महाबळेश्वर:-जातीय हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासांत अटक करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वर:-जातीय हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासांत अटक करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी.

अटक न झाल्यास महाबळेश्वर तालुक्यात तीव्र आंदोलनाचा इशारा
महाबळेश्वर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जातीय द्वेषातून हल्ला व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डंपर मालक व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप अटक न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदन दिले. संबंधित आरोपींना २४ तासांत अटक करण्याची ठाम व स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आरोपींनी तालुकाध्यक्षांवर जातीय शिवीगाळ करत “डंपरखाली चिरडून टाकू” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून हा केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजावर झालेला हल्ला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.
प्रमुख मागण्या :
१)सदर गुन्ह्यात वापरलेले सर्व डंपर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात यावेत.
२)गुन्ह्यात नोंद असलेल्या संबंधित डंपरच्या सर्व वाहतूक परवान्यांच्या (परमिट) याद्या उपलब्ध करून द्याव्यात.
३)सर्व डंपर चालकांचे लायसन्स जमा करून त्यांची माहिती लेखी स्वरूपात द्यावी.
४)संबंधित डंपर नंबर याआधी अपघात किंवा गुन्हेगारी नोंदीत आहेत की नाही याची अधिकृत माहिती द्यावी.
५)आरोपी व त्यांच्या साथीदारांवर यापूर्वी कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात यावी.
तालुकाध्यक्षांना डंपरखाली चिरडण्याची धमकी दिल्यामुळे त्यांच्या जीवितास तात्काळ धोका असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत कळवले आहे की,जर २४ तासांत आरोपींना अटक करण्यात आली नाही किंवा जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला, तर येत्या दोन दिवसांत महाबळेश्वर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील.
डंपर माफियांचे वाढते धाडस, जातीय द्वेषाची मानसिकता आणि कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबतची ही बाब अत्यंत चिंताजनक असून न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरू राहील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




