सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांचे पारडे जड.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांचे पारडे जड.

सातारा | प्रतिनिधी
सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीची मोर्चेबांधणी केल्याने कदम यांना मोठा फायदा होत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, शिवसेना नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते मकरंद आबा पाटील यांनी धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. महायुती धर्म कायम राखण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम केल्याचे दिसून येत आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, धैर्यशील कदम यांना सुमारे ६५५ मते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे उमेदवार अभयसिंह जगताप यांना सुमारे २५५ मते मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एकूण १७ जागांपैकी ६ जागा महायुतीच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीमुळे आधीच महायुतीच्या खात्यात जमा झाल्या आहेत, तर उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. या सर्व ११ जागांवरही महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्यात महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि घटक पक्षांमधील समन्वय यामुळे महायुतीची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा-सांगली मतदारसंघातही धैर्यशील कदम यांच्या विजयाची चर्चा अधिक जोर धरत आहे.
– आरपीएस स्टार न्यूज




