कराड:-श्री शिवाजी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-श्री शिवाजी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश.

कराड :- श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड संचलित श्री शिवाजी विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात दिमाखात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी आणि विविध सांस्कृतिक व कवायत सादरीकरणांनी विद्यालयाचा परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संतोष दिलीप भोसले, निवृत्त असिस्टंट कमांड, CRPF उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराडचे खजिनदार मा. श्री. संजय पुरुषोत्तम बदियानी होते. तसेच मा. सौ. नीता जयंत पाटील व मा. श्री. मज्जिद मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजस्तंभाचे पूजन करून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. टी. डी. जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारतीय स्वातंत्र्यदिनाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे शिस्तबद्ध व उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. संगीत विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षिका सौ. संपकाळ मॅडम यांनी ‘जगी घुमवारे जयोस्तुते’ हे देशभक्तीपर समूहगीत सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शैक्षणिक, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
भारताच्या प्रगतीसोबत सामाजिक ऐक्यही तितकेच महत्त्वाचे – मुख्याध्यापक जाधव
मुख्याध्यापक मा. श्री. टी. डी. जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भारताच्या प्रगतीचा आढावा घेताना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली असून जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद, धर्मभेद आणि भ्रष्टाचार यांसारख्या सामाजिक अडथळ्यांचे उच्चाटन होणे आवश्यक आहे, असे सांगून प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग देशसेवेसाठी करा — संतोष भोसले
प्रमुख पाहुणे मा. श्री. संतोष दिलीप भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थीदशेतच अभ्यासाला प्राधान्य देऊन ज्ञान, कौशल्य आणि शिस्त आत्मसात करण्याचे आवाहन केले. भविष्यात मिळवलेले ज्ञान आणि कौशल्य केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी वापरा, असा संदेश त्यांनी दिला. देशसेवेची भावना मनात रुजवून जबाबदार नागरिक बनण्याचा कानमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मोबाईलच्या अतिवापरापासून सावध राहा — संजय बदियानी
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. संजय पुरुषोत्तम बदियानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “चांगले मार्गदर्शन लाभले तर चांगला देश घडतो,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन सातत्याने घेऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
आजच्या युवा पिढीमध्ये मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता वापर चिंतेचा विषय असल्याचे नमूद करून स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दैनंदिन जीवनावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर, मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवा, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पवार व्ही. आर. व श्री. झांबरे ए. डी. यांनी केले. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्ती, राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक ऐक्य आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देत श्री शिवाजी विद्यालयाचा ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.




