त्रिमली:-(पुसेसावळी)-जि.प.प्राथमिक शाळा त्रिमलीच्या शिष्यवृत्तीधारक अर्णव राहुल येवलेचा जंगी सत्कार.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

जि.प.प्राथमिक शाळा त्रिमलीच्या शिष्यवृत्तीधारक अर्णव राहुल येवलेचा जंगी सत्कार.

त्रिमली :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्रिमली येथे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी अर्णव राहुल येवले यांच्या सत्कार समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद सातारा शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती मा. सौ. तेजस्विनीताई कदम उपस्थित होत्या.
कार्यक्रमास खटाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सोनाली विभुते मॅडम, पुसेसावळी बीटच्या विस्तार अधिकारी सौ. संगीता गायकवाड मॅडम, कळंबी केंद्रसमूहाचे केंद्रप्रमुख श्री. धनाजी पवार, बोंबाळे केंद्रसमूहाचे केंद्रप्रमुख श्री. सूर्यवंशी, त्रिमली गावचे सरपंच श्री. हनमंत सुतार, उपसरपंच श्री. मारुती यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शंकर येवले, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अर्णव राहुल येवले यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने
“उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥” या संस्कृत सुभाषिताची प्रचिती पुन्हा एकदा आली. “केवळ इच्छा बाळगून यश मिळत नाही; जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच ध्येय गाठता येते. जसा झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून येत नाही, त्याचप्रमाणे प्रयत्नांशिवाय यश प्राप्त होत नाही,” हा या सुभाषिताचा संदेश अर्णवच्या यशातून अधोरेखित झाला.
त्याच्या या यशामागे स्वतःची अथक मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी बोलताना मा. सौ. तेजस्विनीताई कदम यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांची होत असलेली प्रगती ही शिक्षकांच्या समर्पित कार्याचे फलित असल्याचे सांगितले. भविष्यातही शाळेचा प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. सोनाली विभुते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि पालकांच्या सहकार्याचे महत्त्व विशद केले. सौ. संगीता गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहून ती परिश्रमाच्या जोरावर पूर्ण करण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद माळवे, उपशिक्षक श्री. उदय मोहिते आणि पदवीधर शिक्षक श्री. राजेंद्र नवले यांच्या शैक्षणिक कार्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरीत्या पार पडले. शेवटी केंद्रप्रमुख श्री. धनाजी पवार यांनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



