सोळशी प्रकल्पावर पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन मोड’; फेरसर्वेक्षणाला वेग, संरक्षण भिंतीचे आदेश.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सोळशी प्रकल्पावर पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन मोड’; फेरसर्वेक्षणाला वेग, संरक्षण भिंतीचे आदेश.

सातारा |
सातारा दि. २२ : सोळशी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने आता वेगाने पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. ग्रामस्थांच्या मागण्या, सुरक्षितता आणि पुनर्वसनाचा प्रश्न लक्षात घेऊन फेरसर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिल्याने प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोळशी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या आणि साडेपाच टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, प्रकल्पाच्या कामामुळे संवरवाडी परिसरातील पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांच्या विविध मागण्या आणि शंकांवर तोडगा काढण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देत, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी, असे निर्देश देसाई यांनी प्रशासनाला दिले. फेरसर्वेक्षणामध्ये ग्रामस्थांच्या मागण्यांचा योग्य पद्धतीने विचार करून प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, तसेच यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी सातत्याने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, फेरसर्वेक्षण आणि पुनर्वसनाची संपूर्ण कार्यवाही पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने हाताळण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तातडीने संरक्षण भिंत उभारावी, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय ठेवून प्रश्न सोडविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. कोणताही निर्णय ग्रामस्थांना विश्वासात न घेता घेऊ नये, तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावी, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली.
या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फेरसर्वेक्षण, संरक्षण भिंत आणि ग्रामस्थांशी थेट संवाद या तीन आघाड्यांवर प्रशासनाला वेगाने काम करण्याचे आदेश मिळाल्याने सोळशी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता आहे.
2) कराड:-ब्रेक फेल, बस अन् समोर हॉस्पिटलची गर्दी! पोलिसांच्या धडाकेबाज तत्परतेने मोठा अनर्थ टळला.

कराड, दि. २२ : कराड शहरातील कॉटेज हॉस्पिटलसमोर एसटी बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. बसमध्ये विद्यार्थी आणि नागरिक प्रवास करत असताना हा प्रकार घडल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
कॉटेज हॉस्पिटलसमोर एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख API संदीप साळुंखे आणि PSI घाटगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हॉस्पिटल परिसरातील वर्दळ आणि रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वाहतूक नियंत्रणात घेतली.
बस सुरक्षितपणे थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत पोलिसांनी परिस्थिती हाताळली. त्यामुळे रस्त्यावर होणारी संभाव्य गर्दी आणि गोंधळ टाळून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अपघात होण्याचा धोका टळला.
या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत मोहिते, शशिकांत घाटगे, वैभव यादव आणि महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
सुदैवाने एसटीमधील सर्व विद्यार्थी आणि प्रवासी सुरक्षित असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वर्दळीच्या ठिकाणी एसटीचा ब्रेक फेल झाल्याने बसच्या तांत्रिक तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही क्षणांत संभाव्य दुर्घटनेचे संकट टळले. त्यामुळे प्रसंगावधान राखून केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
3) कराड:-साखरेच्या दरवाढीचा गोडवा कारखानदारांना; ऊस उत्पादकांच्या वाट्याला मात्र ‘कडू घास’!

सातारा | कराड, दि. २२ : बाजारात साखरेचे दर दिवसेंदिवस उसळी घेत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला मात्र अपेक्षित भाववाढ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही काळापूर्वी ४५ रुपये किलोच्या आसपास असलेली साखर आता थेट ७० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. साखरेच्या दरवाढीतून कोट्यवधींची उलाढाल होत असताना शेतकऱ्यांच्या उसाचा दर मात्र जैसे थे का? असा संतप्त सवाल शेती मित्र अशोकराव थोरात यांनी उपस्थित केला आहे.
ऊसापासून साखरेबरोबरच इथेनॉल, स्पिरिट, मद्य आणि वीज निर्मिती केली जाते. या सर्व उत्पादनांच्या बाजारपेठेत दरवाढीचे चित्र असतानाही ऊस उत्पादकांच्या पदरात त्यानुसार वाढीव मोबदला पडलेला नाही, अशी नाराजी थोरात यांनी व्यक्त केली.
साखरेच्या बाजारभावात वाढ होताच केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर साखर आयातीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बाजारातील वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सध्या बाजारात येणारी साखर मोठ्या प्रमाणात मागील हंगामातील आहे. त्या साखरेचा उत्पादन खर्च आधीच झालेला असल्याने सध्याच्या वाढलेल्या दरात विक्री झाल्यास कारखान्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. हा अतिरिक्त नफा नेमका कुणाच्या खिशात जाणार आणि ऊस उत्पादकांना त्यातील हिस्सा कधी मिळणार? असा थेट सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
कारखान्यांच्या गोदामात किती साखर शिल्लक आहे, मागील वर्षभरात कोणत्या महिन्यात किती साखर आणि कोणत्या दराने विकली, याचा संपूर्ण तपशील सभासद व ऊस उत्पादकांसमोर पारदर्शकपणे मांडावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
साखरेच्या वापराचा मोठा हिस्सा घरगुती वापरापेक्षा मिठाई, शीतपेय, बेकरी तसेच विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये होतो. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा संबंध केवळ सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चाशी जोडण्याऐवजी ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना येणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे आणि सिंचनाचा भार याचाही विचार व्हावा, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.
दिवाळीपूर्वी निर्णय नाही तर संघर्षाची तयारी!
शेतकरी आणि कारखाना सभासदांनी आता संघटितपणे आपल्या हक्काच्या दरासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगत, मागील हंगामाच्या एफआरपीपेक्षा तब्बल ७०० ते ९०० रुपये अधिक दर ऊस उत्पादकांना मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन साखरेच्या वाढत्या बाजारभावाचा योग्य लाभ ऊस उत्पादकांच्या पदरात पडण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची तरुण पिढी रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला आहे.
“साखरेच्या दरवाढीचा फायदा जर बाजारातील प्रत्येक घटकाला होत असेल, तर ऊस उत्पादक मात्र त्यापासून वंचित का? शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे,” असा ठाम निर्धार अशोकराव थोरात यांनी व्यक्त केला.





