आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-ओझर्डेत सौरक्रांतीचा उजेड! ‘माळ आळी’ विहिरीवर सोलर यंत्रणा कार्यान्वित; ग्रामपंचायतीचे वीज बिल शून्याकडे.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) ओझर्डेत सौरक्रांतीचा उजेड! ‘माळ आळी’ विहिरीवर सोलर यंत्रणा कार्यान्वित; ग्रामपंचायतीचे वीज बिल शून्याकडे.

वाई दि.|
वाई तालुक्यातील ओझर्डे गावासाठी दिलासादायक आणि विकासाला चालना देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, ‘आरंभ’ संस्थेच्या पुढाकारातून माळ आळी येथील विहिरीवर सोलर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी येणारा मोठा वीज खर्च पूर्णपणे थांबणार असून ग्रामपंचायतीचे वीज बिल जवळपास शून्यावर येणार आहे.
नवी मुंबईस्थित आरंभ संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभा मूर्ती यांच्या विशेष प्रयत्नांतून हा प्रकल्प अल्पावधीत साकार झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी ओझर्डे गावाला भेट देत गावाच्या विकासाच्या गरजा जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी पाणीपुरवठा योजनेच्या वाढत्या वीज बिलाची समस्या त्यांच्या निदर्शनास आली. गावाची अडचण ओळखून त्यांनी एका महिन्याच्या आत सोलर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि ते प्रत्यक्षात उतरवून दाखवले.
‘जय हिंद सोलर’चे महेश घरटे यांनी हे काम अत्यंत कमी कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले. त्यांना मयूर डिसिल्वा व भरत सणस यांचे सहकार्य लाभले. तसेच आरंभ संस्थेचे समन्वयक शेखर जाधव आणि अभियंता गणेश कोदे यांनीही या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी बोलताना श्रीमती शोभा मूर्ती यांनी, “गावाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या या सुविधांचा ग्रामस्थांनी योग्य वापर करून त्यांची नियमित देखभाल करावी,” असे आवाहन केले. तसेच गावाच्या प्रगतीसाठी विजयसिंह पिसाळ यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी विजयसिंह पिसाळ, विक्रमसिंह पिसाळ, अण्णासो फरांदे, विश्वजीत पिसाळ, अविनाश फरांदे, सरपंच शेखर फरांदे, केशव पिसाळ, एल. डी. फरांदे, विशाल फरांदे, रवींद्र कुंभार यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामसेवक संजय वर्णेकर, हणमंत कदम आणि प्रमोद सोनवणे यांनीही प्रशासकीय सहकार्य केले.
सौरऊर्जेवर चालणारी पाण्याची मोटर कार्यान्वित झाल्याने गावातील पाणीपुरवठा अधिक सक्षम झाला असून ग्रामपंचायतीला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या विकासकामाबद्दल ग्रामस्थांनी आरंभ संस्था व श्रीमती शोभा मूर्ती यांचे विशेष आभार.

2) अतिक्रमणविरोधी लढ्याचा विजय! प्रशासन झुकले; ७ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर लेखी आश्वासन.

येवतीतील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू; १५ व्या वित्त आयोगातील कथित १० लाखांच्या अपहारावरही ग्रामस्थ आक्रमक.

कराड दि. ०१ : येवती (ता. कराड) येथील ‘म्हासोली-येवती मध्यम प्रकल्पाच्या’ शासकीय जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी आणि ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर राजेंद्र सोरटे आणि शंकर सोनवणे यांनी सातव्या दिवशी आपले आमरण उपोषण स्थगित केले.
गेल्या सात महिन्यांपासून विविध शासकीय कार्यालयांकडे ऑनलाइन तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांनी २१ मेपासून भैरवनाथ मंदिर परिसरात आमरण उपोषण सुरू केले होते. जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली मोजणी प्रक्रिया अखेर उपोषणाच्या सहाव्या दिवशी मार्गी लागली. पीडब्ल्यूडी विभागाने अतिक्रमणांचे मार्किंग करून संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. त्यानंतर विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, २९ मे रोजी पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या ग्रामसभेत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित १० लाख रुपयांच्या अपहाराचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासनाकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार की प्रकरण दडपले जाणार, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
“अतिक्रमण आणि निधीतील अपहाराविरोधातील हा लढा केवळ दोन व्यक्तींचा नसून संपूर्ण गावाच्या हक्कांचा आहे. प्रशासनाने जबाबदारीने काम केले नाही, तर जागृत झालेली नवी पिढी कायदेशीर मार्गाने लढा अधिक तीव्र करेल,” असा इशारा उपोषणकर्ते राजेंद्र सोरटे यांनी दिला.

3) राष्ट्रीय ‘डायमंड अवॉर्ड’ विजेत्या पत्रकार विद्या मोरे यांचा कराडमध्ये भव्य सत्कार!

मराठा महासंघाकडून गौरव; सामाजिक व निर्भीड पत्रकारितेच्या कार्याची दखल.

