वाई:-“स्मृतीतून हरित क्रांती!” कै.विकी साळुंखे यांना अनोखी श्रद्धांजली; वाईच्या मानाचा गणपती मंडळाचे पर्यावरणासाठी प्रेरणादायी वृक्षारोपण.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“स्मृतीतून हरित क्रांती!” कै.विकी साळुंखे यांना अनोखी श्रद्धांजली; वाईच्या मानाचा गणपती मंडळाचे पर्यावरणासाठी प्रेरणादायी वृक्षारोपण.

सातारा | वाई, दि. ०३ :
सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपत वाईच्या मानाचा गणपती मंडळाने दिवंगत सभासद कै. विकी तुकाराम साळुंखे यांच्या स्मृतींना आगळीवेगळी आणि चिरंतन श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्मरणार्थ शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून मंडळाने समाजासमोर पर्यावरण संरक्षणाचा आदर्श ठेवला.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी काही ठिकाणी झाडे थेट जमिनीत न लावता मोठ्या निळ्या ड्रम्सचा कुंडी म्हणून नाविन्यपूर्ण वापर करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासोबतच शहराच्या नियोजनाचाही विचार करणारी ही संकल्पना नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरली.
ब्राह्मणशाही ग्रामीण रुग्णालय परिसर, मानाचा गणपती मंदिर परिसर, नगरपालिका शाळा क्रमांक ७ आणि फुलेनगर येथे बहावा, रातराणी, सोनचाफा, जांभूळ, आवळा, चिंच, मधुकामनी तसेच महाराष्ट्राचे राज्यफूल ‘ताम्हण’ अशा विविध उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. पावसाळ्याच्या अनुकूल वातावरणात लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा निर्धारही मंडळाने व्यक्त केला.
“झाडे लावणे ही केवळ सुरुवात; ती जगवणे हीच खरी समाजसेवा,” हा संदेश देत मानाचा गणपती मंडळाने पर्यावरणाबाबतची आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. कै. विकी साळुंखे यांच्या स्मृतींना हरित स्वरूपात अभिवादन करणाऱ्या या उपक्रमाचे वाई शहरात सर्वत्र कौतुक होत असून, मंडळाच्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वृक्षारोपण मोहिमेत मानाचा गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला.
2) कराड:-लोकशाहीरांच्या विचारांची शिदोरी विद्यार्थ्यांच्या हाती! जनहिताय फाउंडेशनचा कराडमध्ये प्रेरणादायी उपक्रम.

कराड | दि. ०३ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशन, कराड यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जपणूक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शिक्षण, वाचन संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन, फळे, ‘स्वयंदीप’ अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक तसेच लहान मुलांना अंकलिपीचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, वाचनाची सवय रुजावी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतेच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवा हीच अण्णाभाऊंना खरी आदरांजली असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रसंगी बापूसाहेब लांडगे, बाजीराव कमाने, राजेंद्र ताटे, राज चव्हाण, दीपाली सावंत, विशाल लांडगे, विजय लांडगे, अशोक पवार, प्रकाश पवार, कल्याण डुबल, काकासो रामूगडे, मधुकर गवळी, बापू कळंत्रे, राजेंद्र गवार, सुरेश पोळ, बरगडे सर, राहुल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, ग्रामपंचायत हजारमाचीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी जनहिताय फाउंडेशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त केली.
3) सातारा:-स्वकुळ साळी समाजात नव्या नेतृत्वाची धुरा; महेश पागडे जिल्हाध्यक्ष, शैलजा ठोके महिला अध्यक्षा.

सातारा | दि. ०३ : सातारा जिल्हा स्वकुळ साळी समाज संघटनेच्या सभासद नोंदणी व पुनर्रचना मेळाव्यात नव्या नेतृत्वाची सर्वानुमते निवड करत समाज संघटनाला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यात महेश पागडे यांची जिल्हाध्यक्षपदी, तर शैलजा ठोके यांची जिल्हा महिला मंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
पोवई नाका येथील गुलबहार हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी येथील स्वकुळ साळी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पांढरपट्टे होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माजी अध्यक्ष विश्वास ठोके, धोंडीराम पागडे,दत्ता मर्ढेकर,दिलीप घटे, डॉ. चंद्रशेखर बारगजे, दिलीप पोरे, महेश दुधाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात विवेक ठोके यांनी समाज संघटनाची गरज, महिला मंडळाची भूमिका तसेच साताऱ्यात उभारल्या जात असलेल्या भगवान जिव्हेश्वर मंदिर व सांस्कृतिक सभागृहाच्या उभारणीचा प्रवास उलगडून सांगितला. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले.
निवड प्रक्रियेदरम्यान सुरेश पांढरपट्टे यांनी महेश पागडे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर मधुकर जंत्रे यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वानुमते महेश पागडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. महिला मंडळाच्या अध्यक्षपदासाठी ज्योती चिल्लाळे यांनी शैलजा ठोके यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्यास पुनम ठोके यांनी अनुमोदन दिल्यानंतर त्यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सुरेखा सुरेश पांढरपट्टे यांनी भगवान जिव्हेश्वर मंदिर व सांस्कृतिक सभागृहासाठी ₹१ लाख १५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश जिव्हेश्वर सांस्कृतिक विकास मंचाकडे सुपूर्द केला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेश पागडे यांनी समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर महिला अध्यक्षा शैलजा ठोके यांनी महिलांच्या संघटन आणि सक्षमीकरणासाठी प्रभावी काम करण्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय समारोपात प्रशांत पांढरपट्टे यांनी साताऱ्यात उभारल्या जात असलेल्या भगवान जिव्हेश्वर मंदिर व सांस्कृतिक सभागृहाच्या कार्याचे तसेच मेळाव्याच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. हा मेळावा आगामी प्रांतिक अधिवेशनासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पांढरपट्टे यांनी केले, तर मधुकर जंत्रे यांनी आभार मानले. पसायदान आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कराड, सातारा, वाई, पाटण आणि फलटणसह जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव आणि महिला मेळाव्यास उपस्थित होत्या.




