सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनासाठी शिवसेना महिला मूकमोर्चा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनासाठी शिवसेना महिला मूकमोर्चा.

(अजित जगताप)
सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष च्या निवडणुकीत झालेला गोंधळ आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची जखम व भाजपची दादागिरी या विरोधात शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी आज मोर्चा काढला. या मोर्चाला सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची जोरदार मागणी करण्यात आली. या मोर्चाला भाजप विरोधात शिवसेनेचा इतर महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रिया लोकशाही मार्गाने जाहीर करण्यात आली. परंतु या निवडणुकीशी संबंधित सातारा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यासमोरच अपहरण नाट्य व राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्यांना अटक सत्र आणि दबाव नाट्य झाले. घटनात्मक अधिकार असलेल्या महायुतीचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांना पोलिसांमार्फत भाजप पक्षातील एका गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. एका गटाच्या कार्यकर्त्यांपेक्षाही सातारा पोलीस एका आदेशाने आक्रमक झाले होते. भाजपसाठी जिवाचे रान करणाऱ्या पोलिसांच्या मुळेच खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याची बदनामी झालेली आहे. अशा सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबत करावे. साताऱ्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या लोकशाही मार्गाने शिक्षा व्हावी. अशा पद्धतीने महिला वर्गाने मागणी केली होती.
सातारा जिल्हा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सातारा नगरपालिकेसमोर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते शिवतीर्थ पोवई नाका या ठिकाणी युगपुरुषांच्या विचारला अभिवादन केले. त्यानंतर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातून मूक मोर्चा काढला.
शिवसेना व राष्ट्रवादी यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर करून बहुमतासाठी आवश्यक ते ३७ संख्या बळ जुळवले होते. असे असताना भाजप विरोधकांनी बळाचा वापर करून प्रचंड दांडगाई केली. त्यादिवशी सातारा पोलिसांची भूमिका ही भाजप सत्ताधाऱ्यांना धार्जिणी किंबहुना घरगड्यासारखी वागल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. राष्ट्रवादीचे खा. नितीन पाटील व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना भाजप प्रेमी पोलिसांनी धक्काबुक्की झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे जिल्ह्याच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला गेला आहे. जि. प. मधील गोंधळ नाट्याची न्यायालयीन चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. सीसीटीव्ही फुटेज सर्वांसाठी खुले करून नक्की त्या दिवशी काय घडले? हे जनतेसमोर आणावे. सातारा जिल्हा परिषद नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड रद्द करून नव्याने फेर निवड घेण्यात यावी. संबंधित प्रकरणातील शासकीय स्तरावरील दोषी अधिकाऱ्यांच्या तत्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागेवर कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सदर महामोर्चाला सातारा जिल्हातील जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य कविता ताई ओबळे , शिवसेना महिला उपाध्यक्ष सुलोचना चंद्रकांत पवार,वर्षाताई अरडे,विमलताई सुपणेकर,संध्याताई दाभाडे,प्रियांकाताई वाघमारे,प्रियांकाताई नलावडे
मेघाताई चोरगे,मोनिकाताई पवार विद्याताई घाडगे,नंदिनी ताई गायकवाड,सुनीता फाळके ,सुजाता गायकवाड,अर्चनाताई जाधव,विद्याताई वायदंडे
मंजिरी सावंत ,मिनाक्षी मोरे ,कांचन गौरी शिंदे,सविता राठोड, रोजीया शेख,सुजाता राठोड,शांताबाई ओंबळे,नीता ओंबळे,कविता हौसाबाई सुतार,उषा उंबरकर,पार्वती ओंबळे,आनंदी जुनघरे,वैष्णवी धनवडे,वनिता ओंबळे आणि इतर जिल्हातील शिवसैनिक, महिला पदाधिकारी तसेच होते.या मोर्चाला जावळी पाटण कोरेगाव महाबळेश्वर सातारा कराडडाळा खटाव तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
2) सातारा जि. परिषदेत कमवायला शिका योजनेसाठी स्वीय सहाय्यकसाठी अनेक जण तत्पर….

