सातारा:-डॉल्बी वाजवला, आता हिशेब द्यावा लागणार! साताऱ्यात १५ मंडळांवर गुन्हे; २.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-डॉल्बी वाजवला, आता हिशेब द्यावा लागणार! साताऱ्यात १५ मंडळांवर गुन्हे; २.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त.

सातारा | दि. २५ : विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात सातारा पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १५ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी डॉल्बी सिस्टीमसह संबंधित वाहने असा तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील नियमभंग करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
विसर्जन मिरवणुकीपूर्वीच पोलिसांनी गणेश मंडळे तसेच डॉल्बी चालक व मालकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटिसा बजावल्या होत्या. ध्वनिप्रदूषणासह मिरवणुकीतील नियम आणि वाहतुकीचे निर्बंध पाळण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, २४ सप्टेंबर रोजीच्या विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कोणताही विलंब न करता संबंधित मंडळांचे चालक, डॉल्बी मालक आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
शाहूपुरीत सर्वाधिक कारवाई; १२ मंडळांवर गुन्हे
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली. तब्बल १२ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
यामध्ये जय शिवराय मित्र मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, शाहूपुरी गणेश मंडळ, विठ्ठलनगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळ, श्रियश गणेशोत्सव मंडळ, सुयोग गणेशोत्सव मंडळ, एकता गणेशोत्सव मंडळ, बालस्मृती गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ, शिवनगर गणेशोत्सव मंडळ आणि शिवतेज गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो आणि डॉल्बी सिस्टीम ताब्यात घेतली.
सातारा शहरातही तीन मंडळांना दणका
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
यामध्ये बाल गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ आणि भोसलेनगर गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश आहे. भोसलेनगर मंडळाच्या प्रकरणात डॉल्बीच्या स्ट्रक्चरशी संबंधित व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली.
आधी नोटीस, तरीही नियमभंग; पोलिसांचा थेट ॲक्शन
गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मिरवणुकीपूर्वीच संबंधितांना नियमांची कल्पना दिली होती. मात्र, नोटीस मिळूनही नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करत डॉल्बी सिस्टीम व वाहने जप्त केली.
या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीत नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, सूचना धुडकावल्यास कारवाई थेट आणि कठोर असेल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सातारा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश तांबे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले.
नियम मोडला, तर डॉल्बीचा आवाज बंद आणि थेट गुन्ह्याची नोंद! सातारा पोलिसांच्या या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीतील नियमभंग करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
2) सातारा:-जिल्हा बँकेच्या सत्तासंग्रामाला सुरुवात; पहिल्याच दिवशी सहा जण मैदानात!

नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ; विविध मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल, सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग.
सातारा | दि. २६ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल शुक्रवारी (दि. २५) वाजले. नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी विविध मतदारसंघांतून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये गृहनिर्माण सहकारी संस्था तसेच दूध उत्पादक, पशुपैदास, वराहपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन संस्था मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष, फलटण तालुका मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघातून दीपक प्रल्हाद चव्हाण यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले.
तसेच नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून सुरभी मदन भोसले आणि महिला राखीव मतदारसंघातून अनुपमा शाहूराज फाळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष, कोरेगाव तालुका मतदारसंघातून सुनील रवेलचंद खत्री यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
दरम्यान, शनिवार (दि. २६) आणि रविवार (दि. २७) सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दोन दिवसांत नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृतीचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे.
निवडणूक कार्यालयात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच उपस्थित राहावे, तर इतर समर्थक व सोबत्यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश करू नये, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी केले आहे.




