आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-कचरा टाकाल तर आता खैर नाही! वाईत पालिकेचा ‘ॲक्शन मोड’; सीसीटीव्हीत कैद झालात तर थेट दंड.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-कचरा टाकाल तर आता खैर नाही! वाईत पालिकेचा ‘ॲक्शन मोड’; सीसीटीव्हीत कैद झालात तर थेट दंड.

‘पालिकेवर बोट दाखवण्याआधी स्वतःची जबाबदारी ओळखा!’ आरोग्य सभापती केतकी पाटणे-मोरे यांचा नागरिकांना थेट इशारा.

सातारा | वाई, दि. ०८ :
वाई शहरातील अस्वच्छता, कचरा आणि साचलेल्या पाण्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असतानाच आता नगरपरिषदेने थेट कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे, नाल्यांमध्ये प्लास्टिक व घनकचरा फेकणारे आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना यापुढे केवळ सूचना देऊन सोडले जाणार नाही. सीसीटीव्हीच्या नजरेत आले तर दंडात्मक कारवाई अटळ, असा स्पष्ट इशारा नगरसेविका तथा आरोग्य सभापती केतकी पाटणे-मोरे यांनी दिला.
शहरातील कचरा आणि अस्वच्छतेबाबत पालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ‘सगळी जबाबदारी पालिकेचीच’ या मानसिकतेवर आरोग्य सभापतींनी जोरदार प्रहार केला. नगरपरिषद स्वच्छतेसाठी उपाययोजना करत आहे; मात्र नागरिकांनीच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला, नाल्यांमध्ये प्लास्टिक कोंबले तर प्रशासनाने कितीही स्वच्छता केली तरी परिस्थिती बदलणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“फक्त पालिकेवर बोट दाखवून प्रश्न सुटणार नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वारंवार सूचना देऊनही नियम मोडणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट शब्दांत इशारा केतकी पाटणे-मोरे यांनी दिला.
‘कचरा टाकणाऱ्यांवर कॅमेऱ्याची नजर!’
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे “कचरा टाका आणि निघून जा” हा प्रकार आता चालणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने आवश्यक भागात औषध फवारणी, डी.डी.टी. पावडर, धूर फवारणी आणि नाल्यांची नियमित स्वच्छता करण्यात येणार आहे. नागरिकांनी घराभोवती पाणी साचू न देणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचेही आवाहन करण्यात आले.
स्वच्छता हवी असेल तर नियमही पाळावे लागतील!
वाई शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त नगरपरिषद प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. जनजागृतीसोबतच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून स्वच्छतेला शिस्त लावण्याचा निर्धार पालिकेने व्यक्त केला आहे.
जनजागृतीला प्रतिसाद द्या; अन्यथा दंडाला सामोरे जा! असा थेट संदेशच या कारवाईतून देण्यात आला आहे.

2) वाई–जांभळी मार्गावर पुन्हा अपघाताचा कहर; गंभीर जखमी दुचाकीस्वारावर उपचार, बेफाम वाहतुकीला लगाम कधी?

सातारा | वाई, दि. ०८ :
वाई–जांभळी मार्गावरील वडवली (ता. वाई) येथे शुक्रवारी क्रुझर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेनंतर क्रुझर अनियंत्रित होऊन थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वाईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वासोळेहून वाईच्या दिशेने येणारी क्रुझर राजेंद्र हनुमंत चौधरी (वय ५०, रा. मेलवली, ता. वाई) चालवत होते. याचवेळी वाईहून वासोळ्याकडे जाणारे दुचाकीस्वार नवनाथ आनंदा सुतार (वय ३६, रा. वासोळे, ता. वाई) समोरून येत होते. वडवली हद्दीत दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडकेचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची भीषणता पाहून काही काळ घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत नवनाथ सुतार हे गंभीर जखमी झाले असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातांची मालिका, तरीही उपाययोजना कधी?
वाई–जांभळी मार्गावर वाढलेली बेफाम वाहतूक आणि वडाप वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वाहनांचा वेग, वाहतूक शिस्त आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“आज अपघात, उद्या कोणाचा नंबर?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, संबंधित यंत्रणेने या मार्गावरील वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस हवालदार बिराजदार या अपघाताचा अधिक तपास करीत असून, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
🚨 वाई–जांभळी मार्ग धोकादायक वळणावर!
अपघात रोखण्यासाठी प्रशासन आता तरी जागे होणार का?

3)  वाई:-बावधन गटातील शाळांचा दर्जा जिल्ह्यात अव्वल करणार!

शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी ऋतुजा शिंदे यांचा निर्धार; शिष्यवृत्तीपासून स्पर्धा परीक्षांपर्यंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा संकल्प.

सातारा | वाई, दि. ०८ :
बावधन जिल्हा परिषद गटातील शाळांचा शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा जिल्ह्यात अव्वल नेण्यासाठी आता ठोस कृती आराखडा राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्पर्धा परीक्षांची तयारी, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास यावर विशेष भर देण्याचा निर्धार बावधन जिल्हा परिषद गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या पहिल्याच बैठकीत करण्यात आला.
परखंदी (ता. वाई) येथील हायस्कूलमध्ये शुक्रवार, दि. ०७ रोजी समितीच्या सदस्यांची नियुक्ती व पहिली बैठक उत्साहात पार पडली. “बावधन गटातील शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा दर्जा जिल्ह्यात अव्वल करणार,” असा ठाम विश्वास समितीच्या अध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद सातारा ऋतुजा विराज शिंदे यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत, प्रतिमा पूजन, ईशस्तवन व प्रास्ताविक झाले. शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ बाळेकर यांनी समितीची उद्दिष्टे व आगामी कार्यपद्धती स्पष्ट केली. त्यानंतर शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे तसेच शिक्षक-पालक सहभाग वाढविणे यावर सविस्तर चर्चा झाली.
गुणवत्तेला केवळ घोषणांचा आधार न देता प्रत्यक्ष कृतीतून बदल घडविण्याचा सूर या बैठकीत उमटला. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा आदर्श इतर विद्यार्थ्यांसमोर ठेवत “प्रत्येक शाळेतून गुणवंत घडला पाहिजे” या दिशेने प्रयत्न करण्याचा संदेश देण्यात आला.
शाळांच्या गुणवत्तेबरोबरच नवीन वर्गखोल्यांची उभारणी, शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव, आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे याबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीस समितीच्या अध्यक्षा ऋतुजा विराज शिंदे, प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, समिती सदस्य सचिन भोसले पाटील, गट शिक्षण अधिकारी हर्षवर्धन मोरे, समिती सदस्य शंकर गाढवे, परशुराम मांढरे, अभिजीत शिंदे, प्रतीक पिसाळ, दत्तात्रेय ढेकाणे, शरद यादव, संभाजी जाधव, सुशीला यादव, कविता नेवसे, निर्मला भांगरे, वीरधवल भिलारे, नवनाथ मालुसरे, समितीचे सचिव साईनाथ वाळेकर, प्रसाद यादव यांच्यासह बावधन गटातील शिक्षक, शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, गुणवत्तेचा नवा अध्याय” या संकल्पनेतून झालेल्या या बैठकीत बावधन गटातील प्रत्येक शाळेला गुणवत्तेच्या स्पर्धेत पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि जबाबदारीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे बावधन गटातील शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आगामी काळात ठोस बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button