वाई:-हातात नवी पुस्तके, चेहऱ्यावर आनंद; मुगाव जि.प.शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-हातात नवी पुस्तके, चेहऱ्यावर आनंद; मुगाव जि.प. शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत!

सातारा |
वाई, दि. १८ : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुगाव येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. आकर्षक सजावट, औक्षण, गुलाबपुष्प आणि शैक्षणिक साहित्याच्या वितरणामुळे शाळा परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य तसेच विशेष स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे आणि वाई पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मेटकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना दिनकर शिंदे यांनी मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगातही जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून शासनाकडूनही मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य आणि पोषण आहार यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे पालकांनी मराठी शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास सरपंच सविता सोंडकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुषमा महांगरे, महेश शिंदे, तस्लिम सय्यद, अर्चना सोंडकर, प्रिया महांगरे, वैशाली फणसे, पूजा महांगरे, मोहिनी कुंभार, अर्चना वैराट, अंगणवाडी सेविका विमल फणसे, लता कुंभार, रुचिता गोळे, ग्रामसेवक दीपक जाधव यांच्यासह अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्याध्यापिका अर्चना थोरवे व उपशिक्षक दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके, गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण झाली असून मुगाव शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात झाली आहे.
2) सातारा:-“महायुतीचा पाठिंबा मनापासून की दबावापोटी?”; अभयसिंह जगतापांचा मतदारांना भावनिक सवाल.

सातारा | प्रतिनिधी
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने भाजप उमेदवाराला दिलेला पाठिंबा हा खऱ्या अर्थाने मनापासून आहे की राजकीय दबावापोटी, याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केले आहे. भाजपचा उमेदवार निवडून आल्यास त्याचा फटका महायुतीतील इतर घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाच बसू शकतो, असा दावा करत त्यांनी मतदारांना महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.
जगताप म्हणाले की, भाजपचा उमेदवार विजयी झाल्यास त्याचे कार्यकर्ते शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या लोकप्रतिनिधींनाच कमी लेखतील. त्यामुळे आपल्या नेत्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराण्यांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांचा उल्लेख करताना त्यांनी छत्रपती घराणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार मकरंद पाटील यांच्याशी असलेल्या दोन पिढ्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला. “राजकीय परिस्थितीमुळे हे नेते भाजप उमेदवाराचा प्रचार करत असले, तरी त्यांच्या मनातील उमेदवार मीच आहे,” असा दावा त्यांनी केला.
भाजपवर टीका करताना जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना भविष्यात दुय्यम वागणूक मिळू शकते, असा इशारा दिला. “आज भाजपला रोखले नाही, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील. अनेकांच्या मनात नाराजी असली तरी ती ते उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत,” असे ते म्हणाले.
देशातील महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या धोरणांवरही टीका केली. “शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेऐवजी आरएसएसची विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत स्वाभिमानासाठी मी संघर्ष करत आहे. नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असतानाही मी मैदानात उतरलो असून वादळात पेटलेल्या दिव्यासारखी ही लढाई लढत आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
सातारा-सांगलीतील स्वाभिमानी मतदारांनी या संघर्षात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन अभयसिंह जगताप यांनी केले.
3) वाळवा:-पाणीपट्टी माफी, मोफत साखर अन् ४ हजारांचा दर; येडेमच्छिंद्रच्या सभेत ‘संस्थापक पॅनेल’च्या मोठ्या घोषणा!

