वाई:-बाप्पाच्या निरोपात डॉल्बीचा दणका! डॉल्बीप्रकरणी ४ ते ५ गुन्हे दाखल.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-बाप्पाच्या निरोपात डॉल्बीचा दणका! डॉल्बीप्रकरणी ४ ते ५ गुन्हे दाखल.

बाप्पाच्या निरोपात डॉल्बीचा दणका! वाईच्या विसर्जन मिरवणुकीला ध्वनी प्रदूषणाचा तडाखा
आजोबा गणपतीच्या भेटीनंतर २४० मंडळांची मिरवणूक; ४ ते ५ हुल्लडबाज ताब्यात, डॉल्बीप्रकरणी ४ ते ५ गुन्हे दाखल.
वाई, दि. २६ : ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषाने वाई नगरी दुमदुमली; मात्र भक्तीच्या या उत्सवाला रात्रीच्या सुमारास डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने वेगळेच वळण मिळाले. शेकडो वर्षांची परंपरा जपत सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत काही ठिकाणी डॉल्बीच्या भिंती उभ्या राहिल्याने ‘परंपरेचा उत्सव की ध्वनीची स्पर्धा?’ हा सवाल ऐरणीवर आला. निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४ ते ५ डॉल्बी सिस्टीमवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्या ४ ते ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाईच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा पारंपरिक शुभारंभ शुक्रवारी (दि. २५) शाहीर चौक, गंगापुरी येथे झाला. प्रताप मंडळाच्या वतीने मानाच्या गणपतीची आरती, पुष्पवृष्टी, श्रीफळ वाढविणे आणि फीत कापून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या पत्नी सरिता सावंत यांच्या हस्ते आरती झाली. प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी फीत कापली, तर तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.
आजोबा गणपतीची भेट अन् मगच मुख्य मिरवणूक!
वाईच्या विसर्जन सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असलेली शेकडो वर्षांची परंपरा यंदाही दिमाखात पार पडली. ब्राह्मणशाही येथील मानाचा गणपती प्रथम गंगापुरीतील आजोबा गणपतीची भेट घेतो आणि त्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. या परंपरेनंतर ब्राह्मणशाहीचा नवसाचा गणपतीही विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला.
नवसाच्या गणपतीचा रथ युवक आणि महिलांनी संपूर्ण मार्गावर ओढला. या दृश्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर शहरातील विविध गणेश मंडळांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
२४० मंडळे रस्त्यावर; पोलिसांचा कडेकोट पहारा
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २४० सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यामध्ये ५ पोलीस अधिकारी, ५२ पोलीस अंमलदार, ४८ होमगार्ड आणि एसआरपीएफची एक प्लाटून तैनात करण्यात आली होती.
मिरवणुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच गोंधळ घालणाऱ्या काही तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली. नावेचीवाडी, सिद्धनाथवाडी, रविवार पेठ आदी भागातील काही तरुणांसह ४ ते ५ जणांना ताब्यात घेऊन समज देण्यात आली आणि त्यांना सोडण्यात आले.
डॉल्बीचा आवाज मोजण्यासाठी पोलीस थेट रस्त्यावर
विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यंदा चांगलाच गाजला. किसनवीर चौकात पोलिसांचे पथक ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी यंत्रणेसह तैनात करण्यात आले होते. पोलीस आणि ध्वनीमापन यंत्रणा दिसताच काही मंडळांनी आवाज कमी केल्याचे चित्र दिसून आले.
मात्र निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजविणाऱ्या ४ ते ५ सार्वजनिक गणेश मंडळांच्या डॉल्बी सिस्टीमविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आणखी काही मंडळांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे, एका मंडळाने डॉल्बीसाठी तब्बल अडीच लाख रुपयांचा चेक मोठ्या बॅनरवर झळकवत मिरवणूक काढली. या प्रकाराची शहरात विशेष चर्चा रंगली.
ढोल-ताशांचा गजर मागे; डॉल्बीच्या भिंती पुढे!
गणेशोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकीत ढोल-ताशा, लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणाला महत्त्व असते. मात्र यंदा अनेक ठिकाणी डॉल्बीचा प्रचंड आवाज आणि मोठ्या ध्वनियंत्रणांचीच चर्चा अधिक झाली.
त्यामुळे ‘गणेशोत्सवाची संस्कृती जपायची की डॉल्बीची स्पर्धा वाढवायची?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.
