आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-महसूल प्रशासनाला थेट आव्हान! वाघ-मोरे मैदानात;अतिक्रमण, गौण खनिज, फेरफार अन् कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-महसूल प्रशासनाला थेट आव्हान!
वाघ-मोरे मैदानात;अतिक्रमण, गौण खनिज, फेरफार अन् कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण.

वाई, दि. १३ : महसूल प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात वाईत अखेर आंदोलनाचा आवाज बुलंद झाला आहे. भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रणित मोरे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करत महसूल यंत्रणेला थेट जाब विचारला आहे. महसूल, पाटबंधारे, गौण खनिज उत्खनन, दस्त नोंदणी आणि महसूल अभिलेखांशी संबंधित कथित गैरप्रकारांची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
“तक्रारी केल्या, निवेदने दिली, पुरावे सादर केले; तरीही कारवाई का नाही?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे वाघ व मोरे यांनी सांगितले.
सोनगिरवाडीतील कथित अतिक्रमणावरून प्रशासनाला घेरले.

सोनगिरवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जमिनीवर कथित अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अतिक्रमण हटवावे तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गौण खनिज उत्खननाचा मुद्दा तापला
वाई तालुक्यात मागील काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधितांना संरक्षण किंवा सहकार्य केल्याचा संशय असलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी. तत्कालीन तसेच विद्यमान तहसीलदारांच्या कार्यकाळाचीही तपासणी करून दोष आढळल्यास शिस्तभंगासह फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
२०२२ ते २०२६ : तहसीलदारांच्या निर्णयांची ‘झाडाझडती’
वाई तहसीलदारांनी २०२२ ते २०२६ या कालावधीत दिलेले आदेश, निकाल व निर्णय यांची स्वतंत्र व खातेनिहाय तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमबाह्य निर्णय किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी आंदोलकांची भूमिका आहे.
फेरफार अन् दस्त नोंदणीवरही संशयाची सुई
दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त, महसूल अभिलेखांमधील नोंदी आणि काही नोंदी रद्द करण्याच्या प्रक्रियेवर आंदोलकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. नागरिकांना दस्त नोंदणी तसेच महसूल अभिलेखांच्या कामकाजात अडथळे, विलंब किंवा त्रास होत असल्याच्या तक्रारींचीही उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘नागरिकांची पिळवणूक थांबवा’; अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी मागितली
वाई मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल कामकाजात सर्वसामान्य नागरिकांची कथित पिळवणूक, मनमानी आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. मंजूर फेरफार, आदेश आणि इतर महसुली प्रकरणांची खातेनिहाय तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशी आणि कारवाईचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी (आंबेडकर)च्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी संतोष जाधव, सोमनाथ धोत्रे, अजीम इनामदार, स्मिता जगताप, आयेशा पटणी, सचिन पाटणे, अजय गायकवाड आदी उपस्थित होते.
चौकट | तहसीलदार सोनाली मेटकरी यांची भूमिका
“आंदोलकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या संपूर्ण प्रकरणात मला आणि माझ्या पतींना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी शासकीय अधिकारी असून संबंधित विभागाची जबाबदारी सांभाळत असल्याने मला जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. नागरिकांना संविधानिक मार्गाने न्याय मागण्याचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील तथ्य लवकरच समोर येईल. योग्य वेळी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करेन.”
— सोनाली मेटकरी, तहसीलदार, वाई

2) वाई:-झाडांच्या फांद्यांवरून वाई नगरपरिषदेत रणकंदन; विकासाच्या नावाखाली ‘झाडतोड’ कितपत योग्य?
अजित शिंदेंचा संतप्त सवाल; “विकास नागरिकांसाठी की स्वार्थासाठी?”

सातारा | वाई दि. १३ :
वाई नगरपरिषदेच्या विशेष सभेत भाजी मंडई परिसरातील सुशोभीकरणाच्या कामावरून वातावरण चांगलेच तापले. सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून नगरपरिषद सदस्य अजित शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांना किंवा परिसराला धोका निर्माण करणाऱ्या फांद्यांचीच आवश्यकतेनुसार छाटणी करावी; मात्र विकासकामांच्या नावाखाली सरसकट झाडतोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
भाजी मंडईच्या सुशोभीकरणाच्या कामादरम्यान झाडांच्या फांद्या काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आणला. झाडे ही शहराची नैसर्गिक संपत्ती असून विकासाच्या नावाखाली त्यांची अनावश्यक कत्तल होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, प्रसाद बनकर, केतकी मोरे आणि जागृती पोरे यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध करत हा आक्षेप खोडून काढला.
दरम्यान, नगराध्यक्ष अनिल सावंत आणि विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी भाजी मंडईतील सुमारे १२५ भाजी विक्रेत्यांपैकी एकाही विक्रेत्याने झाडांच्या फांद्यांबाबत तक्रार केलेली नसल्याचे सभेत स्पष्ट केले. उलट मंडईतील व्यावसायिकांकडूनच झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावर अजित शिंदे यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देण्यास विरोध दर्शविला. “होणारा विकास नागरिकांच्या हितासाठी नसून स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी सभेत केल्याने वातावरण आणखी तापले. या आरोपामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी रंगली.
विशेष सभेत भाजी मंडई सुशोभीकरणाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, नदी संवर्धन, रस्ते, विद्युत वाहिन्या आदी विविध विकासकामांवरही चर्चा झाली. विकासकामे करताना शहराचा कायापालट होणे गरजेचे असले, तरी त्याचवेळी पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा सूर चर्चेतून उमटला.
दरम्यान, झाडांच्या फांद्यांची छाटणी नेमक्या कोणत्या निकषांनुसार करण्यात आली? संबंधित झाडांमुळे खरोखरच धोका निर्माण झाला होता का? तसेच मंडईतील व्यावसायिकांनी फांद्या तोडण्याची मागणी अधिकृतपणे केली होती का? याबाबत आता नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित होत आहेत.
विकासकामांच्या नावाखाली झाडांची छाटणी की पर्यावरणाचा समतोल? या प्रश्नाचे उत्तर आता नगरपरिषद प्रशासनाला द्यावे लागणार आहे.