वाळवा | प्रतिनिधी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, येडेमच्छिंद्र येथे झालेल्या जाहीर सभेत ‘कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल’ ने सभासदांसाठी आकर्षक आश्वासनांची सरबत्ती केली. सत्तेवर आल्यानंतर सभासदांना एकरी ७,५०० रुपयांची पाणीपट्टी माफी, १२० किलो दर्जेदार साखर घरपोच आणि थकीत बैठी पाणीपट्टी पूर्ण माफ केली जाईल, अशी घोषणा पॅनेलच्या नेत्या अर्चनाताई मोहिते यांनी केली.
येडेमच्छिंद्र येथे आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी चेअरमन अविनाश मोहिते, बंडानाना जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर, गजानन पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अर्चनाताई मोहिते म्हणाल्या, “बैठी पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे अनेक शेतकरी इतर कारखान्यांकडे वळत आहेत. त्यामुळे कारखान्याला ऊस पुरवठा घटत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आम्ही सत्तेवर येताच थकीत बैठी पाणीपट्टी माफ करू. तसेच वाढीव पाणी पाळ्या देऊन सभासदांना दिलासा देऊ.”
यावेळी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत कारखान्याच्या मालकीच्या संस्थांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. सुमारे १० हजार मृत सभासदांच्या वारसांच्या नावावर अद्याप शेअर्स हस्तांतरित झाले नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ऊसतोड, पाणीपुरवठा आणि कामगारांच्या प्रश्नांवर सभासदांनी आता सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बंडानाना जगताप यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करत, कारखान्यावर सुमारे ९७७ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा केला. मात्र विविध उपउत्पादनांमधून मोठे उत्पन्न मिळत असल्याने योग्य व्यवस्थापन केल्यास सभासदांना प्रति टन ४ हजार रुपये दर देणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
अजितराव पाटील-चिखलीकर यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत विविध प्रकल्पांसाठीचा निधी कुठून आला, याचा हिशोब मागितला. सभासदांच्या पैशातून उभारलेल्या संस्थांमध्ये बाहेरील व्यक्तींना रोजगार दिला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, सभासदांच्या मुलांना प्राधान्य का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वाभिमानाने मतदान करण्याचे आवाहन केले.
सभेत गजानन पाटील आणि प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले, तर आभार सुरेश संभाजी पाटील यांनी मानले. सभेला परिसरातील शेतकरी, सभासद आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
4) मलकापूर:-ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण अन् गोड खाऊ; आ. च. विद्यालयाचा प्रवेशोत्सव ठरला अविस्मरणीय!

मलकापूर, दि. १८ : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मलकापूर येथील श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आ. च. विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, लेझीम-झांज पथकाची साथ, फुलांची उधळण आणि गोड खाऊ यामुळे विद्यालयाचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेची भीती दूर करून शिक्षणाबद्दल आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यालयाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, झांज पथक आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत विशेष आकर्षण निर्माण केले.
विद्यालयाचे प्रवेशद्वार आकर्षक रांगोळी, रंगीबेरंगी फुगे आणि भव्य स्वागत कमानीने सजविण्यात आले होते. शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. शिक्षकांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला वही आणि पेन भेट देत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शासनाच्या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन कोरी पुस्तके हातात मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या आनंदात अधिक भर घालत विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊही देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक एम. पी. फराळे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर व्हावी आणि त्यांच्यासाठी शाळेचा पहिला दिवस कायम स्मरणात राहावा, यासाठी हा प्रेरणादायी प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे.” त्यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना विद्यालयाची वैशिष्ट्ये, शिस्तबद्ध वातावरण आणि शैक्षणिक प्रगती याबाबतही सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, संचालिका डॉ. स्वाती थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्याध्यापक जे. बी. पाटील, पर्यवेक्षिका एस. आर. भोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाच्या या आगळ्यावेगळ्या प्रवेशोत्सवाचे मलकापूर परिसरातील पालकांकडून विशेष कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात संस्मरणीय ठरली.
5) सांगली:-वांगीत भोसले सहकार पॅनलची शक्तिप्रदर्शन सभा; जनसागराच्या उपस्थितीत विजयाचा निर्धार!