रात्री बारा वाजता डॉल्बी बंद करण्यात आले. त्यानंतरही फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विसर्जन सुरू राहिले.
ट्रॅक्टर-डॉल्बीवर उभे राहून धिंगाणा
मिरवणुकीदरम्यान काही युवक तसेच अल्पवयीन मुले ट्रॅक्टर आणि डॉल्बीच्या वाहनांवर उभे राहून धिंगाणा घालत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच मिरवणुकीतील सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला.
वाईची गणेशोत्सवाची परंपरा धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेली आहे. आजोबा गणपतीची भेट, मानाच्या गणपतीची मिरवणूक आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जन ही या उत्सवाची ओळख आहे. मात्र डॉल्बीचा वाढता आवाज आणि मिरवणुकीतील हुल्लडबाजीमुळे या परंपरेच्या मूळ स्वरूपावर परिणाम होऊ नये, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
३८०० मूर्तींचे दान; कृत्रिम हौदात पर्यावरणपूरक विसर्जन
दुसरीकडे, घरगुती गणेश विसर्जनासाठी सकाळपासूनच नागरिकांची लगबग सुरू होती. कृष्णा नदीपात्रात पाणी कमी असल्याने वाई नगरपरिषद, दिशा अकॅडमी, किसनवीर कॉलेजचे एनसीसी पथक आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेशमूर्ती दानाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३८०० गणेशमूर्ती दान केल्या. नगरपरिषदेने धोम कॉलनी येथे कृत्रिम हौदाची व्यवस्था केली होती. जमा झालेल्या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
नगरपरिषदेचे कर्मचारी, एनसीसी पथक आणि दिशा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला.
दरम्यान, अखिल भाजी मंडई व्यासपीठ येथे नगरपरिषदेच्या वतीने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांचा नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, नगरसेवक-नगरसेविका तसेच डॉ. मकरंद पोरे, विजय पाटणे, सचिन गांधी, संग्राम पाडळे, गिरीधर मालुसरे, संतोष जमदाडे, जितेंद्र पिसाळ, निलेश मोरे, प्रविण जाधव, रुपेश जाधव, निखिल जाधव आदी उपस्थित होते.
भक्ती, परंपरा आणि उत्साहात वाईकरांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. मात्र यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने एक मुद्दा ठळकपणे समोर आणला—गणेशोत्सवाची ओळख डॉल्बीच्या आवाजाने नव्हे, तर वाईच्या समृद्ध परंपरेने टिकली पाहिजे.
2) वाई:-मुंबईला नमवून ज्ञानदीपच्या लेकींची राज्याच्या तख्तावर स्वारी!

१३-९ गोलांनी दणदणीत विजय; वाईच्या मुलींचे हॅण्डबॉलमध्ये ऐतिहासिक सुवर्णयश.
सातारा | वाई, दि. २७ : जिद्द, चिकाटी आणि अचूक डावपेचांच्या जोरावर वाईच्या ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी महाराष्ट्राच्या हॅण्डबॉल मैदानावर आपल्या खेळाचा ठसा उमटवला. नवी मुंबईतील खारघर येथील विभगोर हायस्कूलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्ञानदीपच्या संघाने मुंबई शहर संघाचा १३-९ गोलांनी पराभव करत दिमाखात राज्य अजिंक्यपद पटकावले.
या विजयामुळे वाईच्या शिरपेचात प्रथमच राज्यस्तरीय हॅण्डबॉल अजिंक्यपदाचा मानाचा तुरा खोवला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील संघाने या स्पर्धेत मिळवलेले हे पहिलेच विजेतेपद असल्याने ज्ञानदीपच्या क्रीडा इतिहासात या कामगिरीची विशेष नोंद झाली आहे.
स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ज्ञानदीपच्या मुलींनी रायगड जिल्हा संघाचा ७-६ असा पराभव करत विजयी मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर उपउपांत्य फेरीत मुंबई उपनगर संघाविरुद्ध अक्षरशः वर्चस्व गाजवत २०-४ असा मोठा विजय मिळवला.
उपांत्य फेरीत पुणे संघासोबत झालेल्या चुरशीच्या सामन्यात ज्ञानदीपने संयमी खेळ करत ९-७ अशी बाजी मारली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात मुंबई शहर संघाविरुद्ध ज्ञानदीपच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक रणनीती अवलंबली. प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमणाला भक्कम बचावाने रोखत संधी मिळताच अचूक गोल करत ज्ञानदीपच्या मुलींनी सामन्यावर पकड मजबूत केली. अखेर १३-९ अशा फरकाने विजय मिळवत त्यांनी महाराष्ट्राच्या अजिंक्यपदावर कब्जा केला.
