-(वारजे)-वारजेकरांच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा!

वारजे चर्च ते माई मंगेशकर हॉस्पिटल रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण अंतिम टप्प्यात;सचिन दोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.
पुणे, वारजे : वारजे परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे वारजे चर्च ते माई मंगेशकर हॉस्पिटल या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी, अरुंद रस्ता आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता हे काम पूर्णत्वाकडे आल्याने वारजेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वाच्या विकासकामासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन दोडके यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित विभागांशी समन्वय साधला. कामाची गुणवत्ता, गती आणि वेळेत पूर्तता यासाठी त्यांनी नियमित पाहणी करून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्ता पूर्ण झाल्यानंतर वारजे, कर्वेनगर, कोथरूड, सिंहगड रोड तसेच माई मंगेशकर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होणार आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
सचिन दोडके म्हणाले, “वारजेकरांना चांगले रस्ते, सुरक्षित वाहतूक आणि दर्जेदार सुविधा मिळणे हा माझा ध्यास आहे. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा आनंद आहे. पुढेही वारजेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन.”
स्थानिक नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत करत, वारजेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून विकासकामांना गती देणाऱ्या सचिन दोडके यांचे आभार व्यक्त केले. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वारजे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




