आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-भुईंज पोलीस ठाण्यात २९ दुचाकी बेवारस; ५ एप्रिलनंतर थेट स्क्रॅप प्रक्रिया!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-भुईंज पोलीस ठाण्यात २९ दुचाकी बेवारस; ५ एप्रिलनंतर थेट स्क्रॅप प्रक्रिया!

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

भुईंज, दि. २८ :
भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध अपघात व कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या तब्बल २९ दुचाकींचे मालक अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या वाहनांवर दावा करण्यासाठी ५ एप्रिल २०२६ पर्यंतची अंतिम मुदत जाहीर केली आहे.
भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून या दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याला यश आलेले नाही.
त्यामुळे आता शासनाच्या नियमानुसार या वाहनांच्या लिलाव किंवा स्क्रॅप प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी आपल्या वाहनावर मालकी हक्क सांगण्यासाठी तात्काळ पुढे येणे आवश्यक आहे.
ज्या नागरिकांची वाहने या यादीत असतील त्यांनी वाहनाची मूळ कागदपत्रे आणि वैध ओळखपत्रासह भुईंज पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ५ एप्रिल २०२६ नंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही. त्यानंतर संबंधित वाहनांचा मालकी हक्क संपुष्टात येऊन त्यांची स्क्रॅप करून लिलाव प्रक्रिया राबवली जाईल.
या यादीत हिरो होंडा स्प्लेंडर, बजाज पल्सर, टीव्हीएस व्हिक्टर, यामाहा, कायनेटिक तसेच इलेक्ट्रिक स्कूटर अशा विविध वाहनांचा समावेश आहे. काही वाहन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत: MH 11 Z 2691, MH 11 BF 6462, MH 12 NA 7206, MH 14 AK 3322, MH 12 EK 8363 इत्यादी.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी भुईंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

2) वाई:-लोकशक्तीचा विजय! लोकवर्गणीतून अभीपुरीतील ‘चावडी’चा कायापालट
जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण; राजकीय दुर्लक्षाला गावकऱ्यांचे चोख प्रत्युत्तर.

वाई, दि. २८ : अभेपुरी (ता. वाई) येथील ग्रामपंचायत चावडीचे नूतनीकरण व जीर्णोद्धार लोकवर्गणीतून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले असून, या नूतनीकरण केलेल्या चावडीचे लोकार्पण सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रियाताई महेशराव शिंदे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) उत्साहात पार पडले.
अनेक वर्षे शासन दरबारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. अखेर गावकऱ्यांनी स्वबळावर पुढाकार घेत लोकवर्गणीतून या चावडीचा कायापालट घडवून आणला.
अभेपुरी गाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात असले तरी, सार्वजनिक कामांसाठी विशेषतः चावडीच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रस्ताव देऊनही निधी मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर पश्चिम भागातील युवा नेते अशोक (आबा) मांढरे यांनी पुढाकार घेत ‘लोकवर्गणीतून काम’ करण्याचा निर्धार केला. त्यांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकजुटीचे उदाहरण घालून दिले.
या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, दीप्ती पिसाळ, जितेंद्र पिसाळ, अशोक (आबा) मांढरे, यशवंतनगर गट प्रमुख रोहित वाडकर, अभेपुरीच्या सरपंच सारिका मांढरे, आप्पा मांढरे, झुंझार मांढरे, एकनाथ गुरुजी, उपसरपंच विजय मांढरे, हंबीर मांढरे यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जे काम शासनाला जमले नाही, ते अभेपुरीच्या एकजुटीने करून दाखवले आहे. ही चावडी केवळ इमारत नसून गावकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे,”
असे भावनिक उद्गार उपस्थितांनी काढले.
लोकवर्गणीतून उभी राहिलेली ही भव्य चावडी सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, लोकशाहीत लोकशक्ती किती प्रभावी ठरू शकते, याचा आदर्श अभेपुरी गावाने घालून दिला आहे. या कामासाठी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

3) भुईंजचा अभिमान! सुजय शेवते यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कलाध्यापक’ पुरस्कार जाहीर.

भुईंज, दि. २८ : कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भुईंज येथील सुपुत्र सुजय यशवंत शेवते यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) यांच्या मान्यतेने ‘महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ’च्या वतीने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.
सुजय शेवते हे सातारा जिल्ह्यातील कन्या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना दिलेली चालना, कला शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामाजिक योगदान यांची दखल घेत त्यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.
हा मानाचा पुरस्कार दि. २८ व २९ मार्च २०२६ रोजी सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह (जिल्हा परिषद) येथे आयोजित ४४ व्या कला शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
या यशामुळे भुईंज गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून सुजय शेवते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील एका कलाशिक्षकाने राज्यस्तरावर मिळवलेले हे यश वाई तालुक्याच्या नावलौकिकात मानाचा तुरा ठरले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button