वाई:-“शाश्वत विकासासाठी प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची!” – डॉ. मंगेश कश्यप यांचा ठाम संदेश.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“शाश्वत विकासासाठी प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची!” – डॉ. मंगेश कश्यप यांचा ठाम संदेश.

वाई येथील वसंत व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात “शाश्वत विकास आणि तुम्ही आम्ही” या विषयावर डॉ. मंगेश कश्यप यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन कदम होते.
डॉ. कश्यप यांनी आपल्या व्याख्यानात शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा सखोल वेध घेताना स्पष्ट केले की, “आपण निसर्गाकडून सतत घेतो, पण त्याला काहीच परत देत नाही. ‘भारत माझा देश आहे’ ही भावना केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता ती कृतीतून दिसली पाहिजे.” त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ‘विश्व एक कुटुंब आहे’ या विचाराचा उल्लेख करत जागतिक एकात्मतेचा संदेश दिला.
पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, संविधानाने दिलेल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करून आपण केवळ हक्कांवर भर देतो. “नद्यांमध्ये टाकलेले प्रदूषण शेवटी आपल्या घरातच परत येते,” असे सांगत त्यांनी कृष्णा नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले.
विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी हानी थांबवण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीवरही टीका केली. “आज शिक्षण केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित झाले आहे. माहिती मिळवणे आणि ज्ञान निर्माण करणे यात फरक आहे,” असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे मुलांची विचारशक्ती आणि शारीरिक हालचाल कमी होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
शहरविकासाबाबत बोलताना त्यांनी ‘इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच विकास’ ही चुकीची समजूत असल्याचे स्पष्ट केले. “तळी बुजवून, जंगलतोड करून ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने पाहणे धोकादायक आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
झाडांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी प्रत्येकाने जीवनातील प्रसंगांशी निगडित झाडे लावण्याचे आवाहन केले. “Need आणि Want यातील फरक ओळखून साध्या सवयी—जसे कापडी पिशवी वापरणे, प्लास्टिक टाळणे, पाण्याची बचत—यातून मोठा बदल घडू शकतो,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विशाल कानडे यांनी प्रास्ताविक केले, तर योगिनी गोखले यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. मंगेश कश्यप व डॉ. नितीन कदम यांचा सत्कार संचालक आनंद शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहन खरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रायोजक मंदाकिनी शामराव कुलकर्णी व अंजली अनंत भागवत यांचाही सत्कार करण्यात आला. या व्याख्यानाला वाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
2) वाई:-धोक्याची घंटा! वाईत भाडे व्यवहार बेफाम; पोलीस पडताळणीशिवाय भाडेकरूंचा सुळसुळाट.
वाई शहर आणि तालुक्यात घर तसेच व्यावसायिक गाळे भाड्याने देण्याच्या व्यवहारात गंभीर अनियमितता उघड होत आहेत. कोणतीही शहानिशा न करता भाडेकरू ठेवण्याचे प्रकार वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसी परिसरासह शहरातील विविध भागांत परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या ओळखीची, मूळ गावाची किंवा पार्श्वभूमीची कोणतीही खातरजमा होत नसल्याचे दिसून येते. पोलीस पडताळणी न करता भाडेकरू ठेवले जात असल्याने संशयित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनाही निवारा मिळत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहेत.
शहरातील अनेक कंपन्यांमध्ये बाहेरील कामगार कार्यरत असले तरी त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन न झाल्याने भविष्यात अनुचित घटना घडल्यास जबाबदारी निश्चित करणे कठीण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, व्यापारी क्षेत्रातही परप्रांतीय व्यावसायिकांचे प्रमाण वाढत आहे. अधिक भाड्याच्या हव्यासापोटी काही गाळाधारक स्थानिक व्यापाऱ्यांना डावलून बाहेरील लोकांना गाळे देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली असून व्यवसाय टिकवणे कठीण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अनियंत्रित भाडे व्यवहार आणि पडताळणीचा अभाव कायम राहिल्यास शहरातील सामाजिक व आर्थिक संतुलन बिघडू शकते. त्यामुळे भाडेकरूंची सक्तीची पोलीस पडताळणी, एजंट व घरमालकांवर नियंत्रण आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
एमआयडीसी व वाई शहरात परप्रांतीय व्यावसायिकांची वाढती घुसखोरी स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यांच्या स्पर्धेमुळे अनेक स्थानिक व्यावसायिक कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यावसायिक गाळे भाड्याने देताना स्थानिकांनी सावधगिरी बाळगावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ही परिस्थिती केवळ प्रशासनासाठी नव्हे तर संपूर्ण शहरासाठी धोक्याची घंटा आहे. वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर वाईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




