वाई:-परंपरेचा अभिमान, संस्कृतीचा जागर! वेळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-परंपरेचा अभिमान, संस्कृतीचा जागर! वेळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

आदिवासी अस्मिता, संस्कृती अन् सामाजिक एकतेचा जागर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग.
सातारा | वाई दि. १० :
आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा, परंपरा आणि अस्मितेचा जागर करत वेळे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची गौरवशाली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदान अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सिंधूताई अर्जुन ढमाळ, ग्रामपंचायत सदस्य दीपक पवार, विजय पवार, दशरथ पवार, उषा पवार, नीलम नलावडे, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य – सातारा जिल्हाध्यक्ष सदाशिव रुईघरे, वाई तालुका अध्यक्ष संपत सूर्यवंशी, शामराव पवार आणि झाडे बापू यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
उपस्थित मान्यवरांनी आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपतानाच शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास आणि युवकांच्या प्रगतीला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
वेळे येथील आदिवासी परिवारांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. उत्साह, एकता आणि सांस्कृतिक अभिमानाने भारलेल्या या सोहळ्यातून आदिवासी समाजाच्या अस्मितेचे आणि सामाजिक एकतेचे प्रभावी दर्शन घडले.
2) वाई:-पुस्तकातून शेतापर्यंत! ‘मातीशी नाते’तून विद्यार्थ्यांनी घेतला भातशेतीचा प्रत्यक्ष धडा
चिखलात उतरले विद्यार्थी.

सातारा | वाई दि. १० :
भूगोल आणि जलसुरक्षेचे धडे केवळ वर्गाच्या चार भिंतींत न शिकता प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात करण्याच्या उद्देशाने दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मालतपूर येथे शेतात उतरून भातशेतीचा अनोखा अनुभव घेतला. ‘मातीशी नाते’ या अनुभवाधारित उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भातरोपांची लागवड करत शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांच्या कष्टांशी थेट नाते जोडले.
मालतपूर गावचे सरपंच निलेश वाडकर यांच्या शेतात विद्यार्थ्यांनी भाताची रोपे उपटणे, त्यांचे गठ्ठे बांधणे आणि चिखलाने भरलेल्या शेतात प्रत्यक्ष भातरोपांची लागवड करणे अशी कामे केली. शेतात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरला. अन्नधान्य आपल्या ताटात येण्यापूर्वी शेतकऱ्याला घ्याव्या लागणाऱ्या अथक मेहनतीची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी धोम धरणाला भेट देत जलसाठा, जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि जलसुरक्षा याबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यामुळे वर्गात शिकविल्या जाणाऱ्या भौगोलिक संकल्पनांना प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याची प्रभावी संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
संस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. नितीन कदम, सचिव प्रा. रुपाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य ताजुद्दीन सय्यद आणि माध्यमिक विभागप्रमुख वसुंधरा पानसे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षक रुपाली चौधरी, प्रज्ञा वाघमारे, विनिता पवार, सारिका सपकाळ, वैभवी सावंत, सुमित भंडलकर आणि सतीश पांचाळ यांनी विशेष सहकार्य केले.
“विद्यार्थ्यांनी शेती केवळ पुस्तकातून समजून न घेता प्रत्यक्ष शेतात उतरून तिचा अनुभव घ्यावा, हा ‘मातीशी नाते’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अनुभवाधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, निसर्गप्रेम आणि सामाजिक जाणीव निर्माण होते,” असे मत दिशा पब्लिक स्कूलच्या सचिव प्रा. रुपाली कदम यांनी व्यक्त केले.
3) सातारा:-क्रांतीकारकांच्या भूमीतच क्रांतीस्तंभाला ‘विसर’!

