वाई:-किसन वीरच्या दिवाळी साखर वाटपाला १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; सभासदांसह बिगर सभासदांनाही दिलासा!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-किसन वीरच्या दिवाळी साखर वाटपाला १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; सभासदांसह बिगर सभासदांनाही दिलासा!

साखर न उचललेल्या लाभार्थ्यांना आणखी तीन दिवसांची संधी; किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यस्थळावरून साखर घेण्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांचे आवाहन.
वाई, दि. ०९ : दिवाळीचा गोडवा सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने किसन वीर आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या साखर वाटपाला आता १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सभासदांसह बिगर सभासदांनाही या योजनेचा लाभ घेता येणार असून, अद्याप साखर न उचललेल्या लाभार्थ्यांना संचालक मंडळाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
यापूर्वी साखर वाटपाची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही सभासदांना वैयक्तिक अडचणींमुळे निर्धारित वेळेत साखर घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून संचालक मंडळाने १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
ना. मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू असून, को-जनरेशन आणि डिस्टिलरी प्रकल्पांचे उत्पादनही सुरू झाले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि बिगर सभासदांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले होते.
आता गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर ते शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साखर उचलण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली आहे. ज्या सभासद व बिगर सभासदांनी अद्याप दिवाळीची साखर घेतलेली नाही, त्यांनी या मुदतीत कारखान्याच्या कामकाजाच्या वेळेत किसन वीर अथवा खंडाळा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जाऊन आपली साखर घेऊन जावी, असे आवाहन प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही क्षणिक भुलथापांना बळी न पडता आपला संपूर्ण परिपक्व ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यांना गाळपासाठी द्यावा, असे आवाहन ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
2) वाईच्या क्रीडांगणावर रंगणार राज्यस्तरीय हँडबॉलचा थरार! १३ नोव्हेंबरपासून ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे संघ भिडणार; ज्ञानदीप स्कूलच्या मैदानावर तीन दिवस रंगणार कौशल्य, जिद्द आणि विजयाचा संग्राम!
सातारा |
वाई, दि. १० : क्रीडानगरी वाई पुन्हा एकदा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धा २०२६ चा थरार शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबरपासून वाईत रंगणार आहे. रविवार, दि. १५ नोव्हेंबरपर्यंत सलग तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील मुलींचे संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरून आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
हँडबॉल असोसिएशन सातारा आणि ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदीप स्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवा महिला खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, तसेच हँडबॉल खेळाचा प्रसार आणि विकास व्हावा, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंसह प्रशिक्षक, शिक्षक, पंच आणि पदाधिकाऱ्यांच्या निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नियोजनापासून ते मैदानावरील आवश्यक सुविधांपर्यंत सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
सातारा जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, सचिव बाळकृष्ण पवार, प्राचार्या शुभांगी पवार, क्रीडा शिक्षक, जिल्हा सचिव सचिन लेंभे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने वाईला राज्यस्तरीय क्रीडा आयोजनाचा मान मिळाला असून, राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या खेळाडूंमुळे शहरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे. मुलींच्या क्रीडा सहभागाला प्रोत्साहन देण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना राज्यस्तरावर आपली चमक दाखविण्याची ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. त्यामुळे वाईकरांसह क्रीडाप्रेमींचे लक्ष या तीन दिवसीय हँडबॉल स्पर्धेकडे लागले आहे.




