वाई:-शांततेत मतदान, राजकारणात खळबळ! वाई तालुक्यात ६५.७७% ; १०१ वर्षांच्या आजींपासून दिग्गज नेत्यांपर्यंत लोकशाहीचा जल्लोष.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शांततेत मतदान, राजकारणात खळबळ! वाई तालुक्यात ६५.७७% ; १०१ वर्षांच्या आजींपासून दिग्गज नेत्यांपर्यंत लोकशाहीचा जल्लोष.

वाई दि. ०८ : वाई तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत शनिवार दि. ०७ रोजी मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुक्यातील १८१ मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत तब्बल ६५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली.
सकाळपासूनच ग्रामीण भागात मतदानासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नवमतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन व पोलिसांनी चोख नियोजन केल्याने संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्न आणि सुरळीत पार पडली.
ओझर्डे येथील १०१ वर्षीय सखुबाई नथु पिसाळ यांनी मतदान करून नवमतदारांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. महिला आणि तरुणाईचा उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला.
राजकीय वर्तुळातील दिग्गजांनीही मतदानात सक्रिय सहभाग घेतला. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी बोपेगाव येथे पत्नी सौ. अर्चना पाटील व कन्या मिहीका यांच्यासह मतदान केले. खा. नितीन पाटील यांनीही बोपेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपसह विविध पक्षांच्या उमेदवारांनीही आपापल्या केंद्रांवर मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेतला.
निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषद गटांमध्ये बावधन ७०.४४%, भुईंज ७०.१०%, यशवंतनगर ६१.२५% व ओझर्डे ६१.२७% मतदान झाले. पंचायत समिती गणांमध्ये बावधन ७०.५६%, भुईंज ७०.७०%, शेंदूरजणे ७०.३४%, पाचवड ६९.६०%, यशवंतनगर ५९.६०%, केंजळ ६३.९०%, ओझर्डे ५८.६९% व अभेपुरी ६३.२४% मतदानाची नोंद झाली.
मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशिन कडेकोट बंदोबस्तात सोनगीरवाडी येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे. वाढलेल्या मतदानामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत असून, आता “विजयाचा गुलाल” कोण उधळणार? याकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे.




