वाई:-शहाबागच्या शाळेसाठी ऋतुजा शिंदेंचा ‘ॲक्शन मोड’; वर्गखोल्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

वाई:-शहाबागच्या शाळेसाठी ऋतुजा शिंदेंचा ‘ॲक्शन मोड’; वर्गखोल्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल.

सातारा | वाई, दि. २१ : विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय, मग वर्गखोल्यांची कमतरता का? हा प्रश्न समोर येण्याआधीच जि. प. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ऋतुजा विराज शिंदे यांनी शहाबागच्या शाळेसाठी पुढाकार घेतला आहे. नव्या वर्गखोल्यांच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल करून त्यांनी ग्रामीण शिक्षणाच्या प्रश्नावर कृतीशील भूमिका घेतली आहे.
ऋतुजा शिंदे आणि वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे युवा नेते विराज शिंदे यांनी गुरुवारी (दि. २०) शहाबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत शाळेच्या विविध अडचणींची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि उपलब्ध वर्गखोल्यांची अपुरी व्यवस्था लक्षात घेता अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज असल्याचे शिक्षिका सारिका पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
मात्र, ही मागणी समोर येण्यापूर्वीच नवीन वर्गखोल्यांसाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती सभापती शिंदे यांनी दिली. त्यामुळे केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यवाहीला प्राधान्य देत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. त्यांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत करून आभार मानले.
अंगणवाडीच्या पोषण आहाराचाही प्रश्न ऐरणीवर
शाळेसोबतच अंगणवाडीतील पोषण आहाराच्या दर्जाबाबत सेविकांनी सभापतींसमोर समस्या मांडल्या. या प्रश्नाची तत्काळ दखल घेत त्यांनी संबंधित अडचणींवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच सागर जमदाडे, उपसरपंच रेखा राजापुरे, किसनवीर कारखान्याचे माजी संचालक लालसिंगराव जमदाडे, तसेच विनय कोरडे, किरण जमदाडे, वसंत जमदाडे, सुधीर जमदाडे, सुजाता जमदाडे, माया जमदाडे, जयश्री दाभोळे, पुनम गाढवे, अरविंद कोरडे, अविनाश जमदाडे, शेखर जमदाडे, संदीप कोरडे, निलेश जमदाडे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
शहाबागच्या शाळेचा प्रश्न कागदावर न ठेवता त्यासाठी प्रस्तावाची पुढची पायरी गाठल्याने सभापती ऋतुजा शिंदे यांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





