साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचा निर्णायक इशारा; बहुजनांची सत्ता उभारणी सुरू.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचा निर्णायक इशारा;
बहुजनांची सत्ता उभारणी सुरू.

आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा सातारा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखतींचा निर्णायक टप्पा पार पडला. या मुलाखती पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. क्रांतीताई सावंत यांच्या ठाम मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.
यावेळी सातारा पूर्व जिल्हाध्यक्ष रामदास भाई कांबळे, सातारा पश्चिम जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत आप्पा खंडात जिल्हा युवक अध्यक्ष अमोल गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण-गटातील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
मार्गदर्शन करताना डॉ. क्रांतीताई सावंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी बसवण्यासाठी लढते आहे. यावेळी कोणतीही तडजोड न करता ताकदीने आणि निर्भयपणे मैदानात उतरायचे आहे.” त्यांच्या या शब्दांनी सभागृहात उत्साह संचारला.
पूर्व जिल्हाध्यक्ष रामदास भाई कांबळे आणि पश्चिम जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने यांनी प्रत्येक तालुक्यातील संघटनात्मक ताकद, उमेदवारांची सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि लढण्याची क्षमता यांचा सखोल आढावा घेतला. यावेळी उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ तीव्र झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
विशेष बाब म्हणजे, बहुजन समाजातील युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या आत्मविश्वासाने वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटासाठी पुढे येत आहेत. पारंपरिक पक्षांमधील घराणेशाही, पैसा आणि सत्तेच्या राजकारणाला कंटाळलेला बहुजन समाज आता स्वतःचा प्रतिनिधी स्वतः ठरवण्याच्या भूमिकेत आल्याचे या मुलाखतींमधून दिसून आले.
ही प्रक्रिया म्हणजे केवळ उमेदवार निवड नाही, तर सातारा जिल्ह्यात बहुजन सत्तेचा पाया रचण्याची सुरुवात आहे, असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची ही आक्रमक तयारी पाहता, येणाऱ्या निवडणुकांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, हे निश्चित मानले जात आहे.




