वडगांव:-NDRF पथकाकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे – रेस्क्यू ऑपरेशन, आग नियंत्रण, कृत्रिम श्वसनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांनीही घेतला सहभाग.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वडगांव:-NDRF पथकाकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे – रेस्क्यू ऑपरेशन, आग नियंत्रण, कृत्रिम श्वसनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांनीही घेतला सहभाग.

वडगाव, ता. खटाव, जि. सातारा, दि. १५ सप्टेंबर २०२६ :
जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, वडगाव येथे ५ बटालियन, NDRF, मुख्यालय पुणे यांच्या पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संदीप कदम, रा. गोरेगाव, हे सेवेतून हेड कॉन्स्टेबल पदावरून निवृत्त होत असल्याच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून हा उपयुक्त व मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या वतीने उपस्थित NDRF अधिकारी व जवानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. अण्णासाहेब घार्गे उपस्थित होते.
NDRF पथकातील ASI/GD रितेश कुमार, ASI/RO दुर्वेश कुमार, HC/GD तुळशिदास वानडे तसेच रेस्क्यू पथकातील भानुशे प्रकाश, गोकुळ वाघ, सत्यवान इंदलकर, तुषार भोसले, दत्ता पाटील आदी अधिकारी व जवानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ASI रितेश कुमार यांनी NDRF चे कार्य, आपत्तीच्या काळातील पथकाची भूमिका तसेच आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर NDRF जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन, आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या पद्धती, भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी, आपत्कालीन बचावकार्य, कृत्रिम श्वसन (Artificial Breathing), दोरीच्या साहाय्याने बचावकार्य तसेच आपत्तीग्रस्त व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनाही विविध प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करून घेत प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे, याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, स्वयंरक्षण, धैर्य, प्रसंगावधान आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली. NDRF जवानांनी दिलेले प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संदीप कदम यांचे विशेष आभार मानण्यात आले. NDRF अधिकारी व जवानांनी दिलेल्या अमूल्य प्रशिक्षणाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जे. बी. घार्गे सर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. बी. पवार सर यांनी केले.