या ऐतिहासिक यशात आर्या समीर जाधव, जान्हवी सचिन सूर्यवंशी, शमिका मुकेश ढोले-पाटील, श्रद्धा सचिन वाघमारे, शरयू सचिन जाधव, ऋत्वा संभाजी खांडे, आराध्या अविनाश पिसाळ, स्पृहा अमोल पवार, ईशा सुनील निकम आणि अंकिता सचिन कदम यांनी मोलाची कामगिरी बजावली.
संघाला मार्गदर्शक शिक्षक सचिन नानासाहेब लेंभे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचा सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण, संघभावना आणि सामन्यातील प्रभावी नियोजन यामुळे ज्ञानदीपच्या संघाला हे ऐतिहासिक यश मिळाले.
या शानदार विजयाबद्दल ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शुभांगी पवार यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच प्रशिक्षक सचिन लेंभे यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले.
ज्ञानदीपच्या लेकींनी राज्यस्तरीय हॅण्डबॉलमध्ये मिळवलेले हे अजिंक्यपद वाईसह संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
3) वाई:-भक्ती, अभिनय अन् परंपरेचा संगम; ‘भैरवनाथ जोगेश्वरी’ जिवंत देखाव्याने लोहारे दुमदुमले!

नवतरुण गणेशोत्सव मंडळाचा देखणा उपक्रम; धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सादरीकरण, भाविकांची उत्स्फूर्त दाद.
सातारा | वाई, दि. २७ : गणेशोत्सवाच्या उत्साहाला धार्मिक परंपरा आणि कलाविष्काराची जोड देत लोहारे (ता. वाई) येथील नवतरुण गणेशोत्सव मंडळाने सादर केलेल्या ‘भैरवनाथ जोगेश्वरी’ या जिवंत देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. रेखीव नेपथ्य, जिवंत अभिनय, दमदार संवादफेक आणि प्रभावी प्रकाशयोजनेच्या सुरेख मेळामुळे हा देखावा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला.
भैरवनाथ-जोगेश्वरी यांच्या धार्मिक परंपरेचे महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा उलगडून दाखविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक दिवस नियोजनपूर्वक मेहनत घेतली. कलाकारांनी साकारलेली पात्रे, प्रसंगानुरूप संवाद आणि भावभावनांचा अचूक आविष्कार यामुळे देखाव्याला वास्तवतेची अनुभूती मिळाली. प्रकाशयोजनेच्या कल्पक वापरामुळे प्रत्येक प्रसंग अधिक प्रभावी ठरला.
हा देखावा पाहण्यासाठी लोहारेसह परिसरातील आणि शेजारील गावांमधून भाविक व नागरिकांची मोठी गर्दी झाली. धार्मिक श्रद्धेबरोबरच आपल्या गावच्या परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
जिवंत देखाव्याच्या यशस्वी सादरीकरणाबद्दल नवतरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह कलाकार आणि पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांचे ग्रामस्थ व भाविकांनी कौतुक केले. भक्ती, परंपरा आणि कलात्मक सादरीकरणाचा सुरेख संगम घडविणाऱ्या या देखाव्यामुळे लोहारेच्या गणेशोत्सवाला यंदा विशेष रंगत आली.
4) सातारा:-जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात नवा ‘गेमप्लॅन’? दोन मंत्र्यांच्या भेटीने चर्चांना उधाण.

सातारा | दि. २८ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची झालेली भेट सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
डीसीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे आगामी निवडणुकीतील संभाव्य राजकीय जुळवाजुळव आणि सत्तासमीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असली, तरी भेटीचा नेमका अजेंडा अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही.
जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक मानली जात नाही. जिल्ह्यातील विविध राजकीय गटांचे संघटन, स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि नेतृत्वाची ताकद यांचीही या निवडणुकीत कसोटी लागते. त्यामुळे प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आणि बंद दाराआड होणाऱ्या चर्चांना यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
संभाव्य पॅनलची बांधणी, उमेदवारांची निवड, विविध गटांशी संपर्क आणि मतदारसंघनिहाय समीकरणे या पार्श्वभूमीवर पुढील काळात हालचाली वाढण्याची शक्यता आहे. कोणते गट एकत्र येतात, कोणाची भूमिका निर्णायक ठरते आणि निवडणुकीपूर्वी कोणत्या पातळीवर राजकीय जुळवाजुळव होते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पुढे सरकत असताना इच्छुक उमेदवार आणि प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत डीसीसीच्या राजकारणातील चित्र अधिक स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
शिवेंद्रसिंहराजे–मकरंद पाटील भेटीमागे नेमकी कोणती चर्चा झाली? या भेटीचा डीसीसीच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो? आणि आगामी सत्तासमीकरणाची दिशा कोणती असणार? या प्रश्नांची उत्तरे आता पुढील राजकीय घडामोडींमधून समोर येणार आहेत.
