वाई:-‘एक्सपायर’ गोळी रुग्णाच्या हातात; हॉस्पिटल म्हणते ‘नजरचूक’… FDAच्या रडारवर कोण?
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-‘एक्सपायर’ गोळी रुग्णाच्या हातात; हॉस्पिटल म्हणते ‘नजरचूक’… FDAच्या रडारवर कोण?

सातारा | वाई, दि. ०९ :
वाई शहरातील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णाला मुदतबाह्य औषध देण्यात आल्याचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित औषधाची मुदत संपलेली असल्याचा दावा करत रुग्णाच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच वाई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित गोळ्या नजरचुकीने रुग्णाला देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले आहे.
बावधन (ता. वाई) येथील कार्तिक हणमंत बागल यांच्या पत्नी सेजल कार्तिक बागल यांना १ ऑगस्ट २०२६ रोजी उपचारासाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘Adivit Total’ नावाच्या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्यांची मुदत मे २०२६मध्येच संपलेली होती, असा दावा कार्तिक बागल यांनी केला आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर बागल यांनी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार केली. संबंधित औषध कोणत्या साठ्यातून आले, त्याची खरेदी व पुरवठा कधी झाला, औषधाची मुदत तपासण्यात आली होती का, तसेच रुग्णालयातील औषध वितरणाची प्रक्रिया काय आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रुग्णालयाची ‘नजरचूक’ मान्य!
या आरोपावर सिद्धार्थ हॉस्पिटलच्या डॉ. मंगला अहिवळे यांनी स्पष्टीकरण देताना संबंधित गोळ्या नजरचुकीने रुग्णाला देण्यात आल्याचे मान्य केले. प्रकार लक्षात आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांची दिलगिरी व्यक्त करून माफी मागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच रुग्णाला पुढील उपचार, तपासणी शुल्क आणि या घटनेमुळे काही त्रास झाल्यास आवश्यक उपचार मोफत करण्याची तयारी रुग्णालयाने दर्शविल्याचेही डॉ. अहिवळे यांनी स्पष्ट केले.
मात्र, संबंधित गोळ्यांना बुरशी लागल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. गोळ्या सीलबंद पॅकिंगमध्ये असल्याने पाणी किंवा हवेमुळे त्या खराब झाल्याचा दावा योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
नातेवाईकांकडून आरोप; हॉस्पिटलकडून वेगळा दावा
डॉ. अहिवळे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह सुमारे १५ ते २० जण हॉस्पिटलमध्ये आले होते. शहानिशा करून माफी मागण्यात आल्यानंतरही नातेवाईकांनी रुग्णालयाचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच या प्रकरणी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही डॉ. अहिवळे यांनी केला आहे. या घटनेची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
आता FDAच्या तपासणीकडे लक्ष
या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे संबंधित औषधाचा बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, मुदत समाप्तीची तारीख, खरेदी-वितरण नोंदी, औषधसाठा, साठवणूक व्यवस्था आणि उपलब्ध नमुने यांची अधिकृत तपासणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुदत संपलेले औषध रुग्णापर्यंत पोहोचले कसे? औषध देण्यापूर्वी त्याची एक्सपायरी तपासली जात होती का? औषधसाठ्याची नियमित तपासणी कोणाची जबाबदारी होती?
रुग्णालयाने ‘नजरचूक’ झाल्याचे मान्य केल्याने औषध वितरण व्यवस्थेतील तपासणी आणि नियंत्रण यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता FDA व पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होऊन जबाबदारी निश्चित होते का, याकडे वाईकरांचे लक्ष लागले आहे.
2) सातारा:-भैरवगडचा संयम संपला! सात वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत; ग्रामस्थांचे थेट आमरण उपोषण.

सातारा | दि. ०९ :
२०१९ मध्ये झालेल्या भूस्खलनाने आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या सातारा तालुक्यातील भैरवगड (टोळेवाडी) येथील ग्रामस्थांचा अखेर संयमाचा बांध फुटला आहे. शासनाने कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय घेतला; मात्र सात वर्षे उलटूनही पुनर्वसन प्रत्यक्षात आलेले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे असुरक्षित परिस्थितीत जगणाऱ्या ग्रामस्थांनी आता शासनाविरोधात आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे.

भूस्खलनानंतर ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी वारंवार निवेदने देण्यात आली. अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. बैठका झाल्या, आश्वासने मिळाली; मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांच्या पुढे प्रश्न सरकला नाही. परिणामी ‘पुनर्वसन कागदावर, ग्रामस्थ मात्र संकटात’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेली सात वर्षे जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या ग्रामस्थांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे आता थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ‘आपण सातारा जिल्ह्याचे मंत्री आहात. आमच्या प्रश्नाकडे आता तरी गांभीर्याने पाहा. विचारपूस करण्यापेक्षा आमच्या पुनर्वसनाचा ठोस निर्णय कधी होणार?’ असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रदीर्घ प्रतीक्षेत अनेक ज्येष्ठ ग्रामस्थांचे निधन झाले. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी असून, आश्वासन नको; आता प्रत्यक्ष आदेश आणि पुनर्वसन हवे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
शासनाकडून पुनर्वसनाबाबत ठोस आणि लेखी आदेश मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
सात वर्षे झाली; आता आश्वासनांचा नाही, निर्णयाचा हिशेब द्या!
भैरवगडच्या ग्रामस्थांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, शासन त्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करणार की पुन्हा एकदा आश्वासनांचीच पुनरावृत्ती होणार? याकडे ग्रामस्थांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
3) कराड:-स्वातंत्र्यदिनाआधी मलकापूरची ‘स्वच्छता मोहीम’ फुल्ल अॅक्शनमध्ये!; आगाशिवनगरात श्रमदानातून रस्त्याचा कायापालट.

मलकापूर | दि. ०९ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहराला स्वच्छ आणि सुंदर रूप देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला वेग दिला आहे. शासनाच्या ९० दिवसांच्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत आगाशिवनगर परिसरात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून विशेष स्वच्छता मोहीम राबवली.
आगाशिवनगर येथील ढेबेवाडी फाटा ते इमर्सन कंपनी या प्रमुख मार्गावर राबविण्यात आलेल्या मोहिमेत रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमधील वाढलेले गवत, रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्यांवरील झुडपे तसेच पावसामुळे साचलेली माती हटविण्यात आली. त्यामुळे या प्रमुख मार्गाने स्वच्छ आणि नीटनेटके रूप धारण केले असून, वाहनचालकांसह नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यात डिव्हायडर आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यातच पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेली माती रस्त्याच्या कडेला साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या स्वच्छता पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करत परिसरातील अस्वच्छता दूर केली.
‘स्वच्छ मलकापूर, सुंदर मलकापूर’ या संकल्पनेतून शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि विविध प्रभाग स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमांना गती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी शहराचा परिसर स्वच्छ, सुशोभित आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्यावर नगरपरिषद प्रशासनाचा भर आहे.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. केवळ स्वातंत्र्यदिनापुरती स्वच्छता न राहता शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारावी, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.





