कळंबी:-आषाढी दिंडीच्या माध्यमातून केंद्रशाळा कळंबी येथे साक्षरतेचा जागर; मातृभाषा, पर्यावरण व जलसंवर्धनाचा दिला संदेश.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कळंबी:-आषाढी दिंडीच्या माध्यमातून केंद्रशाळा कळंबी येथे साक्षरतेचा जागर; मातृभाषा, पर्यावरण व जलसंवर्धनाचा दिला संदेश.

कळंबी :-“ज्ञानोबा माऊली तुकाराम… पांडुरंग हरी विठ्ठल!” या नामघोषाने कळंबी गाव दुमदुमून गेले. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीचे औचित्य साधत केंद्रशाळा कळंबी येथे विद्यार्थ्यांची प्रतीकात्मक आषाढी दिंडी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साक्षरता, मातृभाषेतील शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जलसाक्षरतेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
*”वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती…”*
संत तुकाराम महाराजांच्या या ओवीप्रमाणे निसर्गसंवर्धनाचा संदेश देत, तर *”नको इंग्रजीचा अट्टाहास, मराठी शाळाच आहे खास”,* “मातृभाषेतून शिक्षण – उज्ज्वल भविष्याचे लक्षण”, “पाणी अडवा, पाणी जिरवा” आणि “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” अशा घोषवाक्यांनी बालवारकऱ्यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्रांगणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे तसेच ज्ञानेश्वरीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम” या जयघोषात दिंडीला प्रारंभ झाला. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी हातात भगवे ध्वज, टाळ, वीणा आणि संदेशफलक घेऊन संपूर्ण गावातून ग्रामप्रदक्षिणा केली.
दिंडीत गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ, पालक, महिला आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अभंग व हरिपाठाचे गायन केले. ग्रामपंचायत पटांगणावर दिंडी पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचे गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन केले. महिलांनी व मुलींनी फुगड्या खेळून आणि हरिनामाच्या गजरात सहभागी होत दिंडी सोहळ्यात भक्तिरसाची अनोखी उधळण केली.
ग्रामप्रदक्षिणेनंतर दिंडी पुन्हा शाळेच्या प्रांगणात दाखल झाली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली. “बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आषाढी दिंडी हा केवळ धार्मिक सोहळा नसून संस्कार, साक्षरता, पर्यावरण संरक्षण, मातृभाषेचे जतन आणि सामाजिक जनजागृती यांचा प्रभावी संगम आहे, हे केंद्रशाळा कळंबीच्या या अभिनव उपक्रमातून अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या सामाजिक संदेशांचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करत या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.




