वाई:-“इशारा स्पष्ट… भिडलात तर भिडू!” — गोरे यांचा वाईत आक्रमक दम, विरोधकांना थेट आव्हान.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“इशारा स्पष्ट… भिडलात तर भिडू!” — गोरे यांचा वाईत आक्रमक दम, विरोधकांना थेट आव्हान.

वाई, दि.२८:
वाईत भाजपच्या नागरी सत्कार सोहळ्यात ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी अक्षरशः आक्रमक रणशिंग फुंकत विरोधकांना उघड इशारा दिला. “कोणाच्या नादाला लागू नका; पण आमच्या नादाला लागलात तर सोडणार नाही. सावज टप्प्यात आलं की कार्यक्रम ठरलेलाच!” या थेट शब्दांत त्यांनी विरोधकांना आव्हान दिलं आणि राजकीय वातावरण तापवलं.
भाजी मंडईतील गणपती आळीत झालेल्या या भव्य सोहळ्यात वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, अशोकराव गायकवाड, शशिकांत पिसाळ, अरुणादेवी पिसाळ, चिन्मय कुलकर्णी,नितीन बापू भरगुडे- पाटील डॉ. नितीन सावंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
गोरे यांनी भाषणात ‘विराज प्रकरणा’चा उल्लेख करत विरोधकांना उघड आव्हान दिलं. “विराजच्या केसाला धक्का लावून दाखवा!” असा दम देत त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचा शब्द दिला.
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा राजकारणात ‘सोयीस्कर वापर’ करणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका करत “अडचण आली कीच चव्हाण आठवतात; बाकी वेळी विचार कुठे जातात?” असा सवाल केला.
स्वतःवरच्या २२ गुन्ह्यांचा उल्लेख करत “कटकारस्थानांना आम्ही घाबरत नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
माजी आमदार मदनदादा भोसले यांनी महाबळेश्वर तालुक्यातील १० हजार कोटींच्या हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचं सांगितलं.
धोम धरणावर ‘वॉटर प्लेन’ प्रकल्प उभारण्याची घोषणा करत पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाईच्या विकासाचा रोडमॅप मांडत पाणी, गटार आणि नदी संवर्धन प्रकल्पांवर भर देणार असल्याचं सांगितलं. वाईला ‘दक्षिण काशी’ म्हणून जागतिक ओळख मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या भव्य सोहळ्यासाठी वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातून नागरिक, महिला आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.
या शक्तिप्रदर्शनामुळे वाई परिसरातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं असून, भाजपने विरोधकांना स्पष्ट आणि करारा संदेश दिल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.




