वाई:-कायदे समजून घ्या, हक्कांसाठी सज्ज व्हा! शिरगावात विधी साक्षरता शिबिर उत्साहात संपन्न.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-कायदे समजून घ्या, हक्कांसाठी सज्ज व्हा! शिरगावात विधी साक्षरता शिबिर उत्साहात संपन्न.

वाई, दि. ३१ : नागरिकांना कायदे, त्यांचे अधिकार तसेच उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपाययोजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, वाई-अति., जिल्हा व सत्र न्यायालय, वाई आणि ग्रामपंचायत शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव येथील सांस्कृतिक भवनात विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवारी (दि. ३० ऑगस्ट) सकाळी १० ते १२. ०० या वेळेत झालेल्या या शिबिराला ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बी. डी. कदम सों, जिल्हा न्यायाधीश-९, वाई होते. यावेळी ए. पी. ताठे सों, सह दिवाणी न्यायाधीश, वाई, तसेच अॅड. जे. एस. गायकवाड, अध्यक्ष, वाई वकील संघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत शा. कांबिरे, अधीक्षक, दि. न्या. व. स्तर, वाई यांनी केले. प्रास्ताविकातून अॅड. जे. एस. गायकवाड यांनी विधी साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट करत नागरिकांनी कायद्याची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शिबिरात महिलांच्या सुरक्षितता व गोपनीयतेसंदर्भातील कायदेशीर तरतुदींवर अॅड. अतुल भोसले यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने POCSO Act 2012 अर्थात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याबाबत अॅड. सुनीता गोरे यांनी सविस्तर माहिती दिली.
याशिवाय न्यायालयीन वाद टाळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्यायी विवाद निवारण पद्धती (ADR) आणि त्याचे फायदे याविषयी अॅड. रती पवार यांनी मार्गदर्शन केले. या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळविण्याच्या विविध कायदेशीर मार्गांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात सेवानिवृत्त लघुलेखक, जिल्हा न्यायालय सातारा श्री. दिलीप तु. भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.
कायद्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या हक्कांची व कायदेशीर तरतुदींची माहिती मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे शिरगाव परिसरात विधी साक्षरतेचा जागर झाला.
2) वाई:-वीज बिलाचा ‘शॉक’; गुरव कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न! बावधन नाक्यावर महावितरणविरोधात संतापाचा उद्रेक.

वाई, दि. ३१ :
दरमहा अवघा ७० ते ७५ युनिट वीजवापर असताना अचानक शेकडो युनिटचे बिल आणि तब्बल १८ हजार रुपयांची थकबाकी समोर आल्याने संतप्त झालेल्या परसणी येथील गुरव कुटुंबाने आज बावधन नाका येथील महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

परसणी येथील श्रीनाथ मंदिरातील गुरव कुटुंबातील सुशीला सदाशिव गुरव यांच्या घराचा वीजवापर अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बिलातून निदर्शनास आले. नेहमी ७० ते ७५ युनिटच्या आसपास असलेला वापर जून महिन्यात थेट ८४८ युनिट दाखविण्यात आला. एवढ्या मोठ्या वाढीबाबत कुटुंबाने महावितरणकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर महावितरणकडून मीटरची तपासणी करण्यात आली. मात्र, मीटरमध्ये कोणताही दोष नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर घरात स्मार्ट मीटर बसविण्यात आला. मात्र, त्यानंतरही जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३५० ते ४०० युनिटपर्यंतचा वापर नोंदविला गेल्याने कुटुंबाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाला.
वीज बिलाचा आकडा वाढत वाढत सुमारे १८ हजार रुपयांवर पोहोचला. एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याने कुटुंबाने बिलाचा भरणा केला नाही. परिणामी, मागील आठ दिवसांपासून त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. अखेर संतापाचा उद्रेक होऊन कुटुंबाने आज महावितरण कार्यालयात टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे यांनी संबंधित कुटुंबाशी चर्चा केली. चर्चेनंतर प्रकरणाची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी जुन्या मीटरसोबत आणखी एक मीटर पुढील एक-दोन महिन्यांसाठी बसविण्याचे ठरले. या कालावधीत दोन्ही मीटरच्या नोंदींची तुलना करून प्रत्यक्ष वीजवापर किती आहे, याची तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या आलेल्या सुमारे १८ हजार रुपयांच्या बिलापैकी ५ हजार ७०० रुपये भरण्याची सूचना महावितरणकडून करण्यात आली आहे. पुढील काळातील बिल मात्र मीटरमध्ये नोंदविलेल्या प्रत्यक्ष वापराच्या आधारे भरावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या आंदोलनानंतर कुटुंबाला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, वीज बिलातील तफावत दूर करण्यासाठी सामान्य नागरिकाला आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागणे ही गंभीर बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मीटरमध्ये दोष नसल्याचे सांगितल्यानंतरही वीजवापरात अचानक एवढी मोठी वाढ कशी नोंदवली जाते, याचा महावितरणने पारदर्शक तपास करून ग्राहकांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी जोर धरत आहे.




