कराड:-तालुकास्तरीय १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय, कराडचा दिमाखदार विजय.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-तालुकास्तरीय १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय, कराडचा दिमाखदार विजय.

*कराड : -* शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय, कराडच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण ११ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा अंतिम सामना श्री शिवाजी विद्यालय, कराड आणि कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल, कराड या दोन संघांमध्ये रंगला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने सामना अत्यंत चुरशीचा झाला. निर्धारित षटकांमध्ये सामन्याचा निकाल न लागल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविण्यात आला. मात्र, त्यातही दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये श्री शिवाजी विद्यालयाच्या संघाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला आणि तालुकास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या विजयी संघाचे नेतृत्व चि. दर्शन हेळवी याने केले. संघाला श्री. गणेश सुकम सर आणि श्री. झांबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, सांघिक भावना, संयम आणि उत्कृष्ट कामगिरी यांमुळे संघाला हे यश संपादन करता आले.
या विजयामुळे श्री शिवाजी विद्यालय, कराडच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरेत आणखी एका मानाच्या यशाची भर पडली आहे. विशेषतः अंतिम सामन्यातील दोन सुपर ओव्हरपर्यंत रंगलेली लढत आणि त्यात मिळवलेला विजय यामुळे या कामगिरीचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराडचे अध्यक्ष, सचिव मा. श्री. जयंत (काका) पाटील, खजिनदार मा. श्री. संजय बदियानी तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयी संघातील खेळाडू, कर्णधार आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री शिवाजी विद्यालयाच्या या विजयाबद्दल विद्यार्थी, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




