सुपा (कोल्हेवस्ती) जिल्हा परिषद शाळेत सोलर सिस्टिमसह विविध विकासकामांचे लोकार्पण; K-Drive Mobility Solutionsचा स्तुत्य उपक्रम.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सुपा (कोल्हेवस्ती) जिल्हा परिषद शाळेत सोलर सिस्टिमसह विविध विकासकामांचे लोकार्पण; K-Drive Mobility Solutionsचा स्तुत्य उपक्रम.

पारनेर, सुपा | राजकुमार इकडे
पारनेर तालुक्यातील सुपा येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हेवस्ती येथे K-Drive Mobility Solutions Pvt. Ltd. यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली. या विकासकामांमध्ये बहुउद्देशीय सभागृह, संपूर्ण शाळा इमारतीचे रंगकाम, बोलक्या भिंतींचे आकर्षक रंगकाम तसेच 5 KV सोलर सिस्टिम यांचा समावेश आहे. या विविध सुविधांचा लोकार्पण सोहळा कंपनीचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि बालमित्र यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या लोकार्पण सोहळ्यास कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट तथा हेड CSR डॉ. लीना देशपांडे, कंपनीचे प्लांट हेड विनय कुमार, HR मॅनेजर प्रवीण भालेराव, कंपनी सेक्रेटरी प्रदीप धोंडीयाल यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कंपनीच्या हेड CSR डॉ. लीना देशपांडे यांनी सामाजिक बांधिलकीबाबत बोलताना सांगितले की, कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून विविध भागांमध्ये लोकपयोगी आणि समाजहिताची कामे केली आहेत. भारत फोर्जच्या K-Drive कंपनी समूहाने महाराष्ट्रासह मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये सुमारे 130 ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे त्यांनी सांगितले.
कंपनीचे HR मॅनेजर प्रवीण भालेराव म्हणाले की, आम्ही प्रथम शाळेची पाहणी करण्यासाठी आलो, त्यावेळी शाळेची परिस्थिती आणि मुख्याध्यापक संजय दरेकर तसेच शिक्षक दत्तात्रय गवळी यांची शाळेच्या विकासासाठी असलेली तळमळ पाहून कंपनीने ही शाळा तीन वर्षांसाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करण्यात आले.
यावेळी सुपा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे यांनी सांगितले की, ‘मिशन आपुलकी’च्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 75 कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शाळांना मोठी मदत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुपा केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान समुद्र यांनी कंपनीकडून शाळेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी केला जाईल, असे सांगितले.
उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय गवळी यांनी कंपनीने शाळेला दिलेले आर्थिक व तांत्रिक सहकार्य हे शाळा आणि समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. कंपनीने दिलेल्या प्रत्येक रुपयाचा योग्य ठिकाणी विनियोग करण्यात आला असून, पारनेर तालुक्यासारख्या दुष्काळी भागातील इतर गरजू शाळांनाही अशाच प्रकारे मदत मिळावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ. रोहन जाधव, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका वैशाली गवळी, कंपनीचे रविंद्र राऊत, जयदीप लाड, प्रणव टोमणे, निलेश भांबरे, मनिषा गवळी, मनिषा शिर्के यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल जाधव व दत्तात्रय गवळी यांनी केले, तर आभार केंद्रप्रमुख भगवान समुद्र यांनी मानले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, तसेच शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने K-Drive Mobility Solutionsने केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि इतर उद्योगसमूहांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




