महाबळेश्वर तालुक्यात स्वराज्य फाउंडेशनची गरुडझेप; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासह मोफत शिक्षणाची ऐतिहासिक घोषणा.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर तालुक्यात स्वराज्य फाउंडेशनची गरुडझेप; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासह मोफत शिक्षणाची ऐतिहासिक घोषणा.

तालुका महाबळेश्वर प्रतिनिधी — उत्तम भालेराव
दि. १३/०५/२०२६ रोजी स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव ता. महाबळेश्वर येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी भव्य शैक्षणिक मदत वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगा, वह्या, शैक्षणिक साहित्य व विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्वराज्य फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीचा मोठा निर्णय घेत काही अत्यंत गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. या घोषणेमुळे उपस्थित पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या भविष्याची चमक पाहायला मिळाली.
गेल्या पाच वर्षांपासून स्वराज्य फाउंडेशन महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये सामाजिक बांधिलकी जपत गरीब, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भक्कमपणे उभे आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या खर्चापासून ते आवश्यक शैक्षणिक साहित्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी उचलत ही संस्था सामाजिक क्षेत्रात गरुडझेप घेत असल्याचे चित्र आज पुन्हा एकदा दिसून आले.
फक्त शिक्षणच नव्हे तर अतिदुर्गम भागातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, औषधोपचार व मानवतेच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वराज्य फाउंडेशनने महाबळेश्वर तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व मान्यवरांचा स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा गौरव करत, “स्वराज्य फाउंडेशन ही केवळ संस्था नसून ग्रामीण भागातील गरीब जनतेसाठी आशेचा किरण बनली आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवाभावाचे तोंडभरून कौतुक केले. “ज्या विद्यार्थ्यांच्या हातात परिस्थितीमुळे पुस्तके नव्हती, त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी उचलण्याचे धाडस स्वराज्य फाउंडेशनने दाखवले आहे. हे कार्य म्हणजे सामाजिक क्रांतीची नांदी आहे,” असे मतही व्यक्त करण्यात आले.
यावेळी स्वराज्य फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी काळात शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय व युवक सक्षमीकरण यांसाठी आणखी नवनवीन उपक्रम कोयना, सोळशी, कांदाटी आणि महाबळेश्वर तालुक्यातील विविध दुर्गम भागांमध्ये राबविण्यात येणार असल्याची घोषणाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या कार्यक्रमास कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“गरीब विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाची मशाल देऊन अन्याय, अज्ञान आणि गरिबीविरोधात लढणारे स्वराज्य फाउंडेशन हे आता ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाचे नवे शक्तिकेंद्र बनत आहे,” अशी जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.
कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला व संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.




