वाई:-छत्रपती संभाजी महाराज यांना वाईत रक्तांजली; १००+ रक्तबॅगांचे संकलन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483

छत्रपती संभाजी महाराज यांना वाईत रक्तांजली; १००+ रक्तबॅगांचे संकलन.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई दि. ०२ : ‘केवळ व्याख्याने नव्हे, तर प्रत्यक्ष कृती’ या ब्रीदाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (वाई तालुका, लाखानगर, डांगे कॉलनी विभाग) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त सामाजिक बांधीलकी जपण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ धारकऱ्यांच्या हस्ते धर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. छत्रपतींच्या जाज्वल्य विचारांचा वारसा पुढे नेत समाजाप्रती आपले देणे फेडण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश देत शेकडो युवकांनी दिवसभर रक्तदान केले. एकूण १०० हून अधिक रक्तबॅगांचे संकलन करण्यात आले असून, हे रक्त नामांकित रक्तपेढ्यांना सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे.
या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रक्तदात्यास डॉ. सदाशिव शिवदे लिखित ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ हे शंभूचरित्र भेट देण्यात आले. वाचन संस्कृती वाढावी आणि इतिहासातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमाच्या यशासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वाई तालुका, लाखानगर, डांगे कॉलनी विभागातील धारकरी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
2) वाई:-महसूल प्रशासनाचा मोठा पुढाकार! ६ मार्चपर्यंत अर्ज करा; ७ ला ‘समाधान शिबिरात’ थेट निकाल.
वाई दि. ०३ : प्रशासकीय कामांना वेग देत नागरिकांना एकाच छताखाली दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत येत्या शनिवार, ७ मार्च रोजी परखंदी येथे भव्य ‘महाराजस्व अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढले जाणार आहेत.
वाई तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ओझर्डे मंडळातील शेंदुरजणे, परखंदी, मुंगसेवाडी, सटालेवाडी तसेच परिसरातील इतर पाच गावांतील नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ‘समाधान शिबिर’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत प्रशासनाने दैनंदिन महसूल कामात गतिमानता आणत तक्रार निवारण, शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विविध विभागांशी संबंधित प्रश्न जागेवरच सोडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ज्या नागरिकांची कामे प्रलंबित आहेत, त्यांनी शुक्रवार दि. ६ मार्च पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, शेंदुरजणे किंवा परखंदी येथे जमा करावेत. विविध दाखल्यांसाठी संबंधित भागातील महा-ई-सेवा केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे शिबिर वाईचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओझर्डे मंडळ अधिकारी आणि संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.
“शासकीय कामांसाठी कार्यालयांच्या चकरा मारण्याची गरज नाही. प्रशासनाच्या या पुढाकाराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,” असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
🔹 शिबिरात उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा
प्रलंबित फेरफार निर्गती
सातबारा उताऱ्यावरील चुकांची दुरुस्ती
डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा उतारे
८-अ उताऱ्यांचे वाटप
उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र
नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र
अकृषिक तरतुदींवरील मार्गदर्शन व सुधारणा
सनद प्रक्रियेची माहिती
सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी
विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले
तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा
प्राणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश
घरांसाठी पट्टे वाटप व ई-मोजणी अर्ज
ॲग्रीस्टॅक व पी.एम. किसान नोंदणी
क.जा.प. भूसंपादन / अकृषिक नोंदी दप्तर अद्ययावत करणे
नागरिकांनी ही संधी न दवडता वेळेत अर्ज सादर करून ७ मार्चच्या शिबिरात आपल्या कामांचा थेट निकाल मिळवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
3) वाईत होळीचा ज्वालामुखी उत्साह! ‘पुरणाची पोळी’च्या घोषणांनी दुमदुमल्या गल्ल्या.

वाई दि. ०३ : वाई शहर आणि तालुक्यात होळीचा सण पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’च्या घोषणांनी गल्लोगल्ली वातावरण भारावून गेले होते. यंदा तरुणांसह अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील विविध पेठा आणि चौकांमध्ये होळीची आकर्षक उभारणी करण्यात आली होती. सायंकाळी विधिवत पूजा करून होळी प्रज्वलित करण्यात आली. नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवत सुख-समृद्धीची प्रार्थना करण्यात आली. प्रज्वलित होळीच्या तेजस्वी ज्वाळांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती लहान मुले. होळीभोवती फेर धरून ‘बोंबा’ मारण्याची पारंपरिक प्रथा चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात जपली. त्यांच्या आनंदी घोषणांनी आणि जल्लोषाने सणाला वेगळीच रंगत प्राप्त झाली.
ग्रामीण भागातही ग्रामदेवतांसमोर मुख्य होळी पेटवून पारंपरिक गाणी, वाद्यांच्या गजरात आणि सामूहिक सहभागातून सण साजरा करण्यात आला. होळीच्या उत्साहानंतर आता वाईकर धुळवडीच्या रंगोत्सवासाठी सज्ज झाले आहेत.