(अजित जगताप)
सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे वाद महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम प्रसार माध्यमांनी केले आहे.आता तर अध्यक्ष- उपाध्यक्ष जबरदस्तीच्या निवडीनंतर स्वीय सहाय्यक पदासाठी कमवायला शिका व शिकवा अशा योजनेसाठी अनेक जण तत्पर असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये रंगू लागलेले आहे. काही नेत्यांच्या शिफारशी मध्ये दोघा तिघांची नावे असली तरी प्रत्यक्षात मात्र, माणसं जपणारी व बिल भागवणारे पी.ए. अशी ज्यांची ओळख होणार आहे. त्यांना प्राधान्य दिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या कारभाराचे बाबत राज्यमंत्र्याचा दर्जा अध्यक्षांना असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील मिनी मंत्रालयात होणाऱ्या अनेक घडामोडी बाबत टक्का ना टक्का माहिती पुरवण्यासाठी तेवढ्या सक्षम स्वीय सहाय्यकाची गरज आहे. गरज भागवणाऱ्या सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला ती संधी प्राप्त होणार आहे. त्यातून मग मोठा मासा छोट्या माशाला खातो. अशा पद्धतीने जाळे टाकण्यास सुरुवात झाली आहे. खटाव व सातारा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत सर्वाधिक कार्यालय आहेत. गेले तीन वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कारभार होत असताना भ्रष्टाचार बोकाळला होता. यालाच सर्वप्रथम चाप लावला जाणार आहे. असं कोणी समजू नये. आता वाटेकरी निर्माण झाले असल्यामुळे प्रामाणिक वगळता काही स्वीय सहायकांना पोलीस ठाण्यामध्ये जशा पद्धतीने ऑर्डरली असतो. तशा पद्धतीने काम करावे लागणार आहे. सध्या मार्च एंडिंगची गडबड असल्यामुळे पहिल्याच घासाला तूप हाती आलेले आहे. असा अनेकांचा समज झालेला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापतींच्या कार्य काळामध्ये अनेक नामांकित व प्रामाणिक असे स्वीय सहाय्यक होऊन गेलेले आहेत. नेत्यांची मर्जी समजण्यापेक्षा जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व्हावा. वरिष्ठ नेत्यांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये. असे कामकाज केलेले आहे. काहींच्या बाबतीत चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला हे सुद्धा अनुभवले आहे. आता तर एक कलमी भाजप कार्यक्रम होत असून या निवडीबद्दल शंका उपस्थित केली गेली आहे. विधान परिषदेचे सभापती आदरणीय नीलमताई गोऱ्हे यांनी सरकारलाच निर्देश देऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या लोकशाहीच्या मंदिरातच आता एका गाभाऱ्यात सातारा जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व्हावा अशी अपेक्षा आहे. आता ज्यांच्या निवडीचे शक्यता आहे. त्यांना सुद्धा वसुलीचे काम इमाने इतबारे करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये पूर्वी मोजकेच प्रतिनिधी येत होते. आता संपूर्ण जिल्ह्यातून सी.सी.टी.व्ही. कॅमेरा वॉच राहणार आहे. त्यामुळे बेकायदेशीर कामकाज करताना कोणी साक्षीदार अथवा पुरावा ठेवू नका. कारण, सध्या समाज माध्यमावर सत्यता पडताळणी होत आहे. त्यामुळे कोणी कोंबडा झाकला म्हणून पहाट होणार नाही. या भ्रमात कोणीही राहू नये. असे सल्ला दिला जात आहे. दरम्यान, स्वीय सहाय्यक नेमताना शासनाने दिलेल्या निकषाच्या अधीन राहून नेमणूक व्हावी. एवढीच या निमित्त मापक अपेक्षा आहे.