सांगली | कडेगाव, दि. १८ : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांगी (ता. कडेगाव) येथे आयोजित करण्यात आलेली जयवंतराव भोसले सहकार पॅनलची भव्य जाहीर सभा प्रचंड उत्साहात पार पडली. सभेला कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पॅनलच्या बाजूने जोरदार शक्तिप्रदर्शन घडवून आणले.
सभेत कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. वक्त्यांनी कारखान्याच्या आर्थिक सक्षमीकरणासह सभासद आणि शेतकरी हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देत, कृष्णा कारखान्याची प्रगती ही दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे फलित असल्याचे सांगितले.
गेल्या दशकभरात कारखान्याने अनेक विकासात्मक निर्णय घेत सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. हीच विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आगामी काळातही सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शेतकरी व सभासदांच्या विश्वासाच्या जोरावरच कृष्णा कारखाना राज्यातील आघाडीच्या साखर कारखान्यांमध्ये स्थान मिळवू शकला असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
येत्या २१ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘कपबशी’ चिन्हासमोरील चौकटीत शिक्का मारून जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सभेतून करण्यात आले.
या सभेला पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील, दिलीप सूर्यवंशी (माजी व्हाईस चेअरमन, सोनहिरा सहकारी साखर कारखाना), सुरेश मोहिते (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांच्यासह सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, ग्रामस्थ, ऊस उत्पादक व सभासद बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सभेतील उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा जोश आणि सभासदांची मोठी उपस्थिती पाहता वांगी परिसरात जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मोठे जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र या सभेतून स्पष्ट झाले.
6) कराड:-ओगलेवाडीत ‘सहकार पॅनल’चा झंझावात; प्रचंड सभेने कृष्णा निवडणुकीचे वातावरण तापले!

कराड, दि. १८ : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओगलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जयवंतराव भोसले सहकार पॅनल’च्या प्रचार सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे परिसरात सहकार पॅनलच्या विजयाची जोरदार चर्चा रंगली आहे.
या सभेत वक्त्यांनी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. कारखान्याची आर्थिक घोडदौड, पारदर्शक कारभार, वेळेवर दिली जाणारी ऊस बिले आणि सभासद हिताच्या विविध योजनांमुळे कृष्णा कारखाना राज्यातील आदर्श सहकारी संस्थांपैकी एक बनल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शेतकरी आणि सभासदांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना, आगामी काळातही विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनलला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. कारखान्याचा सर्वांगीण विकास आणि ऊस उत्पादकांचे हित सुरक्षित ठेवण्याची क्षमता केवळ जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडे असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांना दि. २१ जून रोजी होणाऱ्या मतदानात “कपबशी” चिन्हासमोरील खात्यात शिक्का मारून सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
सभेला परिसरातील सभासद, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओगलेवाडीतील या सभेतील उत्साह आणि गर्दी पाहता कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलने आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय व सहकारी क्षेत्रात सुरू झाली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण अधिकच तापले आहे.
7) कराड:-‘सुंदर माझी शाळा’ अभियानात यशवंत हायस्कूलचा झेंडा बुलंद! सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा.

कराड दि. १८ : रयत शिक्षण संस्थेच्या कराड येथील नामांकित यशवंत हायस्कूलने ‘सुंदर माझी शाळा अभियान २०२५-२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान कामगिरीमुळे कराड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून सर्वत्र शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड, सासवड आणि संत सोपानकाका फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील तब्बल ४,०६२ शाळांचा सहभाग होता. विविध निकषांवर करण्यात आलेल्या कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर यशवंत हायस्कूलने आपल्या स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता, परिसर व्यवस्थापन आणि सर्वांगीण विकासाच्या बळावर सातारा जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले.
या यशाबद्दल सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते शाळेला सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार संजय जगताप, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यशवंत हायस्कूलच्या वतीने मुख्याध्यापक व्ही. यु. पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर, एस. डी. शेडगे, एस. एम. घारगे, झहीर शेख, व्ही. टी. येसनकर आणि अमोल यादव यांनी पुरस्कार स्वीकारला.
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. रविंद्र केशवराव पवार, मुख्याध्यापक व्ही. यु. पाटील, पर्यवेक्षिका एस. एस. मोरे, माजी मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कराड तालुक्यासह संपूर्ण शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होत आहे.
‘सुंदर शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आदर्श व्यवस्थापन’ यांचा उत्कृष्ट संगम घडवत यशवंत हायस्कूलने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप राज्यभर उमटवली आहे.




