पाटोदा:-घरपट्टी भरा, सुविधा घ्या! पाटोदा ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; ग्रामस्थांना १२ प्रकारच्या सुविधा.
पत्रकार अमजद शेख बीड जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाटोदा:-घरपट्टी भरा, सुविधा घ्या! पाटोदा ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; ग्रामस्थांना १२ प्रकारच्या सुविधा.
घरपट्टीच्या पैशातून गावाचा कायापालट! पाटोदा ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना वर्षभर विविध सुविधा
अहिल्यानगर : ग्रामपंचायतीकडून नागरिकांकडून वसूल होणाऱ्या कराचा योग्य वापर केला, तर त्यातून गावाच्या विकासासोबतच ग्रामस्थांना थेट सुविधा देता येतात, हे पाटोदा ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना विविध मूलभूत व उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देत पाटोदा गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पाटोदा गावाची वर्षाला एकूण सुमारे ४० लाख रुपये घरपट्टी जमा होते. विशेष म्हणजे ग्रामस्थांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही दरवर्षी सुमारे २ लाख रुपये शिल्लक राहत असल्याचे सांगण्यात येते.
घरपट्टी भरली की मिळतात ‘या’ १२ सुविधा!
१) वर्षभर मोफत दळणाची सुविधा :
ग्रामस्थांनी घरपट्टी भरल्यानंतर ग्रामपंचायतीच्या गिरणीवर वर्षभर मोफत दळण करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२) ग्रामपंचायतीच्या तेलघाण्यावर मोफत तेल :
करडी, शेंगदाणे यांसारख्या तेलबिया ग्रामस्थांनी दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या तेलघाण्यावर त्याचे तेल मोफत काढून देण्यात येते.
३) वाहनांसाठी मोफत हवा :
गावात हवा भरण्यासाठी कॉम्प्रेसरची सुविधा उपलब्ध असून टू-व्हिलर आणि फोर-व्हिलर वाहनांमध्ये मोफत हवा भरून देण्यात येते.
४) प्रत्येक चौकात गरम पाण्याची सुविधा :
गावातील ठराविक चौकांमध्ये गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी निश्चित वेळेत नळावर ग्रामस्थांना गरम पाणी उपलब्ध करून दिले जाते.
५) पिण्यासाठी आरओचे पाणी :
ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावात आरओ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
६) घराघरांत कचरा व्यवस्थापन :
प्रत्येक घराला कचरा साठवण्यासाठी दोन कचरापेट्या देण्यात आल्या आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत या कचऱ्याचे नियमित संकलन केले जाते.
७) महिलांच्या हस्ते ध्वजारोहण :
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणांच्या दिवशी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची विशेष परंपरा पाटोदा गावाने सुरू केली आहे. यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलेचे नाव निवडले जाते.
८) घरपट्टी न भरणाऱ्यांना सुविधा नाहीत :
ज्या ग्रामस्थांनी घरपट्टी भरलेली नाही, त्यांना ग्रामपंचायतीच्या विविध सुविधा तसेच दाखले उपलब्ध करून दिले जात नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.
९) स्वच्छतेसाठी ‘येथे थुंका’ व्यवस्था :
गावातील ठराविक ठिकाणी ‘येथे थुंका’ असे लिहून तेथे वॉश बेसिन आणि नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
१०) गावाला भेट देणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत :
आदर्श गाव पाटोदा पाहण्यासाठी राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या व्हिजिटर्सचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात येते. त्यांना चहा-पाणी देऊन गावातील विविध उपक्रम व विकासकामांची संपूर्ण माहिती दिली जाते.
११) वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल बोर्डवर :
गावातील नागरिकांचा वाढदिवस असल्यास त्यांचे नाव डिजिटल बोर्डवर झळकवून त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा दिल्या जातात.
१२) निराधारांसाठी आधार आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था :
गावातील निराधार व्यक्तींना आधार देण्याचे काम करण्यात येत असून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांची काळजी घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
करातून विकास आणि विकासातून सुविधा!
ग्रामपंचायतीकडून नागरिकांकडून जमा होणाऱ्या घरपट्टीचा उपयोग केवळ विकासकामांसाठी न करता ग्रामस्थांना थेट सुविधा देण्यासाठी केला जात असल्याने पाटोदा गावाची चर्चा होत आहे. ‘कर भरा आणि आपल्या गावाच्या विकासात सहभागी व्हा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे.
पाटोदा गावाला एकदा अवश्य भेट द्या!
अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर रोडवर वाळुंज गावाच्या पुढे, बजाज कंपनीच्या पुढे असलेल्या चौकातून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर पाटोदा गाव आहे. गावातील विविध उपक्रम, स्वच्छता, सुविधा आणि ग्रामविकासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी पाटोदाला एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
घरपट्टीचा पैसा गावासाठी आणि गावातील सुविधा ग्रामस्थांसाठी — पाटोदा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.