सातारा | दि. १० : सातारा जिल्हा क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखला जातो. या जाज्वल्य इतिहासाची आठवण कायम राहावी यासाठी हजेरी माळावर उभारण्यात आलेल्या ऑगस्ट क्रांती स्तंभालाच ९ ऑगस्ट या ऑगस्ट क्रांती दिनी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले. विशेष म्हणजे स्तंभ परिसरात अस्वच्छता, गवत आणि झुडपांचे साम्राज्य असताना अवघ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत परिसराची स्वच्छता करून क्रांतीस्तंभाला अभिवादन केले. या प्रकाराचा कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात उठता-बसता क्रांतीकारकांचा इतिहास आणि साताऱ्याच्या शौर्यपरंपरेचा उल्लेख केला जातो. मात्र ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांच्या ‘क्रांतीप्रेमाची’च पोलखोल झाल्याची टीका कार्यकर्त्यांनी केली. जिल्ह्यात मंत्री, खासदार, आमदार, विविध पदाधिकारी तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी असतानाही या ऐतिहासिक स्थळाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे.
९ ऑगस्ट रोजी सकाळी काही कार्यकर्ते हजेरी माळावरील ऑगस्ट क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेले असता मुख्य प्रवेशद्वाराला चक्क कुलूप असल्याचे दिसून आले. फोनाफोनी केल्यानंतर सकाळी सुमारे १० वाजता गेट उघडण्यात आले. आत प्रवेश केल्यानंतर स्तंभ परिसरात अस्वच्छता, वाढलेले गवत आणि झुडपे आढळून आली. अखेर कार्यकर्त्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच स्वच्छता मोहीम हाती घेतली. परिसर स्वच्छ केल्यानंतर क्रांतीस्तंभाला अभिवादन करून घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, भरत राऊळ, शिवाजी जाधव, गणेश अहिवळे, महारुद्र तिकुंडे, गुलाब बनसोडे, विजय जाधव, कैलास कुंभार, जयवंत कांबळे, प्रज्योत तिकुंडे, सागर जगदाळे, मोहन शिंदे, हणमंत शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी सुशांत मोरे यांनी संताप व्यक्त करत, क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात जन्माला आलेल्या प्रत्येकाने ऑगस्ट क्रांती दिनी या ठिकाणी येऊन अभिवादन करणे अपेक्षित होते, असे सांगितले. मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक स्थळाला अभिवादन करणे ही केवळ औपचारिकता नसून त्यांच्याकडून असलेली नैतिक जबाबदारी आहे. मात्र तीही पार पाडली गेली नसल्याने संबंधितांचा जाहीर निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महारुद्र तिकुंडे यांनीही राजकारणी, पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे क्रांतीकारकांवरील प्रेम केवळ बेगडी असल्याचा आरोप केला. हजेरी माळावरील अस्वच्छता, क्रांतीस्तंभाला लावलेले कुलूप आणि समितीची केवळ नावापुरती व्यवस्था यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऑगस्ट क्रांती दिनासारख्या ऐतिहासिक दिवसाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी जाधव, गणेश अहिवळे, कैलास कुंभार आणि जयवंत कांबळे यांनी ऑगस्ट क्रांती दिन आणि क्रांतीस्तंभाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. यापुढे दरवर्षी हा दिवस अधिक व्यापक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रांतीकारकांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी एकदा तरी क्रांतीस्तंभाकडे वळून पाहावे, अशी संतप्त भावना या निमित्ताने व्यक्त झाली.
4) वाई:-चेष्टा-मस्करीचा गैरसमज अन् थेट डोक्यात कड्याचा घाव! ‘जिवंत सोडणार नाही’ म्हणत तरुणाला धमकी.

सातारा | वाई, दि. १० : मित्रांमधील साधी चेष्टा-मस्करी एका तरुणाच्या चांगलीच अंगलट आली. गैरसमजातून संतापलेल्या तरुणाने वाद घालत हातातील कड्याने डोक्यात आणि नाकावर प्रहार केल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यातील विरमाडे हद्दीत मुनलाईट बारसमोर घडली. हल्ल्यानंतर ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुला बघून घेईन’ अशी धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद दिलीप शिंगटे (वय २८, रा. मर्ढे, ता. जि. सातारा) हे डी.सी.सी. बँकेच्या वाहगाव शाखेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते विरमाडे येथील मुनलाईट बारसमोर मित्रांसोबत उभे होते. यावेळी मित्रांमध्ये गप्पा सुरू असताना प्रसाद यांनी मित्रांची चेष्टा-मस्करी केली.
दरम्यान, आरोपी शुभम जयवंत शिवनकर (रा. खर्शी, ता. जावली, जि. सातारा) हा बारमधून बाहेर आला. प्रसाद हे आपल्या मित्रांना शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज झाल्याने त्याने ‘तू मला शिव्या का दिल्या?’ असा जाब विचारत वाद घातला.
वाद वाढताच संतापलेल्या शुभम शिवनकर याने हातातील कडे काढून प्रसाद शिंगटे यांच्या डोक्यात आणि नाकावर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात प्रसाद यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. प्रसंगी उपस्थित असलेल्या सोमनाथ विलास पवार, धनंजय बोडरे आणि साहेब इनामदार यांनी मध्यस्थी करत प्रसाद यांची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.
मात्र, एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. घटनास्थळावरून निघताना आरोपीने ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुला बघून घेईन’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जखमी प्रसाद शिंगटे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अमोल साळुंखे करीत आहेत.


RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.



