लोणी:-दिघेवस्ती–धानोरेच्या विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजीनगर सहल; इतिहास, निसर्गाचा अनुभव.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दिघेवस्ती–धानोरेच्या विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजीनगर सहल; इतिहास, निसर्गाचा अनुभव.

लोणी/ प्रतिनिधी :-
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव आवश्यक असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिघेवस्ती–धानोरे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. इतिहास, स्थापत्यकला, निसर्ग आणि जैवविविधतेचा परिचय करून देणारी ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरली.
सहलीच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी प्रवरा नदीकाठी वसलेले निसर्गरम्य देवगड पाहिले. शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी परिसराची माहिती जाणून घेतली. त्यानंतर यादव काळात बांधलेला व काही काळ देशाची राजधानी राहिलेला दौलताबाद किल्ला पाहताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. किल्ल्याची भक्कम तटबंदी, प्रवेशद्वारे व संरक्षणात्मक रचना पाहून विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख प्रत्यक्ष मिळाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ (एलोरा) लेणी येथे भेट दिली. एकाच खडकातून कोरलेले जगप्रसिद्ध कैलास मंदिर पाहून विद्यार्थी भारावून गेले. मंदिरावरील शिल्पकला, कोरीव काम व स्थापत्यवैशिष्ट्ये शिक्षकांनी समजावून सांगितली.
सहलीतील पुढील टप्पा म्हणून विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ उद्यान पाहिले. येथे प्राणी संग्रहालय, पक्षी उद्यान, मत्स्यालय आणि सर्पउद्यानातून विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींची माहिती घेतली. जैवविविधतेचे महत्त्व समजल्याने पर्यावरणाबाबत जागृती निर्माण झाली. उद्यानातील झोके व घसरगुंड्यांचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी सहलीचा उत्साह वाढवला.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी बीबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी यांच्या स्मरणार्थ बांधलेला हा मकबरा ‘दक्षिणेचा ताजमहाल’ म्हणून ओळखला जातो. संगमरवरी बांधकाम व नक्षीकाम पाहून विद्यार्थी प्रभावित झाले.
ही शैक्षणिक सहल केवळ फिरण्यासाठी नसून विद्यार्थ्यांना इतिहास, निसर्ग, कला आणि संस्कृती यांचे प्रत्यक्ष ज्ञान देणारी ठरली. शिस्त, सहकार्य आणि वेळेचे नियोजन याचे धडेही विद्यार्थ्यांना मिळाले. पहाटे सुमारे एक वाजता सहलीच्या गाड्या शाळेत सुरक्षित परतल्या. सहल यशस्वी करण्यासाठी पालक, शिक्षक, बस चालक, शाळा व्यवस्थापन समिती व सांस्कृतिक कमिटी यांचे सहकार्य लाभल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.




