माळेवाडी:-“PWD च्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचा सापळा; माळेवाडीच्या तरुणांनी स्वतः रस्त्यावर उतरून बुजवले जीवघेणे खड्डे – अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!”
पत्रकार अमजद शेख बीड जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

माळेवाडी:-“PWD च्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचा सापळा; माळेवाडीच्या तरुणांनी स्वतः रस्त्यावर उतरून बुजवले जीवघेणे खड्डे – अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!”

माळेवाडी (प्रतिनिधी):
छत्रपती संभाजीनगर ते आहिल्यानगर या महत्त्वाच्या मार्गाला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ५१ वरील माळेवाडी ते उंदिरगाव दरम्यानच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वार अपघाताच्या उंबरठ्यावर पोहोचत असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडून निरपराध नागरिकांचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सातत्याने डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर माळेवाडीतील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुणांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.
तरुण कार्यकर्ते सिताराम औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष हाडके, पंकज औताडे, तनवीर शेख, पत्रकार संदीप पगारे आणि पत्रकार सोमनाथ त्रिभुवन यांनी श्रमदान करून रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविले. या उपक्रमामुळे नागरिकांनी या सर्वांचे कौतुक करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. अन्यथा माळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत दुर्दैवी असून, आता तरी प्रशासनाने जागे होऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून अपघातांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



