आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-दिशा ज्युनिअर कॉलेजच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; संस्थापकांसह युवकांचे रक्तदान.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-दिशा ज्युनिअर कॉलेजच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; संस्थापकांसह युवकांचे रक्तदान.

सातारा | प्रतिनिधी
वाई येथील दिशा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराला नागरिक, युवक-युवती, माजी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
सातारा येथील बालाजी ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामागे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश होता. शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे दिशा ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम आणि संचालिका प्रा. रूपाली कदम यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
त्यांच्या प्रेरणेतून अनेक युवक-युवतींनी प्रथमच रक्तदान करत समाजसेवेची भावना जपली. यावेळी बोलताना प्रा. डॉ. नितीन कदम यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य ताजुद्दीन सय्यद, ॲडमिनिस्ट्रेटर सारिका चव्हाण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांची नोंदणी, मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे शिबिर शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
शिक्षणासोबतच समाजसेवेचे संस्कार रुजविणाऱ्या दिशा ज्युनिअर कॉलेजच्या या उपक्रमाचे वाई परिसरातून कौतुक होत असून, रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याचा संदेश या शिबिरातून प्रभावीपणे देण्यात आला. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.

2) धोम मत्स्यबीज केंद्र खासगी कंत्राटदाराच्या घशात? प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; जमिनी परत करण्याची मागणी.

सातारा |
वाई, दि. १६ : धोम येथील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या कारभारावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप घेत शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मत्स्यबीज उत्पादनासाठी स्थापन करण्यात आलेला हा प्रकल्प मूळ उद्देशापासून भरकटला असून तो खासगी कंत्राटदाराच्या ताब्यात गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, १९७२ साली सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिक व शेतकऱ्यांना वाजवी दरात मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने धोम परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. मात्र, सध्या केंद्रात मत्स्यबीज उपलब्ध नसते किंवा उपलब्ध झाल्यास त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
यासंदर्भात मत्स्यबीज आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकरी प्रतिनिधींना एका खासगी ठेकेदाराने अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शासकीय प्रकल्पात एका खासगी व्यक्तीकडून “इथला मालक मी आहे” अशा स्वरूपाची भाषा वापरली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना पर्यायी जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्यापही पर्यायी जमीन मिळालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मूळ हेतू बदलला असेल तर संपादित केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी शासनाने संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, प्रकल्पाच्या खासगीकरणाबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, प्रलंबित पर्यायी जमिनी तातडीने द्याव्यात, मत्स्यबीज नाममात्र दरात उपलब्ध करून द्यावे तसेच शेतकरी प्रतिनिधींना दमदाटी करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
हे निवेदन देताना धोमचे सरपंच सचिन कांबळे, माजी सरपंच अविनाश नाईकवडी, अशोक मराठे, प्रकाश पोळ, प्रमोद पोळ, प्रशांत पोळ, देविदास पोळ, दिलीप शेरे, बायजाबाई वाघमारे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

3) सातारा:-शाळा ही जीवन शिक्षणाची मंदिरे; गुणवत्तापूर्ण शिक्षणालाच प्राधान्य द्या!
प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ‘प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे मार्गदर्शन.

सातारा | प्रतिनिधी
सातारा, दि. १६ : शाळा ही केवळ भौतिक सुविधांची जागा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी पवित्र मंदिरे आहेत. त्यामुळे इमारती आणि सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांना मिळणारे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
साताऱ्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आयोजित ‘विद्यार्थी स्वागत व प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी नगरसेविका भारती शिंदे, किरण पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतापसिंह हायस्कूलच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वे या शाळेतून घडली आहेत. माजी मुख्यमंत्री धनजीशा कूपर, उद्योजक, कृषितज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. हा समृद्ध वारसा जपून शाळेचे नाव अधिक उंचावण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांवर आहे.
आज प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे आदर्श नागरिक, प्रशासकीय अधिकारी आणि देशाची प्रगती घडवणारे नेतृत्व निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भविष्यात याच शाळेतील विद्यार्थी आयएएस अधिकारी बनून अशा कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
यावेळी त्यांनी शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना आधुनिक काळाशी सुसंगत आणि उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे आवाहन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून प्रतापसिंह हायस्कूलचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधिक उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळेतील दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

4) सोनके जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष; खा. नितीन पाटील यांच्या हस्ते चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत.

सातारा |
कोरेगाव, दि. १६ : सोनके (ता. कोरेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. खासदारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना खा. नितीन पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षणाचा मजबूत पाया विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सोनके शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमादरम्यान खासदारांनी शाळेतील संगणक कक्षाची पाहणी करून डिजिटल शिक्षण सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाठी-काठी, लेझीम आणि विविध मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.
यावेळी पंचायत समिती सदस्य आकाश सोळस्कर यांनी शाळेच्या स्वच्छतागृहाच्या कामासाठी पंचायत समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
प्रवेशोत्सवानिमित्त संपूर्ण शाळा परिसर आकर्षक सजावट आणि रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण, पंचायत समिती सदस्य आकाश सोळस्कर, रुपाली साळुंखे, सतीश धुमाळ, संभाजी धुमाळ, मंगेश धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, संजय साळुंखे, ललित मुळीक, डॉ. सुयोग लेंभे, सूर्यकांत निकम, प्रदीप जगताप, जितेंद्र जगताप, सरपंच पुष्पा साठे, रणजित धुमाळ, राहुल धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम पवार, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंगल यादव, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. गोड खाऊ वाटप आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रवेशोत्सवाच्या या देखण्या सोहळ्याची परिसरात सर्वत्र चर्चा रंगली आहे.

5) वाई:-मुगाव शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत; मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण.

वाई, प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य तसेच स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले.
नवागतांच्या स्वागतासाठी शाळा परिसर आकर्षक सजावटीने नटविण्यात आला होता. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे तसेच पंचायत समिती, वाई येथील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मेटकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना बापूसाहेब शिंदे यांनी मराठी शाळांच्या गुणवत्तेवर विश्वास व्यक्त केला. “मराठी शाळा कोणत्याही बाबतीत कमी नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य, पोषण आहार यांसह अनेक सुविधा दिल्या जात असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळांमध्ये प्रवेश द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सरपंच सविता सोंडकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुषमा महांगरे, महेश शिंदे, तस्लिम सय्यद, अर्चना सोंडकर, प्रिया महांगरे, वैशाली फणसे, पूजा महांगरे, मोहिनी कुंभार, अर्चना वैराट, अंगणवाडी सेविका विमल फणसे, लता कुंभार, रुचिता गोळे तसेच ग्रामसेवक दीपक जाधव यांची उपस्थिती होती.
मुख्याध्यापिका अर्चना थोरवे व उपशिक्षक दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण होऊन नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात झाली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button