कराड दि. ०१ : पुणे येथे पार पडलेल्या दिमाखदार ‘लायन्स नॅशनल मल्टी अवॉर्ड २०२६’ सोहळ्यात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल मल्टीपल डायमंड अवॉर्ड’ प्राप्त झालेल्या ज्येष्ठ पत्रकार, संपादिका व पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष विद्या मोरे यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कराड येथे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि सकारात्मक, निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपणे ही विद्या मोरे यांची विशेष ओळख आहे.
लायन्स क्लबच्या सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे समाजासमोर आणले. त्यांच्या या बहुमूल्य योगदानाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘मल्टीपल डायमंड अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
“पत्रकारिता हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून सकारात्मक आणि निर्भीड कार्याला प्रसिद्धी देणारे पत्रकार समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. विद्या मोरे यांनी पुढील काळातही समाजहितासाठी असाच प्रभावी आवाज बुलंद ठेवावा,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या सत्कार सोहळ्यास नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती अत्तर आंबेकर, दिलीप गुरव पाटील, अशोकराव पाटील, सागर बर्गे, अतुल शिंदे, समाजसेवक आनंदराव लादे, नगरसेवक नरेंद्र लिबे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष घराळ बापू, अशोककुमार चव्हाण, विवेक कुराडे, किरण पाटील, सुरज जाधव, संदीप काळे, अमर पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्या मोरे यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

4) “देवरुषी, अंगारे-धुपारे आणि लिंबू-टाचण्या फेकून कारखाना चालत नाही; जेलमध्ये का जावे लागले ते सभासदांना सांगा!” – आ.अतुल भोसले.


कराड दि. ०१ : “कृष्णा कारखाना हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपणारा कारखाना आहे. येथे बेईमानीला स्थान नाही. मात्र विरोधकांनी कारभारात केलेल्या भानगडींमुळे त्यांना थेट जेलची हवा खावी लागली. अविनाश मोहिते यांनी सभासदांना सांगावे की, त्यांना जेलमध्ये का जावे लागले आणि ते निर्दोष ठरले आहेत का?” असा घणाघाती सवाल आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केला.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी ‘सहकार पॅनेल’च्या प्रचाराचा शुभारंभ वडगाव हवेली येथे उत्साहात झाला. यावेळी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. भोसले बोलत होते. व्यासपीठावर माजी चेअरमन मदनदादा मोहिते, डॉ. सुरेश भोसले, जगदीश जगताप, धनाजी काटकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
विरोधकांवर टीका करताना आ. भोसले म्हणाले, “आम्हाला कारखाना चालवताना अडचणी आल्या तर आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतो. मात्र विरोधक देवरुषी बोलावतात, अंगारे-धुपारे करतात आणि कारखान्यावर लिंबू-टाचण्या फेकतात. अशा प्रकारे उद्योग चालत नाहीत. ज्यांना साधे ग्रामपंचायतीचे सदस्यपदही मिळाले नाही, त्यांना एवढ्या मोठ्या संस्थेचा कारभार काय कळणार?”
कारखान्याची आर्थिक परिस्थिती गंभीर अवस्थेत असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, “कारखाना आमच्या ताब्यात आल्यानंतर अनेक आर्थिक अनियमितता समोर आल्या. तोडणी-वाहतुकीची देणी आणि व्यापाऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी बँकाही तयार नव्हत्या. आम्ही पुढाकार घेऊन बँकांचा विश्वास संपादन केला आणि कारखाना पुन्हा स्थिर मार्गावर आणला.”
विरोधकांकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पाणीपट्टी कपात आणि वीजबिल माफीच्या आश्वासनांवर टीका करताना ते म्हणाले, “सरकारच्या सहकार्याशिवाय अशा घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. निवडणुकीतील संभाव्य पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने सभासदांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.”
“सहकार पॅनेलने नेहमीच सभासदांच्या हिताचा आणि विकासाभिमुख कारभार केला आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना उच्चांकी ऊसदर, कामगारांना वेळेवर पगारवाढ, कारखान्याचे विस्तारीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. याच कामांच्या बळावर कृष्णा कारखाना राज्यातील आघाडीच्या कारखान्यांमध्ये गणला जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यंदाच्या निवडणुकीतही सभासद सहकार पॅनेललाच ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत आ. भोसले यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

5) राजमाता अहिल्याबाई होळकरांना मलकापूरकरांचे अभिवादन; जयंती उत्साहात साजरी.

मलकापूर दि. ०१ : कर्तृत्व, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अद्वितीय दातृत्व यांचा संगम असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नियोजन सभापती सुरज शेवाळे तसेच सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती धनंजय येडगे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास माजी नगरसेवक किशोर येडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय येडगे, अनिस मणेर, नितीन जगताप यांच्यासह इतर मान्यवर व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अहिल्याबाई होळकर यांचे समाजकल्याण, लोकाभिमुख प्रशासन आणि धर्मादाय कार्य यांचा गौरव करत त्यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजाने जपावा, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button