5) वाई:-आईच्या ओव्यांना मिळाले पुस्तकाचे कोंदण; ‘गाणी हरिबाईची’तून लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा जतन

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे गौरवोद्गार; तानाजीराव शिंदे यांच्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक.
वाई | दि. २८ : ग्रामीण जीवनातील अनुभव, स्त्रीमनातील भावविश्व, संस्कार, श्रद्धा आणि परंपरा यांचे अस्सल प्रतिबिंब लोकगीतांमधून उमटते. जात्यावरच्या ओव्या, पाळणे, अंगाईगीते आणि उखाणे हा मौखिक लोकसाहित्याचा समृद्ध वारसा आहे. या वारशाचे जतन करणारा ‘गाणी हरिबाईची’ हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
‘गाणी हरिबाईची’ या गीतसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, हरिबाई शिंदे, तानाजीराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पाटणे म्हणाले, कोविडच्या काळात जग थांबले असताना तानाजीराव शिंदे यांनी आपल्या आईच्या मुखातून उमटणाऱ्या ओव्यांकडे विशेष लक्ष दिले. वर्षानुवर्षे आईच्या स्मरणात आणि कंठात जपलेल्या या ओव्यांमध्ये त्यांना लोकजीवनाचे समृद्ध दर्शन घडले. त्या केवळ ऐकून न राहता त्यांनी त्यांचे संकलन केले आणि या मौखिक परंपरेला पुस्तकाचे रूप दिले.
जातं हे केवळ धान्य दळण्याचे साधन नसून ग्रामीण लोकसंस्कृतीचे एक जिवंत विद्यापीठ आहे. जात्यावरच्या ओव्यांमधून स्त्रियांच्या सुख-दुःखांसह त्यांच्या मनातील भावविश्व, कौटुंबिक नातेसंबंध, देव-देवतांवरील श्रद्धा आणि सामाजिक परंपरांचे दर्शन घडते. आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात हा मौखिक वारसा हरवत असताना त्याचे पुस्तकरूपाने जतन होणे ही महत्त्वाची सांस्कृतिक कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
आईच्या आठवणी, तिच्या ओव्या आणि जीवनानुभवांना पुस्तकाच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचवून तानाजीराव शिंदे यांनी मातृप्रेमाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील तरुणांनीही आपल्या घरातील ज्येष्ठांकडून मिळालेला लोकपरंपरेचा वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटणे यांनी केले.
महादेव मस्कर यांनी आईच्या मुखातून आलेल्या ओव्या, पाळणे आणि लोकगीते पुस्तकरूपाने जतन करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. चंद्रकांत जाधव यांनी माय-लेकराच्या जिव्हाळ्याच्या नात्याला या पुस्तकामुळे मिळालेल्या भावपूर्ण अभिव्यक्तीचा उल्लेख केला. जयश्री शिंदे यांनी हरिबाई यांच्या मिश्कील स्वभावासह कुटुंबातील विविध आठवणींना उजाळा दिला.
तानाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविकात या पुस्तकामागील संकल्पना उलगडली. आईसोबतच्या गप्पांमधून तिच्या ओव्या, पाळणे आणि गाणी ऐकताना त्या जतन करण्याची कल्पना सुचली. कोविडच्या काळात या कामाला सुरुवात झाली. या संपूर्ण प्रक्रियेत प्राचार्य डॉ. पाटणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतिक कालेकर यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीसाठी मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीतही मुलांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या आईच्या कंठातून उमटलेला प्रत्येक स्वर आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे, अशी भावना तानाजीराव शिंदे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात गायक मच्छिंद्र नलावडे आणि तेजस्विनी पोरे यांनी संग्रहातील पाळणे व ओव्या सुरेल आवाजात सादर करून वातावरण भावमय केले. सूत्रसंचालन केशव कोदे व अशोक येवले यांनी केले. अजिंक्य शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.