3) साताऱ्यात आधारसेवेला डिजिटल बूस्ट; अत्याधुनिक केंद्र सुरू, सातही दिवस मिळणार सुविधा
सदर बाजारात नव्या केंद्राचे उद्घाटन; नागरिकांची धावपळ थांबणार, ५ ते १७ वर्षांच्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट मोफत.

 

सातारा, दि. १३ : आधारशी संबंधित कामांसाठी नागरिकांना आता वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. वाय. सी. कॉलेजसमोर, सदर बाजार येथे अत्याधुनिक आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन केंद्रामुळे आधार नोंदणी व दुरुस्तीच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच आधारशी संबंधित कामांसाठी होणारी गैरसोय कमी होणार आहे.


उद्घाटनप्रसंगी UIDAI प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक मनोज प्रजापती तसेच सेवा प्रदाता संस्था मेसर्स बीएलएस इंटरनॅशनलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या केंद्रात नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांकातील दुरुस्ती, तसेच आधारशी संबंधित तक्रारींचे निवारण अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट मोफत करण्यात येणार आहे.
या केंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आठवड्याचे सातही दिवस आधार सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि इतर नागरिकांना आपल्या सोयीच्या दिवशी आधारशी संबंधित कामे पूर्ण करता येणार आहेत.
“हे केंद्र नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा देण्यास उपयुक्त ठरेल. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे,” असे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले.
सातारा शहर व परिसरातील नागरिकांनी या नव्या आधार सेवा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

4) साताऱ्यात देशप्रेमाचा सन्मान; १५ ऑगस्टला मान्यवरांचा गौरव.

‘मिसाल वतन से मुहब्बत की’ पुरस्काराने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा होणार सन्मान.

सातारा, दि. १३ : स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देत समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव करण्यासाठी ‘खिदमत-ए-खल्क’ व ‘जमीयतुल उलमा वल हुफ्फाज, सातारा’ यांच्या वतीने ‘मिसाल वतन से मुहब्बत की – २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांच्यासह कुस्ती, माजी सैनिक सेवा, वकिली, शिक्षण, सामाजिक कार्य, व्यापार, सार्वजनिक सेवा, ऑटोमोबाईल आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार आहे.
देशप्रेम म्हणजे केवळ सीमेवर लढणे नव्हे, तर समाजासाठी निष्ठेने कार्य करणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे, या विचारातून या पुरस्काराची संकल्पना साकारण्यात आली आहे. सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

5) कराड:-सावरकर चषक जलतरण स्पर्धेत कराडच्या H2O क्लबचा जलवा!
अर्णव चव्हाणची दुहेरी सुवर्णकामगिरी; अविष्कार जगदाळेचाही सुवर्णवेध.

कराड दि. १३ : इचलकरंजी येथे सावली सोशल सर्कलच्या वतीने आयोजित चौथ्या सावरकर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कराडच्या H2O स्विमिंग क्लबच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. ८ व ९ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह बेळगाव आणि गोवा येथील २७० हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेतला.
H2O क्लबचा जलतरणपटू अर्णव गणेश चव्हाण याने ५० मीटर फ्लाय आणि ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावत दुहेरी सुवर्णकामगिरी केली. याशिवाय ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, तर रिले प्रकारात कांस्यपदक मिळवत त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीची छाप पाडली.
अविष्कार जगदाळे याने ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक मिळविले. तनवीरा जावेद शेख हिने १०० मीटर बटरफ्लायमध्ये, तर रुद्रांश नानासाहेब पाटील यानेही १०० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक पटकावले.
राज्यस्तरीय स्पर्धेत कराडच्या युवा जलतरणपटूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे H2O स्विमिंग क्लबने जलतरण क्षेत्रात आपली दमदार ओळख निर्माण केली आहे. खेळाडूंना ओमकार भुईंगडे सरांचे मार्गदर्शन लाभले.
H2O क्लबमध्ये जलतरणाच्या स्पर्धात्मक प्रशिक्षणाच्या बॅचेस सुरू असून, आगामी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंची जोरदार तयारी सुरू आहे. या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे क्रीडाप्रेमी व नागरिकांकडून अभिनंदन होत असून, या कामगिरीने कराडच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button