शिरूर बायपास ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’; तुटलेल्या दुभाजकामुळे आणखी एका तरुण उद्योजकाचा बळी.
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूर बायपास ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’; तुटलेल्या दुभाजकामुळे आणखी एका तरुण उद्योजकाचा बळी.

शिरूर:
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील शिरूर बायपास मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून प्रशासकीय दिरंगाईमुळे या रस्त्याला ‘मृत्यूच्या सापळ्या’चे स्वरूप आले आहे. अवघ्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतर, आज (दि. १६) पुन्हा एका तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेण्याच्या प्रयत्नात ३० वर्षीय तरुण उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमनाथ विठ्ठल बोऱ्हाडे (वय ३०, रा. बोऱ्हाडे मळा, ता. शिरूर) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. बोऱ्हाडे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
नेमकी घटना काय?
सोमनाथ बोऱ्हाडे हे आपल्या दुचाकीवरून बोऱ्हाडे मळा येथून बाबूराव नगरकडे कामासाठी जात होते. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पुढे असलेल्या तुटलेल्या दुभाजकातून (डिव्हायडर) रस्ता ओलांडत असताना, नगरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडकेनंतर कारचालक न थांबता पसार झाला. या भीषण अपघातात बोऱ्हाडे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. स्थानिक तरुणांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी पुण्याकडे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
प्रशासकीय टोलवाटोलवी आणि नागरिकांचा संताप
गेल्या मंगळवारी (ता. ११) पाषाणमळ्याजवळ झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात प्रथमेश लाड व किशोर यादव या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने केवळ काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून पळवाट काढली. शिरूर बायपासची हद्द सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास प्राधिकरण की जागतिक बँक प्रकल्प यांच्या अखत्यारीत येते, यावरून प्रशासकीय पातळीवर केवळ टोलवाटोलवी सुरू आहे.
पर्यायी मार्गावरील ताणामुळे धोका
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने पाषाण मळा ते विघ्नहर्ता हॉस्पिटलदरम्यान ३८ बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता. त्यामुळे सर्व वाहतूक सीताबाई थिटे डी-फार्मसी कॉलेजजवळील सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्गाकडे वळवण्यात आली आहे. या एकाच मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने, ही कोंडी टाळण्यासाठी बोऱ्हाडे यांनी तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
ठिकठिकाणी तुटलेले दुभाजक आणि अनधिकृत रस्ते पक्क्या स्वरूपात बंद न केल्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असून, या निष्काळजीपणाविरोधात घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.





