वाई:-गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर वाई MIDC हादरले! वैभव आर्ट’मध्ये आगीचे तांडव; कोट्यवधींचे नुकसान.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर वाई MIDC हादरले! वैभव आर्ट’मध्ये आगीचे तांडव; कोट्यवधींचे नुकसान.

सातारा | वाई, दि. ०२ :
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच वाई MIDC परिसरात मंगळवारी रात्री आगीचे थरारक तांडव पाहायला मिळाले. प्लॉट क्रमांक १८ येथील वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग या गणेशमूर्ती निर्मिती कारखान्याला रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने कारखान्यातील तयार गणेशमूर्ती, गौरीच्या मूर्ती, कच्चा माल आणि अन्य साहित्य जळून अक्षरशः राख झाले. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून बावळेकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करून त्यांना रंगरंगोटी व अंतिम स्वरूप देण्याचे काम कारखान्यात युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे आगीच्या वेळी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर तयार माल आणि साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. आगीने काही वेळातच संपूर्ण कारखाना आपल्या कवेत घेतल्याने नुकसानाची व्याप्ती वाढली.
आगीची माहिती मिळताच वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज आणि सातारा येथून एकूण पाच अग्निशमन बंब घटनास्थळी धावून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत रात्री दहा वाजल्यापासून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. धुराचे प्रचंड लोट, आगीची तीव्रता आणि मोठ्या प्रमाणावर जळणारे साहित्य यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर तब्बल पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दरम्यान, घटनास्थळी वाई पोलीस प्रशासन, महावितरणचे कर्मचारी, पंचायत समिती सभापती पै. विक्रांत डोंगरे, नगरसेवक विजय ढेकाणे, सुशील खरात, विजय पाटणे, चरण गायकवाड, प्रशांत डोंगरे यांच्यासह बोपर्डी येथील युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग हे गणेशमूर्ती निर्मिती क्षेत्रातील परिचित नाव असून, येथे तयार होणाऱ्या गणेशमूर्ती देशातील विविध भागांसह परदेशातही पाठविल्या जातात. गणेशोत्सवाच्या अगदी तोंडावरच कारखान्याला आग लागल्याने उद्योगाशी संबंधित कामगार, मूर्ती विक्रेते, ग्राहक आणि गणेशभक्तांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू असून, तपासानंतरच आगीचे खरे कारण आणि नुकसानीचा अधिकृत आकडा समोर येणार आहे.
चौकट : MIDC मध्ये अग्निशमन यंत्रणा कुठे? आगीच्या दुर्घटनेने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न
वाई MIDC मध्ये विविध उद्योग व कंपन्या मोठ्या संख्येने कार्यरत असताना MIDC प्रशासनाकडे स्वतंत्र अग्निशमन बंब नसल्याची बाब या दुर्घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आली आहे. आग लागल्यानंतर वाईसह पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज आणि सातारा येथून अग्निशमन बंब मागवावे लागल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचण्यास विलंब होण्याचा धोका कायम आहे.
दरम्यान, MIDC परिसरात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने शेड उभारण्यात आल्याची चर्चा असून, अशा बांधकामांवर आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर प्रशासनाची कारवाई कितपत प्रभावी आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.
उद्योगांची वाढती संख्या, मोठ्या प्रमाणावरील ज्वलनशील साहित्य आणि वाढता धोका लक्षात घेता वाई MIDC मध्ये स्वतंत्र अग्निशमन केंद्र, नियमित अग्निसुरक्षा ऑडिट, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.




